Poultry Farming Business Management: शेतकरी नियोजन । कुक्कुटपालनशेतकरी : जनार्दन रघुनाथ महाडीक गाव : शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणेएकूण क्षेत्र : १२ एकरएकूण पक्षिक्षमता : ३३ हजार.पुणे जिल्ह्यातील शिंदवणे (ता. हवेली) येथील जनार्दन महाडीक यांची १२ एकर शेती आहे. शेतीला पूरक म्हणून ते मागील १५ वर्षांपासून ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत. एका खासगी कंपनी सोबत करार तत्त्वावर व्यवसाय करून अपेक्षित वजनाच्या पक्ष्यांची विक्री कंपनीला केली जाते. सध्या त्यांच्याकडील १२ एकर शेतीपैकी तीन एकर क्षेत्रावर कुक्कुटपालन व्यवसायाची उभारणी केली आहे. .सुरवातीला टप्प्यात अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. विशेषतः कोरोना काळात अधिक अडचणी आल्या. मात्र त्यातून व्यवसायातील अनेक बारकावे, बाबी शिकायला मिळाल्या. आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करत त्यांनी व्यवसाय यशस्वी केला आहे, असे श्री. महाडीक सांगतात..Poultry Farming : दुर्गम आदिवासींना मिळाले पोल्ट्री व्यवसायाचे बळ.असे आहे व्यवसायाचे स्वरूपपोल्ट्री व्यवसायास सुरुवात करण्यापूर्वी ते शेतामध्ये ऊस आणि कांद्याचे उत्पादन घेत होते. ऊस उत्पादन वाढीसाठी बाहेरून एक ते दोन लाख रुपये खर्च करून कोंबडीखत विकत घ्यायचे. मात्र उत्पादन खर्च वाढत असल्याने त्यांनी बाहेरून कोंबडीखत घेण्याऐवजी स्वतः कोंबडीपालन व्यवसाय करून खताची गरज भागवू शकतो, या उद्देशाने शेतीसोबत कुक्कुटपालन व्यवसायाकडे करण्याचे ठरविले. .व्यवसायाच्या सुरुवातीला २०१५ मध्ये ९००० पक्ष्यांचे संगोपन करण्याच्या उद्देशाने पहिली पोल्ट्री शेड उभारणी केली. साधारण १७० बाय २८ फूट आकारमानाच्या दोन शेड उभारल्या. त्यात लहान पिल्लांच्या संगोपनापासून ते विक्रीपर्यंतचे व्यवस्थापन केले. कुक्कुटपालन शेडसाठी निवडलेली जागा ही गाववस्तीपासून दूर अंतरावर आहे. त्यामुळे पुरेशी मोकळी जागा आणि हवा उपलब्ध झाली आहे..व्यवसायाच्या सुरुवातीस अनुभव नसल्याने अनेक समस्या आल्या. परंतु हार न मानता आणि जिद्दीने प्रत्येक अडचणीचा अभ्यास करत हळूहळू व्यवसायाचा विस्तार केला. आजमितीस त्यांच्याकडे सुमारे ३३ हजार बॉयलर पक्ष्यांचे संगोपन केले जाते. अभ्यासपूर्ण व्यवस्थापनावर भर देत व्यवसाय वाढीस लावला आहे. शाश्वत उत्पन्न हाती येत असल्याने आता कुक्कुटपालन हाच त्यांचा मुख्य व्यवसाय बनला आहे..Poultry Farming: देशी कोंबड्यांचे आहार व्यवस्थापन.अभ्यासातून गवसले यशव्यवसायाच्या सुरुवातीला आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी अनेक ठिकाणच्या पोल्ट्री फार्मला भेटी दिल्या. त्यावेळी ब्रॉयलर आणि लेअर पोल्ट्री या दोन्ही प्रकारच्या कुक्कुटपालनाविषयी माहिती घेतली. अनेकांचे मार्गदर्शन घेत व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक खर्च, जागा, आर्थिक तजवीज, संगोपन आदी बाबी लक्षात घेतल्या. त्यातून ब्रॉयलर कुक्कुटपालनातील अर्थकारण योग्य वाटले. आणि अखेर बॉयलर कुक्कुटपालन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला..एका खासगी कंपनीसोबत करार तत्त्वावर ब्रॉयलर व्यवसायाची सुरुवात केली होती. कंपनीकडून पक्षी मिळाल्यानंतर ३५ ते ४५ दिवसांपर्यंत त्यांचे संगोपन केले जाते. पक्षी अपेक्षित वजनाचे झाल्यानंतर त्यांची कंपनीला विक्री केली जाते. यामध्ये तंदुरसाठी लागणाऱ्या पक्ष्यांच्या संगोपनासाठी खर्च कमी व पक्षी विक्रीला येण्यास लागणारा कालावधी कमी असल्याने एकूण उत्पन्नात वाढ मिळत गेली..ब्रॉयलर कुक्कुटपालनाच्या एका वर्षात साधारण आठ बॅच घेतल्या जातात. एका बॅचमध्ये साधारण ९ हजार पक्ष्यांचे संगोपन केले जाते. खर्च वजा जाता प्रत्येक बॅचमधून चांगले आर्थिक उत्पन्न हाती येते. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणखी दोन शेड उभारण्यात आली आहेत. त्यात सुमारे २६ हजार पक्ष्यांचे संगोपन केले जाते. असे सुमारे ३५ पक्ष्यांचे संगोपन एकाच वेळी केले जात असल्याचे श्री. महाडीक सांगतात..कोंबडीखताची विक्रीपोल्ट्रीमधून दरवर्षी उत्तम दर्जाच्या कोंबडीखताची उपलब्धता होते. खताची गुणवत्ता चांगली असल्यामुळे शेतकऱ्यांकडून त्यास विशेष मागणी असते. एकूण कोंबडीखतापैकी काही खत घरच्या शेतीसाठी राखीव ठेवून उर्वरित खताची शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विक्री केली जाते..सध्याचे नियोजनपोल्ट्री शेडमध्ये ऋतुनिहाय अपेक्षित बदल करून पक्ष्यांचे संगोपन करण्यावर भर दिला जातो. उन्हाळ्यात शेडमधील तापमान थंड राखण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर हिवाळ्यात शेडमध्ये उष्णता निर्माण करण्यावर भर दिला जातो. तसेच पिण्याच्या आणि खाद्याची भांडी कमी जास्त केली जातात..सध्या थंडीच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे शेडमध्ये आवश्यक ते बदल करत संगोपन केले जात आहे.पक्ष्यांना दैनंदिन खाद्यासह पूरक खाद्य पुरवण्यावर भर दिला जात आहे.सध्या शेडमध्ये दहा दिवस वयाचे पक्षी आहेत. त्यामुळे स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येणार आहे. तसेच शेडमध्ये उष्णता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातील.वेळापत्रकानुसार लसीकरण केले जाईल. जेणेकरून पक्ष्यांमध्ये विविध आजारांप्रती प्रतिकारशक्ती तयार होईल. आणि ते आजारास कमी बळी पडतील..नियोजनावर भरशेडमधील पक्ष्यांच्या आहार आणि आरोग्य व्यवस्थापनावर पहिल्या दिवसापासून ते विक्रीपर्यंत भर दिला जातो. नियमित खाद्य पुरवठा, वेळेवर लसीकरण, शेड निर्जंतुकीकरण आदी बाबींचे काटेकोर पालन केले जाते. त्यासाठी कायमस्वरूपी एक मजूर काम करण्यासाठी ठेवला आहे..पक्ष्यांचे चांगल्या गुणवत्तेचे आणि त्रास होणार नाही असे पाणी पिण्यासाठी उपलब्ध करण्यावर भर दिला जातो. शेडमध्ये पाण्याच्या टाक्या बसविल्या असून त्यात बोअरमधील पाणी सोडले जाते. पाण्याची प्रयोगशाळेतून टीडीएस आणि हार्डनेस तपासणी केल्यानंतरच ते पक्ष्यांना दिले जाते. जेणेकरून पक्ष्यांना पाण्याचा त्रास होणार नाही. आहार आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे पक्ष्यांचे आरोग्य उत्तम राहून मरतुक टाळण्यास मदत होत असल्याचे श्री. महाडीक सांगतात.- जनार्दन महाडीक ९२०६१२९००१(शब्दांकन : संदीप नवले).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.