Fodder Cultivation : पौष्टीक चाऱ्यासाठी ओट, लसूण घास लागवड

Garlic Grass Fodder : लसूण घासामुळे जनावरांची भूक वाढते. पचनक्रिया सुधारते. शारीरिक झीज भरून निघते. हाडांची योग्य प्रमाणात वाढ होते. दुधाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
Fodder Cultivation
Fodder CultivationAgrowon
Published on
Updated on

डॉ. संदीप लांडगे, डॉ. शिवाजी दमामे

लसूण घास (मेथी घास)

  • हे द्विदलवर्गीय बहुवार्षिक सदाहरित चारा पीक असून हिरव्या चाऱ्यात प्रथिने, अ व ड जीवनसत्त्वे इत्यादी घटकांचे पुरेसे प्रमाण असते. हिरव्या चाऱ्यात १९ ते २२ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.

  • लसूण घासामुळे जनावरांची भूक वाढते. पचनक्रिया सुधारते. शारीरिक झीज भरून निघते. हाडांची योग्य प्रमाणात वाढ होते. दुधाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

  • लागवडीसाठी चांगली निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. हे पीक तीन वर्षांपर्यंत टिकणारे असल्यामुळे जमिनीची चांगली मशागत करावी. प्रति हेक्टरी १० टन शेणखत मिसळावे. एक नांगरट व कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

  • पेरणीसाठी खात्रीशीर, शुद्ध व जातिवंत बियाणे वापरावे. बऱ्याच वेळा बियाण्यामध्ये अमरवेल या परोपजीवी वनस्पतींच्या बियाण्याचा समावेश असण्याचा संभव असतो. त्यामुळे खात्रीशीर स्रोताकडूनच बियाणे घ्यावे.

  • पेरणीसाठी आर.एल. ८८, आनंद-३ या सुधारित जातींचे प्रति हेक्टरी २५ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम या जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी.

  • जमिनीचा उतार बघून पाणी योग्य व समप्रमाणात देता येईल असे वाफे तयार करून घ्यावेत. वाफ्यामध्ये ३० सेंमी अंतरावर काकऱ्या पाडाव्यात. हेक्टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. त्यानंतर अशा काकऱ्यामध्ये चिमटीने बी पेरून हाताने काकऱ्या बुजवून घ्याव्यात. ओळीत बियाणे पेरणी केल्यास खते देणे सोईचे होते तसेच हातकोळप्याचा वापर करून आंतरमशागतीच्या खर्चात बचत होते. शेतकरी अनेकदा बी फोकून पेरणी करतात, त्यामुळे जास्त प्रमाणात बियाणे वापरावे लागते आणि आंतरमशागतीची कामे करताना अडचणी निर्माण होतात.

Fodder Cultivation
Animal Fodder : दुधाळ जनावरांसाठी ज्वारी, मका पौष्टिक चारा
  • प्रत्येक चारा कापण्यानंतर २० किलो नत्र व ५० किलो स्फुरद किंवा १०० किलो डीएपी प्रति हेक्टरी द्यावे.

  • बी पेरल्यानंतर पहिले पाणी हळुवार द्यावे. त्यासाठी वाफ्याच्या तोंडाजवळ गोणपाट टाकावे जेणेकरून बी वाहून जाणारे नाही. तुषार सिंचनाचा वापर केल्यास रानबांधणी आणि पाणी देण्याच्या खर्चात तसेच पाण्यातही बचत होऊन उत्पादन वाढते.

  • प्रत्येक कापणीनंतर खुरपणी करावी.

  • हेक्टरी १२ कापण्यांमध्ये हिरव्या चाऱ्याचे १००० ते १२०० क्विंटल उत्पादन मिळते.

बरसीम (घोडा घास)

  • मेथीसारखे दिसणारे पण अधिक उंची असणारे पालेदार, लुसलुशीत व चविष्ट द्विदलवर्गीय चारा पीक आहे. क्षारयुक्त जमिनीतही चांगल्या प्रकारे येते. थंड व उबदार हवामानास उत्तम प्रतिसाद देते.

  • हिवाळ्यात थंडीची कालावधी वाढल्यास अधिक कापण्या आणि चारा उत्पादन वाढते. हिरव्या चाऱ्यात १७ ते १९ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.

  • मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पेरणीपूर्वी एकदा नांगरणी व कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत हेक्टरी ५ टन शेणखत मिसळावे.

  • पेरणीसाठी वरदान, मेस्कावी या सुधारित जातींचे प्रति हेक्टरी ३० किलो बियाणे वापरावे. बियाणे पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम या जिवाणू संवर्धकाची बीज प्रकिया करावी. या पिकास नत्र कमी आणि स्फुरद जास्त लागते. हेक्टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे.

  • एक खुरपणी व एक कोळपणी करून शेत तणविरहित ठेवावे.

  • पहिली कापणी पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी व नंतरच्या कापण्या २१ ते २५ दिवसांनी कराव्यात.

हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ६०० ते ८०० क्विंटल उत्पादन ३ ते ४ कापण्यांद्वारे मिळते.

ओेट

  • ओट हे गव्हासारखे दिसणारे, परंतु गव्हापेक्षा थोडे उंच वाढणारे आणि भरपूर फुटवे असणारे एकदल वर्गीय चारा पीक आहे. या पिकास सातू असेही संबोधले जाते. चाऱ्यात ९ ते १० टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.

  • ओट हे उत्पादनक्षम, पोषक असून त्याचा वापर हिरवा चारा व भुस्सा अशा प्रकाराने करता येतो. पाला हिरवागार, रसाळ, रुचकर आणि पौष्टिक आहे. खोडदेखील रसाळ व लुसलुशीत असते. त्यामुळे जनावरे सर्वच भाग आवडीने खातात.

  • दुभत्या जनावरांना हा चारा दिल्यास दूध उत्पादन आणि दुधातील स्निग्धांश वाढण्यास मदत होते.

Fodder Cultivation
Oat Fodder cultivation : पोषक, सकस चाऱ्यासाठी ओट लागवड
  • पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन लागवडीसाठी निवडावी. पेरणीपूर्वी एकदा नांगरट आणि कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत हेक्टरी ५ टन शेणखत मिसळावे.

  • नोव्हेंबर महिन्यात दोन ओळींत ३० सेंमी अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी. पेरणीसाठी फुले हरिता (बहू कापणीसाठी), फुले सुरभी किंवा केंट (एक कापणीसाठी), या सुधारित जातींचे हेक्टरी १०० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर या जिवाणू संवर्धकाची बीजप्रकिया करावी.

  • हेक्टरी १२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. यापैकी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश पेरणीच्या वेळी, तर उर्वरित ४० किलो नत्र पेरणीनंतर २५ दिवसांनी व ४० किलो नत्र पहिल्या कापणीनंतर प्रति हेक्टरी द्यावे.

  • साधारणपणे २५ ते ३० दिवसांत खुरपणी करावी. आवश्यकतेनुसार १० ते १२ दिवसांनी सिंचन करावे.

  • पहिली कापणी ५० दिवसांत व दुसरी कापणी पहिल्या कापणीनंतर ३५ दिवसांनी अथवा ५० टक्के पीक फुलोऱ्यात असताना करावी. हिरव्या चाऱ्याकरिता कापणी जमिनीपासून १० सेंमी उंचीवर करावी.

  • दोन कापण्यांद्वारे हिरव्या चाऱ्याचे हेक्टरी ५०० ते ६०० क्विंटल उत्पादन मिळते.

- डॉ. शिवाजी दमामे, ८२७५५९२२६२

(अखिल भारतीय सम‍न्वित चारा पिके संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com