Yosemite National Park: अमेरिकेतील ताहो तलाव जगातील सर्वांत निर्मळ आणि खोल तलावांपैकी एक आहे. तलावाचे पर्यावरण जपण्यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित सेन्सर्सचा वापर केला जातो. योसेमिटी व्हॅलीमध्ये क्लायमेट डेटा स्टेशनमध्ये सेन्सर्स, सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि बिग डेटा अॅनॅलिटिक्सचा वापर करून जैवविविधतेतील बदलांचा बारकाईने अभ्यास होतो. हवामान बदलाच्या काळात पर्यावरण आणि शेती संवर्धनासाठी माहिती तंत्रज्ञानाची साथ महत्त्वाची ठरणार आहे..अमेरिकेतील कॅलिफोर्निया परिसरात फिरताना मला ताहो तलाव, योसेमिटी नॅशनल पार्क आणि योसेमिटी व्हॅली या पर्यटन स्थळांना भेट देता आली. ताहो तलावातील निर्मळ, निळसर पाणी, हिमाच्छादित पर्वतरांगा आणि किनाऱ्यावरील शांत वातावरण पाहताना मन भारावून जाते. निसर्ग फक्त दृश्य नाही; तो आपल्याला शांतता, सहनशीलता आणि नवचैतन्य अनुभवायला शिकवतो. आत्म्याला आध्यात्मिक शांतता देण्याची शक्ती निसर्गात आहे..योसेमिटी नॅशनल पार्कमध्ये चालताना ओल्या मातीचा सुगंध आणि झाडांच्या सावलीतली उब मनाला आल्हाद देते. भव्य धबधबे कोसळताना निर्माण होणारा आवाज जणू स्वतःची गाथा सांगतात. या प्रवासात केवळ निसर्ग सौंदर्यच नव्हे तर माहिती तंत्रज्ञानाची साथ तसेच शास्त्रीय दृष्टिकोनातून पर्यावरणाचे संवर्धनाचे महत्त्व किती आवश्यक आहे, हे समजाऊन घेता आले..ताहो तलावाचे सौंदर्यअमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि नेवाडा राज्यांच्या सीमेजवळ वसलेला ताहो तलाव हा जगातील सर्वात निर्मळ आणि खोल तलावांपैकी एक आहे. दोन दशलक्ष वर्षांपूर्वी झालेल्या भूगर्भीय हालचाली तसेच हिमनद्यांच्या प्रवाहांमुळे हा तलाव निर्माण झाला. ‘ताहो’ या स्थानिक अमेरिकन जमातीच्या शब्दाचा अर्थ ‘मोठे पाणी’ किंवा ‘आकाशाचे आरसे’ असा होतो. ताहो तलावाच्या परिसराला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. इतक्या गर्दीनंतरही तलावाचे पाणी निर्मळ ठेवणे ही मोठी जबाबदारी आहे. यासाठी.स्थानिक प्रशासनाने स्मार्ट वॉटर मॉनिटरिंग सिस्टिम बसवली आहे. या प्रणालीद्वारे पाण्यातील प्रदूषणाचे अंश, नायट्रोजन-फॉस्फरसचे प्रमाण, शेवाळाची वाढ इत्यादी घटक सतत तपासले जातात. तलावाभोवती स्थापित केलेल्या इंटरनेट ऑफ थींग्ज आधारित सेन्सर्स पाण्याची गुणवत्ता रिअल टाइममध्ये मोजतात आणि ही माहिती थेट संशोधन केंद्रांना पोहोचते. तलावात फिरणाऱ्या नौकांमध्ये इंधन गळती प्रतिबंधक तंत्रज्ञान वापरले जाते. या सर्व उपक्रमांमुळे ताहो तलाव तंत्रज्ञान आधारित संवर्धनाचे मॉडेल ठरले आहे..Biodiversity Conservation: सर्वांच्या आसमंतात नांदावी जीवसंपदा.रिमोट सेन्सिंग , उपग्रह निरीक्षणनासा (Landsat) आणि ईएसए (Sentinel) उपग्रह ताहो तलावाची दीर्घकालीन पाहणी करतात. पाण्याची स्वच्छता, शेवाळाची वाढ आणि जंगलातील बदल मोजण्यासाठी यांचा उपयोग होतो. यूसी डेव्हीस ताहो पर्यावरण संशोधन केंद्रातील तज्ज्ञ जमा झालेल्या या माहितीचा अभ्यास करून व्यवस्थापन धोरणे आखतात.यूसी डेव्हीस आणि नासा संशोधन संस्थेतील तज्ज्ञ मशीन लर्निंग वापरून हवामान बदलामुळे तलावावर होणारा परिणाम (तापमान वाढ, हिम वितळणे, पाण्याची स्वच्छता घटणे) याचा अंदाज सांगणारे मॉडेल विकसित केले आहेत..ताहो तलावाच्या परिसरात यूसी डेव्हीस ताहो पर्यावरण संशोधन केंद्राने सेंन्सरचे जाळे विकसित केले आहे. हे सेन्सर सातत्याने पाण्याचे तापमान, ऑक्सिजन, सामू, पोषणतत्त्वे आणि स्वच्छता मोजतात. ही माहिती कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राच्या साह्याने एकत्र करून प्रदूषणाचे स्रोत आणि हानिकारक शेवाळ लवकर ओळखण्यासाठी उपयुक्त ठरते.संशोधक ड्रोन्स वापरून तलावकिनाऱ्याची धूप, अवैध कचरा, आगीचे नुकसान तपासले जाते.पाण्यामध्ये चालणारे स्वयंचलित वाहन तलावाच्या तळाशी जाऊन गाळाचे मोजमाप करतात. तसेच परकीय प्रजाती शोधतात.कॉम्पूटर व्हिजन तंत्रज्ञान आणि आधुनिक कॅमेरा वापरून पाण्यातील परकीय शिंपले, क्लॅम्स आपोआप ओळखले जातात. यामुळे वेळ वाचतो आणि शास्त्रज्ञ त्वरित उपाययोजना करू शकतात..जंगलातील वणव्यांचे नियंत्रणताहो राष्ट्रीय जंगलामध्ये LiDAR तंत्रज्ञान वापरून जंगलाचे त्रिमितीय नकाशे तयार केले जातात. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेली मॉडेल्स जंगलातील वणव्यांचा धोका वाढलेल्या भागांची आगाऊ सूचना देतात.नागरिक सहभागासाठी मोबाइल अॅप्सताहो राष्ट्रीय जंगल आणि तलावाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र माहिती देणारे ॲप विकसित करण्यात आले आहे. हे ॲप स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठी महत्त्वाचे ठरते. यामध्ये तलावातील शेवाळ वाढ, पाण्याची स्थिती, कचऱ्याची नोंद केली जाते. ही माहिती शास्त्रज्ञांच्या डेटामध्ये जोडली जाते आणि संवर्धन निर्णय अधिक अचूक घेतले जातात..डेटा एकत्रीकरण प्लॅटफॉर्म्सगुगल अर्थ इंजीन, क्लाऊड एआय डॅश बोर्डमध्ये उपग्रह, सेन्सर, ड्रोन आणि नागरिकांकडून मिळालेली माहिती एकत्र होते. यातून व्यवस्थापकांना रिअल-टाइम माहिती मिळते. ते लगेच यावर कृती करतात. ही सर्व व्यवस्थापन यंत्रणा यूसी डेव्हीस ताहो पर्यावरण संशोधन केंद्र, नासा, ताहो संरक्षित उद्यान आणि अमेरिकेच्या वन खाते यासारख्या नामांकित संस्थांनी प्रत्यक्षात अंमलात आणलेली आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेन्सर यांचा वापर ताहो तलावाच्या संवर्धनासाठी केवळ सैद्धांतिक नाही, तर प्रत्यक्षात सिद्ध आणि यशस्वी पद्धतीने चालू आहे..Biodiversity Conservation: देवराया : जैवविविधता जोपासणारी व्यवस्था.भारतातही पर्यावरण संवर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. उपग्रह निरीक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून गंगेचे पाणी, चिल्का तलाव, लोणार सरोवर यांची स्वच्छता आणि पातळी सतत तपासली जाऊ शकते. इंटर नेट ऑफ थींग्ज तंत्रज्ञान आधारित सेन्सर्स नदी आणि तलावांमध्ये बसवून प्रदूषणाचे स्रोत (औद्योगिक सांडपाणी, शेतीतील रसायने) रिअल-टाइममध्ये ओळखता येतील. ड्रोन आणि LiDAR मॅपिंग वापरून जंगलातील बदल, पूरक्षेत्र, वणव्यांचा धोका मोजणे शक्य आहे. ॲप विकसित करून नागरिकांचा सहभाग वाढवून जलसंपदा जपण्याची जबाबदारी सर्वांमध्ये विभागली जाऊ शकते..कॅलिफोर्नियातील योसेमिटी नॅशनल पार्क हे जगातील सर्वात प्रसिद्ध निसर्ग वारसा जपणारे स्थळ आहे. १८९० मध्ये स्थापन झालेल्या या उद्यानात उंच ग्रॅनाईटच्या भिंती असणारे डोंगर, जगप्रसिद्ध धबधबे आणि प्राचीन सिकोया वृक्ष आहेत. योसेमिटी हा शब्द स्थानिक अहवानीची जमात आणि शेजारच्या स्थानिक भाषांमधून आलेला आहे. या शब्दाचा मूळ अर्थ ‘भय निर्माण करणारा’ किंवा ‘आदर वाटणारा’ अशा संकल्पनांशी जोडलेला आहे. परंतु काळ जसजसा पुढे गेला, तसतसा या नावामध्ये भीतीऐवजी निसर्गाची भव्यता, दैवी शक्ती आणि जीवन देणारी ऊर्जा यांचा संदर्भ जोडला गेला. .स्थानिक जमातींसाठी योसेमिटी हे केवळ एक दरी किंवा टेकडी नव्हती, तर धरतीमातेचे हृदय होते. अहवानीची जमातीमधील लोक असे मानायचे की, पर्वत हे आत्म्यांचे निवासस्थान आहेत आणि धबधबे हे देवत्वाचे प्रवाह आहेत. धबधब्यांच्या गर्जनेत त्यांना विश्वाची शक्ती, तर वाहणाऱ्या पाण्यात जीवनाचा अखंड प्रवाह दिसायचा. त्यांनी शिकवले की, निसर्गाशी संघर्ष न करता त्याच्याशी एकात्मतेने राहावे..डिजिटल प्रणालीचा वापरयोसेमिटी व्हॅलीतील धबधबे, जसे की योसेमिटी धबधबा (जगातील सर्वांत उंच धबधब्यांपैकी एक, सुमारे २,४२५ फूट) स्थानिकांसाठी आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक होते. या पाण्यात आत्मशुद्धी, तर पर्वतांमध्ये संरक्षण मिळते, अशी त्यांची श्रद्धा होती. आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या धबधब्यांचे जलप्रवाह, दगडांच्या क्षरणाचा वेग तसेच हवामान बदलाचा परिणाम अभ्यासला जातो. पण या सर्व संशोधनामागे स्थानिक तत्त्वज्ञानाची छटा अजूनही जाणवते, निसर्गाचा अभ्यास करायचा म्हणजे त्याच्याशी संवाद साधणे हे ध्येय आहे..योसेमिटी नॅशनल पार्कमध्ये दरवर्षी चर दशलक्षांहून अधिक पर्यटक येतात. मोठ्या प्रमाणात गर्दी असूनही येथे निसर्गाची शुद्धता टिकवण्यासाठी आधुनिक डिजिटल व्यवस्थापन प्रणाली कार्यरत आहेत. पार्कमध्ये सॅटेलाईट-आधारित नकाशे वापरून जंगलातील आगीचे तत्काळ नियंत्रण केले जाते.ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने प्राणी-पक्ष्यांची हालचाल, झाडांची आरोग्यस्थिती आणि पाण्याचे स्रोत यांचा अभ्यास होतो. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्हिज्यूअल मॉनिटरिंग सिस्टिम्सद्वारे पर्यटकांनी नियम पाळले की नाही हे तपासले जाते..उद्यानामध्ये शून्य कचरा धोरण अंमलात आणण्यासाठी स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम आहे, ज्यामुळे कचरा तात्काळ वर्गीकरण आणि पुनर्वापरासाठी पाठवला जातो. योसेमिटी व्हॅलीमध्ये दररोज हवामान बदलाचे निरीक्षण केले जाते. येथे बसवलेल्या क्लायमेट डेटा स्टेशनमध्ये सेन्सर्स, सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी आणि बिग डेटा अॅनॅलिटिक्स वापरले जातात. यामुळे तापमान, पर्जन्यमान, मातीतील आर्द्रता आणि जैवविविधतेतील बदल यांचा बारकाईने अभ्यास होतो. वैज्ञानिक येथे मशीन लर्निंग अल्गोरिदम्स वापरून हवामान बदलाचे दीर्घकालीन परिणाम ओळखतात. काही भागात व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटकांना संवर्धनाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता येते..Biodiversity Conservation: जैवविविधताच मानवाला वाचवेल.जुन्या वृक्षांचे संवर्धनयोसेमिटी व्हॅली ही या उद्यानाची मध्यवर्ती दरी असून ती लाखो वर्षांपूर्वी हिमनद्यांच्या प्रवाहाने तयार झाली आहे. दरीभोवती उंच ग्रॅनाईट डोंगर आहेत, आणि त्यांच्या कुशीतून उंच धबधबे कोसळतात. या दरीला स्थानिक आदिवासी लोक ‘अहवानी’ म्हणजेच सुरक्षित निवारा असे म्हणतात. आज ही दरी केवळ नैसर्गिक सौंदर्यासाठी नाही तर आधुनिक संशोधन प्रयोगशाळा म्हणून प्रसिद्ध आहे. योसेमिटी नॅशनल पार्कमध्ये पूर्वीच्या काळी वृक्षतोडीचे प्रसंग घडले. परंतु नंतरच्या काळात अमेरिकन काँग्रेसने निसर्गसंपत्ती जपण्याचे धोरण स्वीकारले. आज या उद्यानात ३,००० वर्षांहून अधिक जुनी सिकोया वृक्षांची रांग आपल्याला दिसते. एवढे प्राचीन वृक्ष जगभरात फार थोड्या ठिकाणी आढळतात. ते पाहताना जाणवते, की एक झाड म्हणजे केवळ लाकूड किंवा सावली नव्हे, तर शेकडो प्रजातींचे घर, हजारो वर्षांचा इतिहास आणि पृथ्वीच्या वातावरणाचे संतुलन राखणारा एक स्तंभ आहे..जिओ सेन्सर्स, रडार तंत्रज्ञानाचा वापरयोसेमिटी व्हॅलीतील ग्रॅनाइट कडे आणि डोंगर भूस्खलनसाठी ओळखले जातात. जिओ सेन्सर्स आणि रडार तंत्रज्ञान वापरून खडकांच्या हालचालींचे मापन केले जाते आणि धोकादायक भागांपासून पर्यटकांपासून दूर ठेवले जाते. योसेमिटी नॅशनल पार्कमध्ये संवर्धन केवळ पाणी व हवामानापुरते मर्यादित नसून, खडकांची स्थिरता, धबधब्यांचा प्रवाह, गर्दी नियंत्रण, सांस्कृतिक वारसा आणि वन्यजीव-मानव संघर्ष टाळणे या सर्व बाबींमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. या सर्व उपक्रमांमधून एक गोष्ट स्पष्ट होते, निसर्गाचे रक्षण आता केवळ परंपरेवर नाही, तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नवकल्पनांवरही अवलंबून आहे. .ताहो तलावातील पाणी संवर्धन, योसेमिटीतील जंगल, जैवविविधतेचे रक्षण आणि व्हॅलीतील हवामान अभ्यास हे सर्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य झाले आहे. आज जगभरातील संवर्धनासाठी अमेरिका जे मॉडेल उभे करत आहे ते केवळ पर्यावरणपुरतेच मर्यादित नाही, तर ते भविष्यातील मानवी अस्तित्वासाठीची हमी आहे. ताहो आणि योसेमिटीप्रमाणे स्मार्ट तंत्रज्ञान, जागरूकता आणि शाश्वत व्यवस्थापन अवलंबले, तर आपले तलाव, पर्वत आणि जंगल वर्षानुवर्षे सुंदर, स्वच्छ आणि जीवसृष्टीस पूरक राहतील. संवर्धन हे फक्त जबाबदारी नाही, तर आपल्या निसर्गाशी नाळ जोडणारा अनुभव आहे..धबधब्यांचा प्रवाह सांगणारे मॉडेलयोसेमिटीतील धबधबे हे बर्फ वितळण्यावर अवलंबून आहेत. हायड्रोलॉजिकल सेन्सर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले मॉडेल्स पाण्याचा प्रवाह आणि धबधबा कोरडे पडण्याच्या संभाव्य वेळेची अचूक सूचना देतात.वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनउद्यानामध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येतात. जीपीएस आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ट्रॅफिक मॅनेजमेंट वापरून गाड्यांची गर्दी, पार्किंग व शटल बसेसची हालचाल नियंत्रित केली जाते, ज्यामुळे प्रदूषण कमी होते..वन्यजीव-पर्यटक संघर्ष टाळण्याचा प्रयत्नअस्वल तसेच इतर वन्य प्राणी वारंवार पर्यटक क्षेत्रात येतात. आरएफआयडी कॉलर्स, ट्रॅकिंग डिव्हाइस आणि कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले कॅमेरे वापरून प्राण्यांची हालचाल नोंदली जातेआणि अॅपद्वारे पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिला जातो.ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक वारसा जतनयोसेमिटीमध्ये आदिवासी वसाहतींचे अवशेष आणि सांस्कृतिक स्थळे आहेत. त्रिमितीय लेझर स्कॅनिंग, डिजिटल आर्काइविंग करून या वारशाचे डिजिटल संवर्धन पाहण्यासारखे आहे..वनस्पती पुनरुज्जीवनदरवर्षी लागणारे वणवे आणि वाढत्या पर्यटनामुळे काही भागात वनस्पती नष्ट होतात. ड्रोन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित इमेजिंग वापरून नुकसानग्रस्त ठिकाणे शोधली जातात. ड्रोन सीडिंग ने झाडे पुन्हा लावली जातात.amrutavijaykumarshelar @gmail.com(रिसर्च फेलो, रासायनिक अभियांत्रिकी आणि जैवतंत्रज्ञान, तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.