Indian Agriculture : सोलापूर पावसाचा हंगाम सुरू होऊन तब्बल तीन महिने उलटले, तरी सोलापूर जिल्ह्यात अजून एकही दमदार पाऊस झालेला नाही. आकाशात केवळ ढगांची गर्दी होते आणि हलक्या-मध्यम सरी कोसळतात; परंतु या पावसाने जमिनीची ओल भागत नसल्याने पिकांची गरज पूर्ण होत नाही. परिणामी, सोयाबीन, तूर, उडीद, भुईमूग या पिकांसह कांदा, भाजीपाल्याची तहानलेली पिके पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत. यामुळे संपूर्ण खरीप हंगामच मोठ्या संकटात सापडला आहे..सोलापूर जिल्ह्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ४९ हजार ७६६ हेक्टर असताना प्रत्यक्ष ३ लाख ३७ हजार ९६८ हेक्टरवर (१०३.५ टक्के) पेरणी पूर्ण झाली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी यंदा मुख्य नगदी पीक म्हणून सोयाबीनला पसंती दिली. जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ८१ हजार २७० हेक्टर असताना तब्बल १ लाख २८ हजार ३४६ हेक्टरवर (१५८ टक्के) पेरणी झाली आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा ताण दिल्याने आता ऐन वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या टप्प्यात असलेले सोयाबीनचे पीक ओलाव्याअभावी माना टाकू लागले आहे. त्याशिवाय तूर, उडीद, मूग या पिकांचीही स्थिती अशीच आहे..Marathwada Rain Break: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पिके ताणावर.बार्शी तालुक्यात सोयाबीनची सर्वाधिक ८४ हजार ९७० हेक्टरवर (१५० टक्के) पेरणी झाली असून, तेथील एकूण खरीप पेरणी १२२.६ टक्के आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात सोयाबीन १५७१७ हेक्टर, अक्कलकोटमध्ये १२२८१ हेक्टर, तर करमाळा तालुक्यात एकूण पेरणी १३६.१ टक्के झाली आहे. याउलट, माढा तालुक्याला पावसाच्या तुटीचा मोठा फटका बसला असून, तेथे केवळ ५९.३ टक्के पेरणी होऊ शकली आहे..त्याशिवाय कडधान्य पिकांमध्ये तुरीची जिल्ह्यात ५८ हजार १६६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. अक्कलकोट (२१,०२४ हेक्टर) आणि दक्षिण सोलापूर (९६५८ हेक्टर) या तालुक्यांमध्ये तुरीचे क्षेत्र मोठे असून, पावसाच्या अभावामुळे या पिकाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. याशिवाय, भुईमुगाच्या सरासरी ५२८९ हेक्टर क्षेत्रापैकी अवघ्या २७४६ हेक्टरवर पेरणी झाली असून, उगवलेले पीक पाण्याच्या ताणाने वाळत चालले आहे. बाजरीची पेरणीही अवघ्या ४९ टक्क्यांवरच (१६७१० हेक्टर) थांबली आहे. सध्या फुलोऱ्यात असलेल्या सोयाबीन आणि तूर या पिकांना जगवण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. पण त्यापूर्वीच अनेक भागांत आता पिके माना टाकू लागल्याचे चित्र आहे..Rainfall Deficit: तूर खुंटली, कपाशी काळवंडली, सोयाबीन करपले.सप्टेंबर आला, तरी पावसाची तूट कायमसोलापूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ४८१.१ मिलीमीटर आहे. पण सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत जून ते आजपर्यंत प्रत्यक्ष केवळ १८८.१ मिमी (६३.१ टक्के) पाऊस झाला असून, १०९.८ मिमीची तूट निर्माण झाली आहे. पण तोही दमदार आणि सरसकट नाही. वास्तविक, जून-जुलै महिन्यात १९७.३ मिमी सरासरीच्या तुलनेत १५७.४ मिमी (७९.८ टक्के) पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने अधिकच ताण दिला. १००.६ मिमी सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष केवळ ३०.७ मिमी (३०.५ टक्के) पाऊस पडल्याने ही तूट अधिक वाढली आणि आज सप्टेंबर महिना आला, तरी ती वाढतेच आहे..माझ्याकडे ७ एकर सोयाबीन आहे, अर्धा एकर मुळा आहे. कांद्याचे रोप लागणीला आले आहे. लिंबूची बाग आहे. पण पाऊसच नाही, विहिरीच्या पाण्याने तर तळ गाठलाय. लिंबू, सोयाबीन सुकून चाललंय. पावसाने मोठा दगा दिलाय, काय करावं कळेना.- रमाकांत गरड, शेतकरी, रानमसले, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.