डॉ.आनंद गोरे,डॉ. पपिता गौरखेडे, सुरेश खटिंग Protect Kharif Crops During Rainfall Break: पाऊस कमी असला तरी जल संधारण, पाण्याची बचत आणि उपलब्ध पाण्याचा आधुनिक सिंचन पद्धतीने कार्यक्षम वापर आणि मृद ओलावा संवर्धन करावे. पुढील पावसाचे पाणी जलसंधारण सऱ्यांद्वारे शेतात मुरवा, उपलब्ध सेंद्रिय अवशेषांनी आच्छादन करा, योग्य वेळी आंतरमशागत करून आच्छादन करावे, जमिनीतील भेगा बुजवा आणि पिकाच्या अवस्थेनुसार मातीची भर द्यावी. कमी खर्चाच्या जैविक निविष्ठांचा वापर करावा आणि फवारणीतून अन्नद्रव्यांची फवारणी करावी..ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात पावसात मोठा खंड पडला आहे. विविध हवामान संस्थांच्या अंदाजानुसार आगामी काळात जोरदार पावसाची शक्यताही कमी आहे. खरिपातील प्रमुख पिके सध्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत आहेत. त्याचवेळी नेमका पावसाचा खंड पडल्याने, पिकांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. सध्याची पीक वाढीची अवस्था आणि हवामानाची परिस्थिती पाहता सर्व शेतांमध्ये एकसारखे व्यवस्थापन करणे योग्य नाही. .प्रत्येक शेतातील जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा, पिकाची अवस्था, पिकाची वाढ, पाण्याची उपलब्धता आणि पुढील हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. शेतातील माती हातात घेऊन तिच्यामध्ये पुरेसा ओलावा आहे का हे तपासावे. पिकाची पाने सकाळच्या वेळी तजेलदार आहेत का, दुपारच्या वेळी पाने वाकतात का, पाने गुंडाळली जात आहेत का, वाढ मंदावली आहे का, फूलगळ होत आहे का, याचे निरीक्षण करावे, त्यानुसार पिकांना संरक्षित सिंचन देण्याचा निर्णय घ्यावा..Rain Crop Management: पावसानंतरचे पीक व्यवस्थापन.ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल, शेततळे, कालवा किंवा अन्य सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी उपलब्ध पाण्याचा संरक्षित सिंचनासाठी वापर करावा. हलक्या जमिनीवरील पाण्याचा जास्त ताण बसलेल्या पिकांसाठी, त्यांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित सिंचनाचा वापर करावा. सिंचनासाठी शक्यतो, ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा..सध्या जो काही पाऊस पडेल तो शेतात मुरविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी शेताच्या उतारानुसार जलसंधारणाच्या सऱ्या काढाव्यात. पुढील नियोजनासाठी शक्य तिथे कंपार्टमेंट बंडिंग, शेततळ्यातील पाण्याचा कार्यक्षम वापर, पावसाचे पाणी शेताबाहेर वेगाने वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. शेताच्या उतारानुसार योग्य ठिकाणी पाणी अडविण्याची व्यवस्था करावी. पाणी अडवा, पाणी जिरवा आणि उपलब्ध ओलावा पिकाच्या मुळांपर्यंत टिकवून ठेवावा. या सूत्रानुसार शक्य ते व्यवस्थापन करावे. कापूस, तूर यासारख्या अधिक अंतरावरील पिकांत एक ते दोन ओळीनंतर जल संधारण सरी काढावी..कमी पावसाच्या सध्याच्या परिस्थितीत तण हे पिकांशी पाणी,अन्नद्रव्ये, सूर्यप्रकाश व जागेसाठी स्पर्धा करते. त्यामुळे तण नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः पावसाच्या खंड काळात तण नियंत्रण केल्यास मातीतील उपलब्ध ओलावा मुख्य पिकासाठी उपयुक्त ठरतो. सध्या पिकांची अवस्था पाहून खुरपणी आणि कोळपणी करावी. पीक फुलावर असल्यास कोळपणी टाळावी. मजूर उपलब्ध नसल्यास संबंधित पिकासाठी उगवणपश्चात तणनाशकाचा शिफारशीनुसारच वापर करावा..Rain Dry Spell: पावसाच्या खंडामुळे खरीप अडचणीत.आंतर मशागत करताना पिकांच्या अवस्थेनुसार हलक्या कोळपण्या कराव्यात आणि जमिनीला पडलेल्या भेगा बुजवाव्यात, तण नियंत्रण करावे.परंतु पीक फुलावर असताना कोळपणी करू नये. फळबागेत कोळपणीवर भर द्यावा.पावसाचा दीर्घ खंड पडल्यास विशेषतः मध्यम ते भारी जमिनीत जमिनीच्या पृष्ठभागावर भेगा पडू शकतात. या भेगांमधून जमिनीतील ओलावा वेगाने निघून जाण्याची शक्यता असते. म्हणून पिकाच्या योग्य अवस्थेत आंतरमशागत करून पृष्ठभागावरील भेगा बुजवाव्यात. यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते..पावसातील खंड आणि त्यानंतर मध्यम पाऊस अशा स्थितीत शेताचे नियमित निरीक्षण करावे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद व मक्यामध्ये पानांवरील कीड, शेंगा/बोंडांवरील कीड, खोडकिडी या शिवाय रसशोषण करणाऱ्या किडींचे निरीक्षण करावे. शिफारशीनुसार फवारणी करावी. रोगांची लक्षणे तपासावीत. कमी खर्चाचे तंत्रज्ञान जसे , की फेरोमोन सापळे, पिवळे चिकट सापळे, पक्षी थांबे आणि निंबोळी अर्क किंवा इतर जैविक उपायांचा योग्य वापर करावा. रासायनिक कीटकनाशकांचा वापर केवळ गरजेनुसार आणि शिफारशीनुसार करावा..ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे पिकांचे अवशेष जमिनीवर ठेवणे किंवा योग्य आच्छादनाचा वापर करणे फायदेशीर ठरते. आच्छादनामुळे बाष्पीभवन कमी होते, जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकतो, जमिनीचे तापमान नियंत्रित राहते, तणांची वाढ कमी होते,जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढण्यास मदत होते. भुसा किंवा इतर पिकांचे अवशेष पाच टन प्रति हेक्टरी वापरावे. किंवा सुबाभूळ, गिरीपुष्प यांचा पाला तीन टन प्रति हेक्टरी आच्छादन म्हणून वापरावा. साधी कोळपणी करून मातीचे आच्छादन करावे..पावसाचा खंड पडून जमिनीतील ओलावा कमी झाल्यास आणि पिकांची वाढ मंदावल्यास, जमिनीतून अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत पिकाच्या अवस्थेनुसार पर्णीय अन्नद्रव्यांची फवारणी करता येते. पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५): दोन टक्के द्रावण, म्हणजे २० ग्रॅम प्रति लिटर पाणी, फवारणी करता येईल किंवा १९:१९:१९ (पाण्यात विरघळणारे नत्र, स्फुरद, पालाश): एक टक्का द्रावण, म्हणजे १० ग्रॅम प्रति लिटर पाणी, फवारणी करता येईल. १० लिटर पाण्यासाठी अनुक्रमे २०० ग्रॅम १३:००:४५ किंवा १०० ग्रॅम १९:१९:१९ आवश्यक राहील. सध्या पाण्याची फवारणी सुद्धा करता येईल. यामुळे काही दिवस पाण्याचा ताण सहन करता येईल. सध्या हळद, ऊस आणि फळपिकात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा. गांडूळ खत, जैविक खते वापरावीत.- डॉ.आनंद गोरे ९५८८६४८२४२(अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.