सुदर्शन लोहार, डॉ. सचिन मोरेजागतिक स्तरावर होत असलेल्या हवामान बदलाचे गंभीर परिणाम पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर दिसून येत आहेत. जीवाश्म इंधनाचे ज्वलन, वृक्षतोड यासारख्या अनेक मानवी हस्तक्षेपामुळे या प्रक्रियेचा वेग वाढत आहे. मानवाकडून विविध प्रक्रियांमधून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंचे प्रमाण वातावरणात वाढत आहे. त्यामुळे २०७० पर्यंत शून्य उत्सर्जनाचे जागतिक उद्दिष्ट गाठण्याकरिता आपण योग्य पावले उचलणे आवश्यक आहे..केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केलेल्या चौथ्या द्विवार्षिक अहवालानुसार (BUR-४), भारत हरितगृह वायू उत्सर्जनात चीन आणि अमेरिका यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२० मध्ये भारताने सुमारे २.९६ अब्ज टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य (CO२ e) इतके उत्सर्जन (जमीन वापर, जमीन वापरातील बदल व वनीकरण वगळून) केले असून, मागील वर्षाच्या तुलनेत उत्सर्जनाचे प्रमाण ७.९३ टक्क्यांनी घटले आहे. मात्र १९९४च्या (१.२१ अब्ज टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य) तुलनेत एकूण उत्सर्जनामध्ये जवळपास अडीच पट वाढ झालेली आहे. (स्रोत ः UNFCCC; MoEFCC, २०२३).Greenhouse Gas Emission : हरित गृहवायूंचे उत्सर्जनात शांघाय, टोकियो, न्यूयॉर्क, ह्युस्टन हॉटस्पॉट.कृषी व संलग्न क्षेत्रातून होणारे हरितगृह वायू उत्सर्जनसन २०२० मध्ये देशातील कृषी व संलग्न क्षेत्रातून सुमारे ४०६ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य इतके हरितगृह वायू उत्सर्जन झाले. ते देशाच्या एकूण उत्सर्जनाच्या १३.७२ टक्के इतके आहे. यामध्ये जनावरांच्या पचनक्रियेदरम्यान निर्माण होणारा मिथेन (५४.८४%), रासायनिक खतांच्या अतिरेकी वापराने प्रदूषित झालेल्या जमिनी (२३.२६ टक्के), भात शेती (१६.६८ टक्के), अयोग्य किंवा दोषपूर्ण सेंद्रिय खत व्यवस्थापन (३.२२ टक्के) आणि इतर घटकांचा (२ टक्के) समावेश आहे..पशुधनभारत हा जगातील प्रमुख दूध उत्पादक देश असून, देशात ५३६.७६ दशलक्ष एवढे पशुधन आहे. यात गाई (१९३.४६ दशलक्ष) व म्हशींचा (१०९.८५ दशलक्ष) सर्वाधिक वाटा आहे. या पशुधनाच्या साह्याने आपण दूध उत्पादनात स्वयंपूर्ण झालो आहोत. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या जनावरांच्या पचनक्रियेतून मोठ्या प्रमाणात मिथेन वायूचे उत्सर्जन होत आहे. (सुमारे २२३ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य)..Greenhouse Gas : हरितगृह वायू उत्सर्जनाची माहिती संकलन.भात शेतीनुकत्याच केंद्रीय कृषिमंत्र्यानी केलेल्या ‘एक्स’वरील पोस्टनुसार, जगातील पहिल्या क्रमांकाचा भात उत्पादक देश झाला आहे. पूर्वी तो चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. २०२२-२३ मधील उपलब्ध माहितीनुसार देशातील भात लागवडीखालील एकूण क्षेत्र सुमारे ४९.५३ दशलक्ष हेक्टर होते. या शेतीतून उत्सर्जित होणारा मिथेन (पाण्यामध्ये केली जाणारी लागवड व पीक अवशेषाचे ज्वलन), नायट्रस ऑक्साईड (नत्रयुक्त खतांचा असंतुलित वापर) आणि कार्बन डायऑक्साइड (सिंचन व अन्य यांत्रिक कामासाठी वापरलेली ऊर्जा) अशा हरितगृह वायूचे उत्सर्जन होत आहे. (सर्व एकत्रित ६७.७३ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य)..खतांचा वापरभारत हा चीननंतर खतांचा सर्वाधिक वापर करणारा दुसरा प्रमुख देश आहे. खत सांख्यिकी अहवालानुसार, २०२२-२३ मध्ये देशात सुमारे २९.८० दशलक्ष टन नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) युक्त खतांचा वापर करण्यात आला होता. यामध्ये नत्रयुक्त (N) खतांचा वाटा सर्वाधिक (२०.२४ दशलक्ष टन) आहे. प्रामुख्याने युरिया खताच्या असंतुलित वापरामुळे नायट्रस ऑक्साइड वायूचे उत्सर्जन वाढत आहे. (५३.५० दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य)..Carbon Credit : हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी कार्बन क्रेडीट.शेतीतील वाढता वीज वापरशेताच्या सिंचनासाठी शेतकरी वीज पंपांचा (विद्युत मोटार) वापर करतात. २०२२ मध्ये शेतीतील वीज वापर सुमारे २४०.८० अब्ज युनिट्स इतका होता. तो देशाच्या एकूण वीज वापराच्या १७.२० टक्के एवढा आहे. यामुळे तब्बल १७८.९० दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य उत्सर्जन झाले..कृषी व संलग्न क्षेत्र ः एकूण उत्सर्जनकेंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०२० मध्ये कृषी क्षेत्रातून होणारे एकूण उत्सर्जन ४०६ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य इतके होते. यात शेतीच्या कामासाठी वापरलेल्या विजेमुळे झालेले उत्सर्जन धरल्यास एकूण कृषी व संलग्न क्षेत्रातील हरितगृह वायू उत्सर्जन ५८५ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य इतके होते. ही एक निश्चितच चिंताजनक बाब आहे..Methane Emission: पशुपालनातून मिथेन उत्सर्जन कमी करण्याचे उपाय.तक्ता क्र. ३ मध्ये देशातील प्रमुख पिकांखालील क्षेत्रातून होणाऱ्या हरितगृह वायू (GHG) उत्सर्जनातील बदलांचे तुलनात्मक विश्लेषण सादर केले आहे. यानुसार देशात भात, गहू, मका, सोयाबीन, मोहरी, कापूस, फळे, भाजीपाला आणि पशुधन या घटकांद्वारे होणाऱ्या हरितगृह वायू उत्सर्जनात लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने पिकाखालील क्षेत्राचा विस्तार, सिंचनाची तीव्रता, रासायनिक खतांवरील अवलंबित्व आणि हरित क्रांतीनंतर वाढलेले यांत्रिकीकरण या घटकांशी संबंधित आहे..भाताच्या बाबतीत पूरस्थित शेतांमधून होणारे मिथेन उत्सर्जन हा प्रमुख घटक आहे, तर गहू आणि मका यांच्यात नत्रयुक्त खतांमुळे नायट्रस ऑक्साईड उत्सर्जन वाढलेले दिसते. सोयाबीनमधील वाढ मोठ्या प्रमाणावर क्षेत्र विस्ताराशी संबंधित आहे. मोहरी व भाजीपाल्यामध्ये खतांमुळे उत्सर्जन वाढलेले दिसते, तर कापसात सिंचन आणि कीटकनाशकांमुळे होणारे अप्रत्यक्ष उत्सर्जन प्रभावी आहे. फळांमध्ये काढणीपश्चात होणारे नुकसान व ऊर्जेवर आधारित संरक्षित शेतीमुळे उत्सर्जन वाढ झाल्याचे दिसून येते. पशुधनामध्ये दरडोई उत्सर्जन घटले असले तरी एकूण पशुधन संख्या वाढल्यामुळे उत्सर्जन देखील वाढले आहे..याउलट, ज्वारी खालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटल्यामुळे उत्सर्जनात लक्षणीय घट दिसते. भुईमुगामध्ये क्षेत्रघट व पर्जन्याधारित लागवडीमुळे उत्सर्जनात मर्यादित घट झालेली आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या व साठवणुकीच्या पद्धतींची माहिती पुढील भागात घेऊ.- सुदर्शन लोहार (आचार्य पदवी विद्यार्थी), ९८९०२६५८०० डॉ. सचिन मोरे (विभागप्रमुख), ९४२०५३२०७६, कृषी अर्थशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.