Indian Agriculture: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात पाणीटंचाई, वाढता उत्पादन खर्च आणि जमिनीच्या आरोग्याविषयी वाढती जाणीव यामुळे शेती पद्धतीत बदल दिसू लागला आहे. उसानंतर ‘बेवड’ म्हणून रब्बी हंगामात हरभरा लागवडीचे क्षेत्र वाढते आहे. कमी पाण्यात उत्पादन, जमिनीची सुधारणा आणि आर्थिक परतावा या फायद्यांमुळे हरभरा शेतकऱ्यांसाठी व्यवहार्य पर्याय ठरत आहे..कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका हा पारंपरिक ऊस पट्टा म्हणून परिचित आहे. शिरोळ तालुका कृष्णा-पंचगंगा नदीखोऱ्यातील सुपीक जमीन, नद्यांचे जाळे, सहकारी साखर कारखान्यांची मजबूत परंपरा आणि विकसित बाजारपेठ यामुळे ऊस शेतीचा कणा बनला आहे. मात्र बदलते हवामान, पाण्याचे वाढते बंधन, उत्पादन खर्चातील वाढ आणि जमिनीच्या आरोग्याविषयी वाढती जाणीव या पार्श्वभूमीवर अलीकडच्या काळात शिरोळच्या शेतीत पीक नियोजनातील बदलाचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे. ऊस पट्ट्याखालील क्षेत्र म्हणून परिचित असलेल्या शिरोळ तालुक्यात रब्बी हंगामात हरभरा लागवडीचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पीक बदल म्हणून विशेषतः ‘बेवड’साठी हरभऱ्याचा स्वीकार लक्षणीय प्रमाणात वाढत आहे..बेवड म्हणून हरभरा लागवडपूर्वी उसानंतर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी ताग, धैंचा यांसारखी हिरवळीची पिके घेतली जात. ही पिके फुलोऱ्यात आल्यानंतर नांगरून जमिनीत मिसळल्याने सेंद्रिय अंश वाढतो; मात्र त्यातून थेट आर्थिक उत्पन्न मिळत नाही. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर जमिनीची सुधारणा आणि आर्थिक परतावा या दोन्ही गोष्टी साध्य करणारा पर्याय म्हणून हरभऱ्याकडे शेतकरी वळताना दिसत आहेत. हरभऱ्याच्या मुळांवर रायझोबियम जिवाणूंच्या गाठी तयार होतात. हे जिवाणू वातावरणातील नत्र जमिनीत स्थिर करतात. त्यामुळे जमिनीतील नत्राची पातळी वाढून पुढील पिकासाठी खतांचा खर्च काही प्रमाणात कमी होतो. बेवड म्हणून हरभरा घेतल्यास जमिनीची अन्नद्रव्ये, पाणी आणि योग्य वातावरण उपलब्ध करून देण्याची क्षमता वाढते. शिवाय विक्रीयोग्य उत्पादनही मिळते. याच दुहेरी फायद्यामुळे पारंपरिक हिरवळीच्या पिकांपेक्षा हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे..Chana Sowing: लातूर जिल्ह्यात हरभराच हुकमी पीक.कमी पाण्यावर समाधानकारक उत्पादनशिरोळ तालुका नदीकाठचा असला, तरी सर्वच क्षेत्र वर्षभर मुबलक पाण्याखाली नसते. विजेच्या वेळा, भूजलपातळीतील चढ-उतार यांचा शेती नियोजनावर परिणाम होत असतो. ऊस हे दीर्घकालीन आणि अधिक पाण्याची गरज असलेले पीक असल्याने त्याचे व्यवस्थापन आव्हानात्मक ठरते. विशेषतः आडसाली ऊस दीड वर्षापर्यंत शेतात राहतो आणि त्याची तोडणी व नियोजन शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे..या पार्श्वभूमीवर हरभरा हे कमी कालावधीत आणि तुलनेने कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून पुढे येत आहे. साधारण ९० ते ११० दिवसांत तयार होणाऱ्या या पिकाला दोन-तीन पाण्यात चांगले उत्पादन मिळते. खरिपानंतर जमिनीत उरलेल्या ओलाव्यावर हरभरा चांगला वाढत असल्याने पाण्याची बचत आणि जोखीम नियंत्रण या दोन्ही बाबी साध्य होत आहेत. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हरभरा हा अधिक व्यवहार्य पर्याय म्हणून पुढे येत आहे. यंदा हरभऱ्यानंतर ऊस लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक दिसून येत आहे..जमिनीचा समतोल राखलासतत ऊस लागवड केल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा समतोल बिघडलेला दिसून येतो. रासायनिक खतांचा जास्त वापर, जड मशागत आणि दीर्घकालीन पिकांमुळे मातीची रचना बिघडण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत पीक फेरपालटीचा भाग म्हणून हरभरा जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. हरभऱ्याची मुळे खोलवर वाढत असल्याने जमिनीतील घट्ट थर सैल होण्यास मदत होते. त्यामुळे जमीन अधिक भुसभुशीत होऊन पाणी व हवा खेळती राहते. काही भागांत जमिनीचा सामू वाढल्याचेही निदर्शनास येते. अशा स्थितीत हरभऱ्यासारखे कडधान्य पीक घेतल्याने जमिनीचे जैविक संतुलन टिकवण्यास मदत होत आहे. सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढल्याने सूक्ष्मजीव सक्रिय राहून माती अधिक सुपीक बनते..Chana Cultivation: अकोला, वाशीममध्ये हरभरा लागवड घटली.ऊस लागवड पॅटर्नमध्ये बदलरब्बी हंगामाची पेरणी साधारणतः १५ ऑक्टोबरपासून सुरू होऊन १५ जानेवारीपर्यंत चालते. मात्र यंदा ऊस गळीत हंगामातील अडचणी, मजुरांची कमतरता आणि यांत्रिक कापणीमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकरी पीक फेरपालटीकडे वळताना दिसत आहेत. यंदा गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्याने आणि ऊसतोड मजुरांची टंचाई भासल्याने हार्वेस्टरद्वारे ऊस तोडीचे प्रमाण वाढले आहे. आडसाली ऊस जास्त लोळत असल्याने मशिनद्वारे ऊस तोड करताना नुकसान होत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. यामुळे खोडवा क्षेत्रात रब्बीत हरभरा घेऊन पुढील खरिपात पूर्वहंगामी ऊस लागवड करण्याचा पर्याय अनेक शेतकरी स्वीकारत आहेत..यांत्रिकीकरणामुळे लागवड सुलभशेतीच्या विविध टप्प्यांवर यांत्रिकीकरणाचा पर्याय उपलब्ध झाल्याने हरभरा लागवड अधिक सुलभ झाली आहे. पेरणी यंत्रांद्वारे बियाणे आणि खत एकाच वेळी पेरले जात असल्याने मजुरी खर्च कमी होऊन कामाचा वेग वाढत आहे. मळणीसाठीही आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाल्याने वेळ आणि खर्च दोन्ही कमी होत आहेत. याच कारणामुळे तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये हरभऱ्याचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. सध्या हंगामाच्या सुरुवातीला पेरलेले हरभरा पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून, मध्यम कालावधीत पेरलेला हरभरा फूल-कळी अवस्थेत आहे, तर उशिरा पेरणी केलेले पीक वाढीच्या टप्प्यात आहे. एकूणच, हंगामातील पिकांची स्थिती समाधानकारक असल्याचे चित्र दिसते..प्रात्यक्षिकांमुळे हरभरा लागवडीला चालनापीक बदलाला संस्थात्मक पाठबळही मिळाले आहे. कृषी विभागाने यंदा सुमारे १०० हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची प्रात्यक्षिके राबविली आहेत. सुधारित वाण, बीजप्रक्रिया, संतुलित खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड नियंत्रण याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतीशाळांच्या माध्यमातून तंत्रज्ञान प्रसाराला गती मिळाली आहे. लागवडीसाठी उत्पादनक्षम आणि रोगप्रतिकारक वाण उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. उपलब्ध माहितीनुसार, तालुक्यात यंदा रब्बी हंगामात सुमारे ४५० हेक्टरवर हरभऱ्याची अतिरिक्त लागवड झाली असून, मागील वर्षी हे क्षेत्र सुमारे २५० हेक्टरच्या जवळपास होते. ही वाढ केवळ हंगामी बदल नसून बदलत्या शेती पद्धतीचा संकेत मानला जात आहे. पीक वैविध्य, पाण्याची बचत, जमिनीची सुपीकता आणि आर्थिक स्थैर्य या चार घटकांवर हा बदल आधारलेला दिसतो. तालुक्यात अनेक ठिकाणी डाळ मिल सुरू झाल्याने हरभऱ्याच्या उत्पादनाला स्थानिक बाजारपेठेचा आधार मिळत आहे..‘यंदा तालुक्यात हरभरा क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी विभागामार्फत शेतीशाळा, शेतकरी प्रशिक्षण वर्ग तसेच ‘महा कृषी विस्तार एआय’ अॅपच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. अन्न व पोषण कडधान्य सुरक्षा योजनांतर्गत हरभरा पीक प्रात्यक्षिक राबविण्यात आले आहे. यापूर्वी वैयक्तिक लाभार्थींना अनुदान दिले जायचे. गटामार्फत योजना राबविल्याने क्लस्टर स्वरूपात मार्गदर्शन करणे सोपे जाते. त्यामुळे क्षेत्र व उत्पादन वाढ होण्यास मदत झाली आहे.संजय सुतार, ९४०४९९११२४ उपकृषी अधिकारी, कुरूंदवाड, जि. कोल्हापूर.मी आधी ऊस घेतला होता. उसामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा कमी झाला होता. शेणखत अपेक्षित प्रमाणात उपलब्ध न झाल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत नत्र स्थिरीकरण करणारे आणि जमिनीला पूरक ठरणारे हरभरा पीक घेण्याचा निर्णय घेतला. हरभऱ्यामुळे जमिनीची रचना सुधारते, तसेच पुढील हंगामातील ऊस पिकासाठी पोषक वातावरण तयार होते.बाळासाहेब चौगुले, ९६०४७३४२८७ शेतकरी, जयसिंगपूर.कृषी विभागाच्या ‘आत्मा’अंतर्गत आमच्या शेतकरी गटाची स्थापन करण्यात आली आहे. आलास व बुबनाळ या गावात गटामार्फत १० हेक्टरवर हरभरा पीक प्रात्यक्षिक राबविण्यात आले आहेत.गुणधर हुपरगे, शेतकरी व गटप्रमुख, आलास, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.