El Nino Impact: यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल निनो’चे मोठे सावट आहे. त्यामुळे राज्यात सरासरी ८८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धामुळे रासायनिक खतांचा तुटवडा पडू शकतो, अशी चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. २१) राज्यस्तरीय आढावा बैठकीत व्यक्त केली. .पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अपुऱ्या पावसाचा फटका बसू शकतो, अशी माहिती बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिली. यंदाच्या खरीप हंगामात कमी पाऊस आणि खत व्यवस्थापन ही दोन मोठी आव्हाने असतील, मात्र प्रशासन, कृषी विद्यापीठे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने या संकटांचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला..Fertilizer Shortage: राज्यात टंचाईला खत पाणी.सह्याद्री अतिथीगृहावर गुरुवारी (ता.२१) झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पणनमंत्री जयकुमार रावल, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आणि सर्व विभागीय आयुक्त यांनी सादरीकरण केले. या वेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते..मुख्यमंत्री म्हणाले, की यंदाच्या खरीप हंगामात १५२ लाख हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे. यात सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांखाली ८८ लाख हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज होता. मात्र, यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण सरासरीच्या केवळ ८८ टक्के राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विशेषतः पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा तुटवडा अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. जूननंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण क्रमाक्रमाने कमी होत जाण्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच पावसांच्या दोन दिवसांमध्ये मोठे अंतर राहू शकते. .त्यामुळे पिकांवर ताण येऊ शकतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन जलयुक्त शिवारची कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पडणारा पाऊस अडवून सिंचनाची व्यवस्था उभी करण्यावर सरकारचा भर राहील, २०१५ मध्ये ‘एल निनो’च्या प्रभावामुळे मराठवाड्यात जवळपास ३९ टक्के पावसाची तूट होती. त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हानिहाय आपत्कालीन नियोजन तयार ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. दुष्काळाचा ताण सहन करू शकणारी बियाणे, हवामान सल्ला आणि कृषी विद्यापीठांच्या मदतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबाबत कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना सूचना दिल्या आहेत..पुरेसे बियाणे उपलब्धबियाण्यांच्या उपलब्धतेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की राज्याला २०.१६ लाख टन बियाण्यांची आवश्यकता आहे. मात्र आपल्याकडे २८ लाख टन बियाणे उपलब्ध आहेत. सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर आणि बाजरीच्या बियाण्यांचा पुरेसा साठा आहे. बनावट बियाणांमुळे फसवणूक टाळण्यासाठी साथी पोर्टलवर नोंदणीकृत बियाण्यांचीच खरेदी शेतकऱ्यांनी करावी..Fertilizer Shortage: खरीप हंगामावर खतटंचाईचे सावट.खत पुरवठ्याबाबत मात्र मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. राज्याला यंदा ४८ लाख टन खतांचे वाटप झाले असून त्यापैकी २५ लाख टन साठा उपलब्ध आहे. मात्र, जागतिक परिस्थितीमुळे खत पुरवठ्यावर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खतांचा वापर औद्योगिक कारणांसाठी होणार नाही यासाठी आम्ही दक्षता घेऊ. प्रत्येक रेक पॉइंटवर जीआयएस मॅपिंग आणि व्हिडिओग्राफी केली जाणार आहे. खत उतरवताना कृषी विभागाचा कर्मचारी उपस्थित राहील आणि संपूर्ण साखळीवर देखरेख ठेवेल, असेही ते म्हणाले. अनुदानित खतांसोबत लिंकिंगवर कठोर कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत ४०० हून अधिक परवाने निलंबित करण्यात आले असून पुढेही तक्रार आल्यास तातडीने कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले..चार ॲपचे अनावरणबैठकीत कृषी विभागाच्या चार महत्त्वाच्या डिजिटल उपक्रमांचे अनावरण करण्यात आले. ‘महाविस्तार २.०’ या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत हवामान, पीक व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि बाजारभाव याविषयी माहिती मिळणार आहे. एआय आधारित कॉलिंग सुविधेद्वारे शेतकरी थेट संवाद साधू शकणार आहेत. ‘क्रॉप्स ॲप’च्या माध्यमातून पिकाचा फोटो अपलोड करताच पिकाची स्थिती, रोग-कीड आणि आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती मिळणार आहे. तसेच पीकविमा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणाली, तसेच सेंट्रल बँक डिजिटल करन्सी प्रणालीही सुरू करण्यात आली आहे..पेट्रोल-डिझेलची साठेबाजीग्रामीण भागात पुरेसा इंधन पुरवठा असून, तरीही टंचाई जाणवत आहे. यामागे साठेबाजी हे मोठे कारण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही ठिकाणी इंधनाच्या वापरात अचानक २० ते २५ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले..खरिपासाठी चोख नियोजन : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, की खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी जिल्हानिहाय व तालुकानिहाय नियोजन करण्यात आले असून, आवश्यक बियाणे व खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर कमी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन कृषी विभागाने यंदा ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मल्चिंग, सेंद्रिय खत, रुंद वरंबा-सरी तंत्रज्ञान आणि हवामान बदलास सहनशील बियाण्यांच्या वापरावर भर दिला आहे. खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बियाणे उपलब्ध करून देण्यात आले असून खतांचा पुरेसा साठाही राखून ठेवण्यात आला आहे. ‘महाविस्तार’ ॲप, अग्रीस्टॅक योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कृषी धोरण, ड्रोन आणि रोबोटिक्सच्या वापराद्वारे शेती अधिक आधुनिक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.