डॉ. समाधान सुरवसे, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ.अशोक कडलगSugarcane Farming: हवामान बदलाच्या काळात उसाचे सातत्यपूर्ण व दर्जेदार उत्पादन राखणे अत्यावश्यक आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी महाराष्ट्रात हिवाळ्याचा असतो. या काळात विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली जाते. थंडीमुळे ऊस पेशींच्या शारीरिक आणि जैव रासायनिक क्रियांवर एकत्रित प्रतिकूल परिणाम होतो. पेशींची वाढ मंदावते, प्रकाशसंश्लेषण घटते, पानांवर करपलेले तपकिरी डाग दिसतात. काहीवेळा पानांचे टोक पिवळसर व वाळलेले दिसते, त्यामुळे उत्पादनात घट येते. अशा वेळी ऊस पिकाचे योग्य व्यवस्थापन आणि उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक ठरते..थंडीचा उसावर होणारा परिणामथंड हवेमुळे उसाच्या जैविक प्रक्रियांवर थेट परिणाम होतो. ऊस हे उष्ण वातावरणात जोमाने वाढणारे पीक असून त्याच्या प्रकाशसंश्लेषणासाठी २५ अंश सेल्सिअस ते ३५ अंश सेल्सिअस या दरम्यानचे तापमान सर्वाधिक अनुकूल मानले जाते.जेव्हा तापमान १५ अंश सेल्सिअस पेक्षा खाली जाते, तेव्हा प्रकाशसंश्लेषणाची गती घटते. झाडामधील कार्बन डायऑक्साईड निश्चिती कमी होते. परिणामी रसवाहिन्यांमधील चयापचय क्रिया मंदावते, ऊर्जानिर्मिती कमी होते आणि सक्रिय वाढ थांबते..AI In Sugarcane Farming : ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे एकरी उत्पादन वाढवा .थंडीमुळे ऊस पेशींतील एन्झाइम्स निष्क्रिय होतात. श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नवीन वाढीसाठी आवश्यक ऊर्जा मिळत नाही. अशा अवस्थेत पाने पिवळसर होतात, वाढ खुंटते आणि वाढीचा वेग मंदावतो.ज्या शेतकऱ्यांनी आडसाली किंवा पूर्वहंगामी ऊस लागवड उशिरा केली आहे, त्यांना थंडीचा परिणाम अधिक तीव्र जाणवतो. कारण या वेळी अंकुरण अवस्था आणि प्राथमिक वाढीचा टप्पा थंड हवेत येतो. कमी तापमानामुळे मातीतील उष्णता घटते, परिणामी कोंब फुटण्यास विलंब होतो. काही वेळा फुटवे कमी मिळतात किंवा असमान उगवण दिसते. उशिरा लागवड झालेल्या उसात ही समस्या जास्त आढळते, कारण त्या वेळी मुळांची वाढ पूर्ण झालेली नसते आणि थंडीमुळे ती आणखी मंदावते..थंडीबरोबर वातावरणातील आर्द्रता कमी झाल्यास पानांच्या टोकांवर जलांशाची हानी होते. दव पडल्यास पानांच्या पृष्ठभागावरील पेशींच्या आतील द्रव गोठतो आणि पेशी फुटतात. अशा वेळी पाने काळसर, निस्तेज व वाकडी दिसतात. कधी कधी दवामुळे उसाच्या वरच्या गाठींवर साखर गोठल्यास रसवाहिन्यांची क्रिया बंद पडते. त्या भागात नवीन वाढ थांबते..थंडीमुळे ऊस पिकामध्ये अन्नद्रव्ये शोषणांवर होणार परिणामअन्नद्रव्ये थंडीमुळे होणारा परिणाम लक्षणेनत्र शोषण मंदावते, क्लोरोफिल निर्मिती कमी होते पाने पिवळसर होतात, वाढ मंद होते.स्फुरद उपलब्धता कमी होते, मुळांची वाढ कमी होते पाने गडद हिरवी-जांभळी होतातपालाश साखर संचय कमी होते, पेशीभित्ती कमजोर होतात पाने कडांपासून वाळतात.गंधक प्रथिने निर्मिती घटते नवीन पाने पिवळी होतात.झिंक, लोह सूक्ष्मद्रव्यांचे शोषण घटते पानांवर पांढऱ्या/पिवळ्या रेघा दिसतात..उपाययोजनासेंद्रिय खतांचा वापरथंडीमध्ये मातीचे तापमान घटल्यामुळे सूक्ष्मजीव निष्क्रिय होतात, त्यामुळे पोषकद्रव्ये उपलब्ध होत नाहीत. सेंद्रिय खतांमुळे मातीतील जैविक क्रिया पुन्हा सक्रिय होते. एकरी शेणखत १० टन किंवा कंपोस्ट खत ५ टन किंवा गांडूळ खत २ टन किंवा कारखान्याची कुजलेली मळी २ टन किंवा कोंबडी खत २ टन मिसळावे. सोबत ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएमबी १ ते २ किलो सेंद्रिय खतात मिसळून वापर करावे. त्याचप्रमाणे जीवामृताचा एकरी २०० ते २५० लिटर या प्रमाणात वापर करावा..सेंद्रिय खत वापरामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, जमिनीची भौतिक अवस्था सुधारते, जमिनीमध्ये सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढते, सेंद्रिय खतामुळे पोषणद्रव्ये मुळांपर्यंत सहज पोहोचतात. त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता सुधारून ऊस उत्पादन वाढण्यास मदत होते..Sugarcane Farming : अतिवृष्टिबाधित ऊस पिकात करावयाच्या उपाययोजना.माती परीक्षण आधारित रासायनिक खतांचा वापरबहुतांश शेतकरी माती परीक्षण न करता अनियंत्रित प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतात. ऊस पिकामध्ये माती परीक्षण आधारित रासायनिक खतांचा वापर करावा.मातीच्या प्रकारानुसार तसेच समस्याग्रस्त जमिनीनुसार एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. थंडीत जास्त नत्र दिल्यास फक्त ऊस हिरवा दिसतो, परंतु त्याच्यामध्ये साखरसंचय कमी होतो. स्फुरदामुळे मुळांची वाढ व ऊर्जा संचय वाढतो. पालाशमुळे पेशीभित्ती मजबूत राहतात. साखर संचय सुधारतो, रोगप्रतिकारशक्ती वाढते. झिंक, लोह, मॅंगेनीज किंवा बोरॉन ही सूक्ष्मअन्नद्रव्ये उसामध्ये साखरेच्या गुणवत्तेसाठी तसेच मुळांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहेत..संतुलित पोषणामुळे पिकाची वाढ आणि साखर निर्मिती दोन्ही सुधारतात.अनावश्यक नत्र वापर टाळल्याने रोगप्रादुर्भाव कमी होतो. मुळांची शोषण क्षमता टिकते, त्यामुळे थंडीच्या काळातही पोषकद्रव्ये प्रभावीपणे शोषली जातात. साखरेची गुणवत्ता वाढते आणि उत्पादन अधिक लाभदायक होते.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने विकसित केलेले मल्टी मॅक्रोन्युट्रीएंट आणि मल्टी मायक्रोन्युट्रीएंट प्रत्येकी १० मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली असता पिकामध्ये प्रकाशसंश्लेषणाची कार्यक्षमता वाढते. वसंत ऊर्जा ५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी..ह्युमिक ॲसिड १ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी केली असता अन्नघटकांचे शोषण वाढते.१ टक्का पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी करावी, त्यामुळे पेशींच्या रसदाबात वाढ होऊन पाणी व पोषण वहन सुलभ होते.पाच टक्के झिंक सल्फेट आणि पाच टक्के फेरस सल्फेट यांची एकत्रित फवारणी केली असता क्लोरोफिल निर्मितीत वाढ होऊन पानातील पिवळेपणा कमी होतो..पाचट आच्छादनजमीन व्यवस्थापनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मातीतील आर्द्रता, उष्णता आणि पोषणद्रव्यांचे संतुलन राखणे.थंडीच्या काळात मातीतील तापमान कमी होते आणि मुळांची कार्यक्षमता कमी होते.उसामध्ये खालील वाळलेली पाने कडून सरीत पाचट आच्छादन करणे खूप फायद्याचे ठरते. त्यामुळे मातीचे तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने जास्त राहते, ज्यामुळे मुळे थंडीत जास्त सक्रिय राहतात, मातीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढतो, सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढते. आच्छादन मातीतील ओलावा टिकविते, ज्यामुळे पिकाला सिंचन कमी करावे लागते..पाणी व्यवस्थापनगरजेनुसार हलके सिंचन : पिकाची वाढ कमी होऊ नये, मुळांपर्यंत पुरेसे पाणी द्यावे.िबक सिंचन वापर : पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचवते, जलव्यवस्थापन नियंत्रित राहते.सिंचनाची योग्य वेळ : सकाळी ८ ते १० वाजता किंवा संध्याकाळी ४ ते ६ वाजता पाणी द्यावे, रात्री मोकाट सरीमध्ये पाणी देणे टाळावे.पाणी गुणवत्ता : खारवटपणा कमी असलेले पाणी वापरावे.- डॉ. समाधान सुरवसे, ९८६०८७७०४९, डॉ. अभिनंदन पाटील, ९७३७२७५८२१,(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु., पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.