डॉ. रामप्रसाद गायकवाड, सुरज कुलकर्णीKharif Season: खरीप हंगामात दर्जेदार पीक उत्पादन मिळविण्यासाठी पेरणीपूर्व मशागत, वाणांची निवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आदी बाबींवर विशेष लक्ष दिले जाते. मात्र, बियाण्याची उगवण क्षमता कमी असल्यास त्याचा थेट परिणाम उगवणीवर होतो. उगवण कमी झाल्यामुळे शेतातील रोपांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी राहते. घरगुती स्तरावर उपलब्ध साधने वापरून कमी खर्चात उगवणक्षमता तपासणी करता येते. पेरणीपूर्वी उगवणक्षमता तपासणी केल्यास बियाण्याचा दर्जा, अपेक्षित उगवण टक्केवारी आणि पेरणीसाठी आवश्यक बियाणे प्रमाण निश्चित करता येते. त्यामुळे दुबार पेरणीचा खर्च टाळला जाऊन अपेक्षित रोप संख्या मिळण्यास मदत होते..कोणत्या बियाण्यांची उगवणक्षमता तपासावी?घरचे बियाणे ः मागील हंगामातील पीक उत्पादनातील बियाणे म्हणून राखून ठेवलेले धान्य.सुधारित वाणांचे बियाणे ः स्वतःकडे साठवून ठेवलेले सुधारित वाणांचे बियाणे.सोयाबीन, मूग, उडीद, तूर, मका आणि ज्वारी या पिकांच्या सुधारित वाणांचे बियाणे.अतिवृष्टी, अवेळी पाऊस, गारपीट, कीड- रोगांचा प्रादुर्भाव यामुळे बियाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. अशा बियाण्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.बाजारातून घेतलेल्या प्रमाणित किंवा सरळ वाणांच्या बियाण्यांचीही उगवण क्षमता तपासून खात्री करून घेता येते..Seed Germination Test: बियाण्याची उगवणक्षमता तपासण्याचे ८ फायदे; घरच्या घरी उगवणक्षमता कशी तपासावी?.उगवण क्षमता तपासणीच्या पद्धतीगोणपाट पद्धतपेरणीसाठी वापरणार असलेल्या बियाणांच्या प्रत्येक पोत्यातून मुठभर बियाणे काढून ते एकत्र करून १०० दाण्यांचे ३ नमुने तयार करावेत. गोणपाटाचा ओला तुकडा जमिनीवर पसरून प्रत्येक नमुन्यातील १०० दाणे १०-१० च्या १० रांगेत, दीड-दोन सेंमी अंतरावर मांडावेत. त्यावर गोणपाटाचा दुसरा ओला तुकडा झाकावा आणि पाणी शिंपडून गुंडाळी करून सावलीत ठेवावे. ६ ते ७ दिवसांनी गुंडाळी उघडून कोंब आलेले दाणे मोजावेत.फायदेगोणपाट उघडल्यावर अंकुराबरोबर मुळांची कशी वाढ झाली हे स्पष्ट दिसते.तूर, सोयाबीन, मका अशा लहान-मोठ्या बियाण्यांसाठी ही पद्धत उपयुक्त..शोषक कागद पद्धतप्लास्टिकच्या ट्रेमध्ये शोषक कागदाचे २ ते ३ थर अंथरावेत. कागद चांगला ओला करावा; मात्र त्यामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक ट्रेमध्ये १०० बियाणे समान अंतरावर मांडून ट्रे झाकून २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानाच्या ठिकाणी ठेवावे. दररोज कागदाचा ओलावा तपासून आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे. साधारण ५ ते ७ दिवसांनी ट्रे उघडून चांगली उगवण झालेली बियाणे मोजावीत.फायदेभाजीपाला व इतर लहान आकाराच्या बियाण्यांसाठी अत्यंत उपयुक्त.बियाण्यांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास तो सहज ओळखता येतो.उगवणीबरोबरच अंकुरांची वाढही स्पष्टपणे पाहता येते.उगवण टक्केवारी अचूकपणे मोजण्यासाठी सोपी पद्धत..Seed Germination Test: बियाणे उगवणशक्ती चाचणीचे शेतकऱ्यांना दाखविले प्रात्यक्षिक .वाळू माध्यम पद्धतबारीक, स्वच्छ आणि ओली वाळू प्लास्टिक ट्रेमध्ये ३ ते ४ सेंमी जाड थर देऊन पसरावी. त्यात १०० बियाणे १ ते २ सेंमी खोलीवर पेरावे आणि वरून वाळूचा पातळ थर द्यावा. ट्रे सावलीच्या ठिकाणी ठेवून वाळू नेहमी ओलसर राहील याची काळजी घ्यावी. साधारण ७ ते १० दिवसांनी उगवलेली रोपे मोजून उगवणीची टक्केवारी निश्चित करावी.फायदेमका, तूर, हरभरा इ. मोठ्या बियाण्यांसाठी उपयुक्त.अंकुरांबरोबरच मुळांची वाढ आणि रोपांचा जोम प्रत्यक्ष पाहता येते..वर्तमानपत्र पद्धतवर्तमानपत्राची एक शीट घेऊन तिच्या चार घड्या पाडाव्यात, त्यामुळे तिची जाडी वाढते. शीट पूर्ण ओली करावी. ओल्या वर्तमानपत्राच्या एका टोकाला १० बियांची एक रांग मांडून त्याची गुंडाळी करावी. अशा १० गुंडाळ्या तयार केल्यास एकूण १०० बियांची चाचणी करता येते. सर्व गुंडाळ्या पॉलिथिनच्या पिशवीत ठेवून ४ दिवस सावलीत ठेवाव्यात. त्यानंतर गुंडाळ्या उघडून अंकुरलेले दाणे मोजावेत.फायदेमाती किंवा गोणपाट चाचणीच्या तुलनेत अधिक स्वच्छ चाचणी.लवकर उगवणाऱ्या पिकांसाठी ४ दिवसांत उगवणीचा अंदाज मिळतो..कुंडी किंवा ट्रे पद्धततीन भाग माती, एक भाग चांगले कुजलेले शेणखत आणि एक भाग वाळू यांचे मिश्रण तयार करून कुंडी किंवा ट्रेमध्ये भरावे. त्यानंतर प्रत्येक कुंडी किंवा ट्रेमध्ये ५० किंवा १०० बियाणे समान अंतरावर पेरून हलके पाणी द्यावे. ७ ते १४ दिवसांनी उगवलेली रोपे मोजावीत.फायदेउगवणीबरोबरच रोपांचा जोम, रंग आणि वाढ यांचे निरीक्षण करणे शक्य.कमकुवत, रोगट किंवा असमान वाढ असलेली रोपे सहज ओळखता येतात.उगवणक्षमता आणि रोपांची गुणवत्ता एकाच वेळी तपासण्यासाठी उपयुक्त पद्धती..उगवण क्षमता तपासणीचे फायदेबियाण्याच्या दर्जाबाबत, बियाणे पेरणीसाठी योग्य आहे का, त्याची अंकुरण क्षमता किती आहे याची खात्री होते.पेरणीसाठी आवश्यक बियाणे प्रमाण निश्चित करता येते. उगवण टक्केवारी कमी असल्यास बियाण्याचे प्रमाण वाढविता येते. अपेक्षित रोपसंख्या मिळते.निकृष्ट, कमी उगवण असलेले बियाणे ओळखता येते..चांगली उगवण झाल्यास शेतातील सर्व रोपे जवळपास एकाच वेळी उगवतात. त्यामुळे पीक वाढ, फुलोरा आणि परिपक्वता एकसमान होते.योग्य रोपसंख्या आणि जोमदार उगवणीमुळे अन्नद्रव्ये, पाणी आणि सूर्यप्रकाशाचा कार्यक्षम वापर होतो.उगवण क्षमतेच्या आधारे पेरणी अंतर, बियाणे प्रमाण आणि इतर निर्णय अधिक अचूक घेता येतात.- डॉ. रामप्रसाद गायकवाड ९५६१६०४७०४(यंग प्रोफेशनल-२, कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई)- सुरज कुलकर्णी ९४०४२४७९५१(सहाय्यक प्राध्यापक, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालय, बार्शी, जि. सोलापूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.