Pune News: राज्यातील वाढत्या थंडीचे सातत्य टिकून राहिल्याने रब्बी पिकांसह फळबागांवर त्याचे प्रतिकूल परिणाम दिसून लागले आहेत. निफाड येथे शनिवारी (ता. २०) राज्यातील सर्वांत कमी ४.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागात ७ अंशांखाली तापमान गेल्याने पिकांवर होणाऱ्या परिणामांची तीव्रता दिसू लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. द्राक्ष, कांदा, टोमॅटोसह भाजीपाला आदी संवेदनशील पिके प्रभावित होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे..मॉन्सूनच्या हंगामात पाऊस दमदार कोसळल्यानंतर यंदा थंडीचा कडाका अधिक असल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यातच पारा नीचांकी पातळीवर आल्याने निफाड येथील गहू संशोधन केंद्रात शनिवारी (ता. २०) यंदाच्या हंगामातील नीचांकी ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यंदा महाराष्ट्र अधिक गारठण्याचा अंदाज असल्याने उर्वरित हिवाळा हंगामात थंडीच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता आहे..Maharashtra Winter: राज्यात थंडीची लाट; राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता.राज्यात रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र ५७.८० लाख हेक्टर असून १६ डिसेंबरअखेर ४९.७४ लाख हेक्टर क्षेत्रावर (८६ टक्के) पेरणी झाली आहे. लांबलेल्या पाऊसमानामुळे अद्यापही राज्यात ज्वारी, हरभरा, गहू, करडई व मका पिकांची पेरणी आणि कांदा, उसाची लागवड सुरू आहे. ज्या भागात याआधी पेरणी झाली आहे. तेथे ज्वारी वाढीच्या ते पोटरीच्या अवस्थेत आहे. तर, गहू वाढी व मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत आहे. मका, हरभरा, करडई, सूर्यफूल आदी पिके वाढीच्या, तर काही भागात हरभरा फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आहे. अशातच थंडी १५ अंशांखाली हरभऱ्यास, तर ७ अंशांखाली गव्हास त्रासदायक ठरू शकत असल्याने शेतकऱ्यांनी तातडीच्या उपाययोगांना प्राधान्य देण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे..द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, संत्रा, मोसंबी फळबागांवरही किमान तापमानाचा परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. यंदाच्या हिवाळ्यात (डिसेंबर ते फेब्रुवारी) महाराष्ट्रासह मध्य भारतात कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरी ते सरासरीच्या खाली राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्यानुसार यंदा महाराष्ट्र अधिकच गारठण्याची तसेच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटा अधिक दिवस टिकून राहण्याचा इशारा देण्यात आला, त्याप्रमाणे डिसेंबर महिन्यातही राज्यात थंडी वाढून थंडीच्या लाटांची स्थिती सध्या अनुभवावयास येत आहे..नोव्हेंबर महिन्यातही किमान तापमानाचा पारा घसरल्याने महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा अनुभव मिळाला होता. नोव्हेंबरच्या अखेरीच्या पंधरवड्यात राज्यात गारठा वाढल्याने तापमानाचा पारा ६ अंशांपर्यंत घसरला होता. डिसेंबर महिन्यात देखील थंडीचा कडाका वाढतच गेला. राज्यात बहुतांशी ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरल्याने थंडीचा कडाका वाढल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांपार असल्याने कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढल्याचे दिसून आले. यंदा डिसेंबर महिन्यातच नीचांकी तापमानाची नोंद होऊ लागली आहे..डिसेंबरसह उर्वरित हिवाळा हंगामात (जानेवारी आणि फेब्रुवारी) उत्तर आणि मध्य भारतात थंडीच्या लाटा सरासरीपेक्षा दोन ते पाच दिवस अधिक राहणार आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भात तीव्र थंडीच्या लाटा येणार असल्याने थंड दिवस देखील अनुभवायला मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..Climate Change Impact: समायोजन हवामान बदलाशी!.ही ठिकाणे ठरताहेत ‘कोल्ड स्पॉट’निफाड येथील गहू संशोधन केंद्र, धुळे येथील कृषी महाविद्यालय, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठासह, जळगाव, सोलापूर जिल्ह्यातील जेऊर ही ठिकाणे यंदा सातत्याने ‘कोल्ड स्पॉट’ ठरत आहेत. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, बीड, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांतही किमान तापमानात डिसेंबर महिन्यातच कडाका वाढल्याचे दिसून आले आहे.शनिवारी (ता. २०) नीचांकी तापमान नोंद होत, थंडीची तीव्र लाट आलेली ठिकाणे : निफाड ४.५, धुळे ५.३, परभणी (कृषी) ५.५, जळगाव ६, अहिल्यानगर ६.४, नाशिक ६.९..नाशिक जिल्ह्यातील कसमादेपट्ट्यात सध्या द्राक्ष काढणी सुरू आहे. तर, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर, चांदवड तालुक्यांत अद्यापही काही भागातील द्राक्ष बागांत डीपिंग, थिनिंग, घडबांधणी आदी कामे सुरू आहेत. वाढलेल्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांचा विकासावर परिणाम होत आहे. बागांतील गारवा आणि पावडरी मिल्ड्यूच्या (भुरी) प्रतिकारासाठी फवारण्या वाढल्याने उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. आधीच यंदाच्या अति पाऊसमान आणि प्रतिकूल हवामानामुळे जवळपास ६० ते ७० टक्के मालास फटका बसला आहे. अशातच वाढलेल्या थंडीने बागायतदार चिंतेत आहेत.उमेश भालेराव पाटील, द्राक्ष उत्पादक शेतकरी, तीसगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक.दर वर्षीच्या तुलनेत या वर्षी थंडी अधिक आहे. त्याचा लेट खरीप, रब्बी कांद्यावर परिणाम होत आहे. प्रामुख्याने थंडीमुळे कांद्याची वाढ खुंटते. दहा दिवसांत जेवढी वाढ होते, त्याला १८ दिवस लागतात. बुरशी सारखे रोग पडत नाहीत, मात्र दव पडलेल्या जागी कांदा पात तुटते. सध्या थंडीचे प्रमाण १० अंश सेल्सिअसच्या आत आहे. अधिक थंडी पडली तर कांद्यात जोड कांद्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.वैभव गोल्हार, कांदा उत्पादक शेतकरी, बावी, ता. आष्टी.सद्य:स्थितीत टोमॅटो पिकाला थंडीचा मोठा फटका बसत आहे. रात्रीचे तापमान मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे झाडांची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी फुलगळ वाढली असून फळधारणा कमी झाली आहे. थंडीमुळे पानांवर पिवळसरपणा व करपल्यासारखी लक्षणे दिसत आहेत. काही भागात फळे लहान राहून त्यांची गुणवत्ता घसरली आहे. थंड व कोरड्या हवामानामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.विकास हरिभाऊ चव्हाण, रा. पारगाव तर्फे आळे, ता. जुन्नर, जि. पुणे.सध्या संत्रा बागायतदारांकडून आंबिया बहराचे नियोजन केले जात आहे. त्याकरिता दुपारी अपेक्षित तापमान आणि रात्री थंडीची गरज भासते. सध्या दिवसा आणि रात्री असे दोन्ही वेळचे तापमान थंड आहे. त्याचा परिणाम आंबिया बहराच्या व्यवस्थापनावर होत आहे. फळाची अन्न शोषण प्रक्रिया देखील या कारणामुळे मंदावली आहे. त्याचा देखील परिणाम पुढील काळात उत्पादकतेवर होणार आहे. अनेक बागायतदार आंबिया बहर घेण्यासाठी बाग नोव्हेंबर अखेर तानावर सोडून डिसेंबरमध्ये पाणी देतात ते कामही थांबले आहे. मनोज जवंजाळ, संत्रा बागायतदार, काटोल, नागपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.