Global Cotton Market: ‘एल निनो’च्या सावटात नव्या जागतिक कापूस हंगामाला सुरुवात झाली आहे. नव्या हंगामात भारताला बरेच महत्त्व असणार आहे. भारताची कापूस आयात विक्रमी पातळीवर होऊन शिल्लक साठा वाढेल असे देशातील उद्योगांचे म्हणणे आहे. तर जागतिक कापूस उत्पादनात घट होईल पण वापर वाढेल यामुळे कापूस भावाला आधार राहील, असा अंदाज ‘यूएसडीए’ने दिला आहे. .जागतिक कापूस हंगाम १ ऑगस्टपासून सुरू झाला. अमेरिकेच्या कृषी विभागाने, अर्थात ‘यूएसडीए’ने नव्या हंगामाचा संभाव्य अहवाल प्रसिद्ध केला. तर भारताच्या ‘काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘सीएआय’ने ऑगस्ट महिन्याचा अहवाल जारी केला. आपला नवा हंगाम १ ऑक्टोबरला सुरू होतो. जागतिक हंगाम सुरू झाल्याने महत्त्वाच्या देशांमध्ये उत्पादन, वापर, निर्यात, आयात आणि साठ्याची काय परिस्थिती राहू शकते याचा अंदाज घेण्यासाठी यूएसडीएच्या अहवालाची उकल करणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे सीएआयने यंदा शिल्लक कापूस ९३ लाख गाठींवर राहील, असा अंदाज दिल्याने दीड महिन्यानंतर सुरू होणाऱ्या हंगामावरील पडसाद समजून घेणे आवश्यक आहे..Indian Cotton Farmers Challenges: भारतातील कापूसकोंडी कशी सुटेल?.जागतिक कापूस वापराचा विचार केला, तर चीन आणि भारताचा वाटा ५५ टक्के आहे. त्यामुळे जागतिक बाजारावर या दोन देशांमधील घडामोडींचा परिणाम दिसून येतो. त्यातही चीनचे वजन जास्त आहे. या दोन्ही देशांमध्ये कापसाचा वापर चांगला होत आहे. याचा आधार केवळ चीन आणि भारतच नाही तर जागतिक बाजारालाही मिळत आहे. सध्या जागतिक बाजारात कापसाचा भाव टिकून आहे. कापसाला चांगली मागणी, मानवनिर्मित धाग्याचे वाढलेले भाव आणि कापसाचा कमी झालेला पुरवठा ही प्रमुख कारणे आहेत. .या कारणांमुळे जागतिक बाजारात कापसाचा भाव गेल्या वर्षभरात २५ टक्क्यांनी आणि मागील सहा महिन्यांत ३८ टक्क्यांनी वाढलेला आहे. जागतिक बाजारात गेले वर्षभर कापसाचा भाव ६५ सेंट प्रति पाउंडच्या आसपास खेळत होता. जानेवारी २०२६ मध्ये कापसाने ही पातळी सोडली आणि आज कापूस भाव ८० सेंटच्या आसपास दिसत आहे. इराण-अमेरिका युद्धानंतर जागतिक बाजारात मानवनिर्मित धाग्याचे भाव वाढले आहेत. यामुळे कापसापासून निर्मित धाग्याला मागणी वाढली. त्यातच यंदा एल निनोमुळे जागतिक कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या दोन्ही कारणांमुळे कापसाला झळाळी मिळाली आहे..भारताची विक्रमी आयातभारत गेली २० वर्षे कापसाचा निर्यातदार म्हणून ओळखला जायचा. पण भारत यंदा विक्रमी कापूस आयात करण्याची शक्यता आहे. सीएआयच्या अंदाजानुसार यंदाची आयात ६२ लाख गाठींवर पोहोचेल. यापैकी जुलैच्या शेवटपर्यंत ५४ लाख गाठी कापूस आयात झालेला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आणखी ८ लाख गाठी आयातीची शक्यता आहे. विशेष म्हणजे भारत आतापर्यंत अतिरिक्त लांब धाग्याच्याच कापसाची आयात करत होता. पण मागील दोन वर्षांपासून २७ ते ३२ सेंटिमीटर लांबीच्या कापसाची- म्हणजे देशात ज्या प्रकारचे उत्पादन होते त्या कापसाचीही- आयात वाढत आहे. ही आयात वाढण्यामागे सरकारचे धोरण हे एक प्रमुख कारण आहे. सरकार सातत्याने शुल्कमुक्त आयातीला परवानगी देत आहे. आताही ३० सप्टेंबरपर्यंत शुल्कमुक्त आयात असेल. त्यामुळे देशात कापसाची उपलब्धता असतानाही आयात वाढत आहे. देशातील कापसाची गुणवत्ता नसल्याने आयात कापसाचा वापर वाढत असल्याचे उद्योगांनी म्हटले आहे..देशातही कापसाचा भाव वाढलेला आहे. भारताच्या कापडाची आयात काहीशी पिछाडीवर दिसत असली तरी सुताला चांगला उठाव आहे. चीनची मागणी चांगलीच वाढली आहे. चीनला होणारी निर्यात ७ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर वाढली आहे. म्हणजेच तीन पट वाढ नोंदविली गेली आहे. पण वाढत्या आयातीमुळे देशात शिल्लक कापसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. सीएआयच्या मते देशात ९३ लाख गाठी कापूस शिल्लक राहील. त्यातच देशातील लागवड क्षेत्र जवळपास गेल्या वर्षीच्या पातळीवर पोहोचले आहे. तरीही पावसाचे असमान वितरण आणि पुढील काळात उष्णता वाढीच्या अंदाजामुळे उत्पादकतेवर परिणाम होण्याची भीती आहे. परिणामी भारताच्या १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामातील उत्पादनाविषयी साशंकता आहे. तसेच कापसाची मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे. यामुळे विक्रमी आयातीने वाढलेल्या शिल्लक साठ्याचा फार दबाव येण्याची शक्यता दिसत नाही..चीनची मागणीचीन कापूस वापरात आजही आघाडीवर आहे. सध्या चीनची कापसाला मागणी वाढलेली आहे. चीन कापड निर्मितीत मानवनिर्मित धाग्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. जागतिक वापराच्या दोन तृतीयांश मानवनिर्मित धाग्याचा वापर एकट्या चीनमध्ये होतो. पण मानवनिर्मित धाग्याचा भाव वाढला आहे. यामुळे चीनमध्ये कापड निर्मितीत कापूस सुताचा वापर वाढत आहे. चीन प्रामुख्याने अमेरिका आणि ब्राझीलमधून कापूस आयात करतो. पण इराण युद्धामुळे जागतिक कापूस पुरवठा साखळीही काहीशी विस्कळीत झाली. परिणामी, ब्राझील आणि अमेरिकेतून आयातीचा खर्च (फ्रेट) वाढलेला आहे. यामुळे अमेरिका आणि ब्राझीलमधून चीनला होणारी निर्यात कमी झाली. त्यातच चीनच्या चलनाचे डाॅलरच्या तुलनेत अवमूल्यन झाले. .मागील वर्षभरात चीनच्या युआनचे मूल्य ६ टक्क्यांनी घटले आहे. यामुळे चीनला आयात करणे परवडत आहे. चीन शेजारच्या भारताकडून सुताची खरेदी करत आहे. नव्या हंगामातही चीनमधील कापूस उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. मागील हंगामात चीनने ४५८ लाख गाठी कापसाचे उत्पादन घेतले होते. यंदा हे उत्पादन ४२८ लाख गाठींवर स्थिरावण्याची शक्यता आहे. चीनमध्ये सध्या कापूस पिकाला कमी पाऊस आणि उष्णतेचा फटका बसत असल्याचे चीनमधील काही वृत्तपत्रे आणि यूएसडीएने आपल्या पीक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. यामुळे अंदाजापेक्षा चीनमधील कापूस उत्पादनात जास्त घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चीनची कापूस आयात २०२५-२६ च्या हंगामात वाढली होती. पण नव्या हंगामात आयातही ७ टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. चीनचा कापूस वापर मात्र दीड टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे चीनची सुताची आयात टिकून राहील, असा अंदाज यूएसडीएने व्यक्त केला आहे. यामुळे चीनची आयात नव्या हंगामात वाढण्याची शक्यता आहे..India Cotton Market: कापसाकडे कल, पण आव्हाने कायम.यूएसडीचा संदेशयूएसडीएने जागतिक कापूस उत्पादनात साडेतीन टक्क्यांची घट येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, चीन, टर्की आणि पाकिस्तान या देशांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. पण कापूस वापर जवळपास दोन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. भारत, चीन, बांगलादेश, अमेरिका, ब्राझील आणि पाकिस्तानमध्ये कापसाचा वापर वाढणार आहे. त्यामुळे नव्या जागतिक कापूस हंगामात वापर न झालेल्या कापसाचा शिल्लक साठा ७ टक्क्यांनी कमी राहणार आहे, अशी शक्यता यूएसडीएने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. यामुळे जागतिक बाजारात कापसाला चांगला उठाव असल्याचे स्पष्ट होत आहे..यंदा एल निनोचा परिणाम जागतिक कापूस पुरवठ्यावर दिसणार आहे. अमेरिकेत कापसाची लागवड वाढूनही उत्पादनात २ टक्के घट होण्याचा अंदाज आहे. अमेरिकेच्या कापसाची विक्री सध्या वाढलेली आहे. व्हिएतनाम, पाकिस्तान, बांगलादेश, मेक्सिको आणि भारत अमेरिकेच्या कापसाची खरेदी करत आहेत. ३१ जुलै रोजी संपलेल्या कापूस हंगामात अमेरिकेने १४५ लाख गाठी कापूस निर्यात केला आहे. अमेरिकेच्या कापूस आयातीत व्हिएतनामनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. नव्या हंगामातील १२ लाख गाठी कापूस पहिल्याच आठवड्यात विकलेला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच अमेरिकेच्या कापसाला भारत, व्हिएतनाम आणि पाकिस्तानकडून चांगली मागणी आहे. यामुळे नव्या हंगामात अमेरिकेच्या कापसाला चांगला आधार राहून आंतरराष्ट्रीय बाजारही टिकून राहण्यास मदत होईल, असा असे यूएसडीएने म्हटले आहे..भारतात वापर वाढणारभारतात कापसाचा वापर सध्या वाढला आहे. चीनकडून असलेली सुताची मागणी आणि विकसित देशांना होणारी कापडाची निर्यात आणि देशांतर्गत मागणी यामुळे कापसाचा वापर वाढत आहे. सीएआयने देशातील कापूस वापर चालू हंगामात ३४८ लाख गाठी होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर यूएसडीएने भारताचा कापूस वापर नव्या हंगामात २ टक्क्यांनी वाढून विक्रमी पातळीवर पोहोचेल, असे म्हटले आहे. भारताची कापूस आयात मात्र नव्या हंगामात ३७ टक्क्यांनी कमी राहील. शुल्कमुक्त आयातीची सप्टेंबरमध्ये संपणारी मुदत, कमी जागतिक कापूस पुरवठा, यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भाव टिकून राहतील. परिणामी, भारताची कापूस आयात घटेल, असा अंदाज यूएसडीएने व्यक्त केला आहे..भारताची सूत निर्यात ८ टक्क्यांनी वाढली आहे. भारताच्या रुपयाचे डाॅलरच्या तुलनेत झालेले अवमूल्यन सूत निर्यातीला आधार देत आहे, असे उद्योगांचे म्हणणे आहे. भारताची कापडाची निर्यात काहीशी कमी दिसत असली तरी त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. भारताने यूके, युरोपियन युनियन आणि न्यूझीलंडसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत. या करारानुसार हे देश भारताच्या कापूस उत्पादनांची शुल्कमुक्त आयात करणार आहेत. अमेरिका, युरोपियन युनियन आणि यूके हे तीन बाजार भारताच्या निर्यातीसाठी महत्त्वाचे आहेत. यापैकी अमेरिकेसोबत व्यापार कराराची बोलणी सुरू आहे. पण निर्यातीसाठी संधी उपलब्ध होत असल्याने कापड निर्यातीलाही नव्या हंगामात चालना मिळू शकते, असे यूएसडीएने म्हटले आहे..एकूणच काय तर देशात कापसाचा शिल्लक साठा ९३ लाख गाठींवर राहण्याची शक्यता असली तरी जागतिक पुरवठा कमी राहणार आहे. जागतिक भाव टिकून राहिल्यास शेजारच्या देशांना कापसाची निर्यात वाढण्याची शक्यता आहे. तसेच देशातून सूत आणि कापडाची निर्यातही वाढण्याला पोषक स्थिती आहे. त्यातच एल निनोमुळे देशातील उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. याचा बाजाराला आधार राहील..तसेच सरकारने यंदा कापसाच्या हमीभावात वाढ केली आहे. कापसाचा हमीभाव ८ हजार ६६८ रुपये आहे. सीसीआय नव्या हंगामातही कापूस खरेदी करणार आहे. चालू हंगामात सीसीआयने विक्रमी १०५ लाख गाठी कापसाची खरेदी केली होती. सीसीआयच्या कापसाची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. नवा हंगाम सुरू होताना सीसीआयची गोदामे खाली होऊ शकतात, असे सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सीएआयचा अंदाज जास्त शिल्लक साठ्याचा असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि एल निनोचे पिकावरील सावट, यामुळे कापूस बाजाराला आधार राहणार आहे. सध्याच्या परिस्थितीवरून कापूस नव्या हंगामात भाव खाण्याची शक्यता आहे. हंगामाच्या पहिल्या ४ ते ५ महिन्यांमध्ये कापूस हमीभावाच्या आसपास राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत.(लेखक ॲग्रोवन डिजिटलचे कंटेन्ट लीड आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.