Agriculture University Student Growth : कृषी विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर एक विद्यार्थी म्हणून वर्षभरात आमच्यामध्ये बरेच आश्वासक बदल घडले आहेत. कृषी विद्यापीठात एक ‘बी’ म्हणून रुजल्यावर पहिल्या वर्षात आम्ही कृषी शिक्षण आणि विद्यापीठाच्या परिसराशी समरस झालो. अनेकांना पहिल्यांदाच घराबाहेर, गावाबाहेर वसतिगृहात राहण्याचा आणि कुटुंबापासून सुद्धा दूर राहण्याचा महत्त्वाचा अनुभव आला. .आईपासून नाळ तोडल्यावर बाळाच्या स्वतंत्र जीवनाला सुरुवात होते, अगदी त्याचप्रमाणे घराशी नाळ तोडून आमच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली. जणू एक आनंददायी स्वप्न संपून खऱ्या आयुष्याची पाऊलवाट दिसू लागली. आई-वडिलांचे कष्ट, त्यांचा संघर्ष, त्याग आणि माया यांची नव्याने जाणीव झाली. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास उरात भरून येऊ लागला. एकेक अभ्यासक्रम शिकताना, शिक्षकांना, नव्या अनुभवाला सामोरे जाताना स्वत:ची स्वप्ने आकार घेऊ लागली आहेत..Agricultural University Vacancy: कृषी विद्यापीठांत ५७ टक्के जागा रिक्त.दापोलीच्या वनशास्त्र महाविद्यालयात प्रवेश घेताना काहीशी धाकधूक होतीच. ही केवळ आमच्या उच्च शैक्षणिक प्रवासाची सुरुवात नव्हती तर आमच्या व्यक्तिगत विकासाची, निसर्गाशी असलेल्या आमच्या नात्याची ओळख होण्याची सुरुवात होती. आंधळेपणाचे अनेक प्रकार असतात. पण वृक्ष-आंधळेपणा हा आपला स्थायीभाव झाला आहे. इथे आल्यापासून आम्ही झाडांना बघायला, त्यांची ओळख करून घ्यायला, अगदी त्यांच्याशी हितगुज करायला सुरुवात केली. .कृषी विद्यापीठाच्या परिसरात चालताना दिसणारी झाडे, त्यांच्या बिया, पक्षी, फुलपाखरे यांच्याविषयी कुतूहल निर्माण झाले. एकंदर निसर्गाशी ओळखीचं रूपांतर मैत्रीत झाले. अनेक प्रश्न पडायला लागले आणि त्यांची उत्तरं शोधली पाहिजेत, ती कशी शोधावी हे शिक्षकांनी दाखवून दिले आणि निसर्ग आमचा सखा झाला.वसतिगृह म्हटले, की नियम, कायदे, शिस्त आलीच आणि त्याचबरोबर जबाबदारी. स्वच्छता, टापटीप, कुणाला लवकर उठण्याची तर कुणाला नियमित व्यायामाची सवय जडली. .Agriculture University: अति‘रिक्त’ विद्यापीठे.वसतिगृहात कुणासोबत राहायचं याचा निर्णय विद्यार्थांच्या हातात नव्हता पण कित्येक अनोळखी सोबत्यांनी कधी मनात ‘रूम’ केली ते कळलं देखील नाही. अनेकांनी मेसची जबाबदारी घेत जिन्नस खरेदी, पैशांची बचत याचा अनुभव पहिल्यांदाच घेतला. सहकारी तत्त्वावर मेस असल्यामुळे जेवणाची चव चांगलीच असते, पण मुख्य म्हणजे अन्नाची किंमत समजली. वसतिगृह म्हणजे स्वावलंबन आणि काटकसरीने जगण्याचे धडे घेण्याचे ठिकाणच..आमच्यापैकी अनेकजण चंचल, रागीट अगदी शीघ्रकोपी होते. पण येथील वातावरणात शांत आणि स्थिर व्हायला मदत झाली. इतरांच्या भावना समजून घेणे शिकलो आणि अति विचार करणे थांबवले. काहींनी त्यासाठी ध्यान, प्राणायाम करायला सुरुवात केली. प्रत्येकाची भाषा, लहेजा वेगळा असल्यामुळे भयगंड असायचे, पण ते मागे पडून आता आम्ही अधिक आत्मविश्वासाने संवाद साधू लागलो. आम्ही स्वत:च्या सवयींवर लक्ष देऊन संवाद कौशल्य वाढवले, आर्थिक शिस्त लावून घेतली. .अनावश्यक खर्च टाळणे, पैशांची बचत करणे या चांगल्या सवयी हळूहळू अंगी यायला लागल्या आहेत. यातून आम्ही अधिक स्वावलंबी आणि जबाबदार झालो. अगदी स्वत:चे कपडे धुणे असो वा स्वत:ची काळजी घेणे, कामांचे नियोजन करून ती वेळेत पूर्ण करणे शिकलो. मित्र, मैत्रिणी आजारी असतील तर त्यांना कसा आधार द्यावा हेही कळलं. अशा अनेक सकारात्मक बदलांच्या माध्यमातून आम्ही आज कृषी विद्यापीठात रुजून आलो असलो, तरी आजची रोपे उद्याचे वृक्ष नक्कीच होऊ, हा आत्मविश्वास मिळाला, हे नक्की.- स्नेहा धोत्रे, वेदान्त कदम(द्वितीय वर्ष, वनशास्त्र महाविद्यालय, दापोली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.