Rural Tradition: आपापल्या आवडीनुसार पोळा हा सण शेतकरी साजरा करतात. शेतकरी या भूतलावर असा एक कनवाळू माणूस आहे, की जो निसर्गातील सर्व गोष्टींचा ‘सहोदर’ (भाऊ) आहे. गाई-म्हशी-बैलं-शेळ्या-मेंढ्या-कुत्रे-मांजरी या जित्राबाला तो मनस्वीपणाने सांभाळतो. त्यातल्या त्यात बैलांची जरा जास्तच काळजी घेतो. तसे पाहता, दररोज जनावरांची चांगली देखभाल करणारे शेतकरी आहेत. तरीही ‘कृतज्ञतेचा सण’ बैलपोळा साजरा करताना शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण येत असते. .नातं जिवाभावाचंपोळ्याच्या आदल्या दिवशी खांदेमळणीला सकाळी बैलं चारापाणी करून नदीत किंवा आखाड्यावर मस्त धुतले जातात. बैलांना साबण लावून बैलांच्या सर्वांगाची साफसफाई शेतकरी करत असतात. संध्याकाळी मोळाने हळद आणि तुपाचे मिश्रण बैलांच्या खांद्यांना लावून मळले जाते, हीच ती खांदेमळण. पूर्वीचा काळ आताच्या काळापेक्षा बराच वेगळा होता. सहा-आठ -दहा बैलं लोखंडी नांगराला जुंपून भर उन्हाळ्यात जमीन नांगरली जायची. पेरणीपूर्व मशागत म्हणून उन्हाळी औतपाळ्या बैलांच्या साह्याने हाणल्या जायच्या. परत पावसाळ्यात मृग नक्षत्रात बैलांच्या साह्यानेच तिफण पेरणी व्हायची. .Bailpola 2023 :नंद्या-भावड्याची बैलजोडी आणि आम्हा भावंडांची ‘दूधआई‘! .पेरणीनंतर पिकांची कोळपणी किंवा शेतात जाण्या -येण्यासाठी बैलगाडीचा वापर हमखास व्हायचा. एवढे काबाडकष्ट केल्यामुळे बैलांचे खांदे रक्ताळायचे. त्यामुळे मालक लोक आपल्या ‘राजा -सर्जाची’, ‘बगळ्या-दिवान्याची’ विशेष काळजी लक्षपूर्वक घेत असत. खांदेमळण केल्यामुळे हळदीचे औषधी गुणधर्म बैलांच्या खांद्यांच्या जखमा बऱ्या करतात व तूप स्निग्ध पदार्थ असल्यामुळे बैलांचे खांदे मऊ पडतात. खांदेमळणीमुळे बैलांचे शारीरिक आरोग्य सुदृढ राहते. पूर्वी मालाटालाच्या चकरा बैलगाडीनेच व्हायच्या. लग्नाचे वऱ्हाड बैलगाडीत जायचे. बाजारहाट, जत्रा आणि तमाशे पाह्यला जाताना बैलं छकड्याला लावून रातोरात वावर ते जत्रा आणि परत जत्रा ते गाव धूम चालायची. यामुळे माणसं बैलाळलेले होते. बायाही ‘गाडी आणावी बैलाची-घुंगराची’ आवडीने म्हणायच्या. मालक आणि बैलाचं नातं जीवाशिवाचं होतं आणि आहे..लळा बैलाचाआता काळ बदललाय. भौतिक साधनांचा वापर अर्थातच, यांत्रिक शेती आणि कमी काळात-कमी वेळात-कमी कष्टात गतिमान शेतीची मशागत करण्याचा हा काळ! त्यामुळे घराघरांत आता बैलजोडीऐवजी ट्रॅक्टर दिसायलेत. बैलांचा दैनंदिन सांभाळ, वैरणीची काळजी आणि बैलांच्या वाढलेल्या किमती, बैलं चोरीला जाण्याचे वाढते प्रमाण आदी कारणांमुळे बैलजोडी आता तुरळक शेतकऱ्यांकडे आहे. मी दोन्ही प्रकारे शेतीची कामे करतो. ‘वावराला गडी अन् बैलांची जोडी’ चैतन्य आणते. म्हणून मी कायम एक सालदार गडी आणि बैलजोडी मळ्यात सोबतीला ठेवलेली आहे. काही म्हणा, जनावरांचा सहवास मला मोलाचा वाटतो. बैलांसाठी गजराज गवत, टाळकी ज्वारीचा कडबा, भुईमुगाचे काड, हिरवेगार गवत आणि हिरवी- हिरवी मका आदी चारा खाद्य म्हणून देताना मला समाधान लाभते. .बैलांच्या गळ्यातील घागरमाळाच्या घुंगरांचा आवाज मला देवळाच्या घंटीपेक्षा गोड वाटतो. जमेल तसे बैलं कासऱ्याने धरून मी त्यांना धुऱ्याला चारत असतो. त्यावेळी त्यांच्या भावमुद्रा आणि कधी-कधी त्यांचे ‘उधळलेपण’ अनुभवाचे आहे. चारताना बैलांच्या पाठीवरून हात फिरवला, वाळक्या काडीने मस्तक खाजवले, बगलात मालिश केली, की बैलं लई माणसाळतात. लाडात येऊन माणसाच्या हाताचा तळवा जिभेने चाटतात. मलाही हे दोस्तीचे नाते शाश्वत वाटते. काही बैलं नवख्या माणसांना वासाने ओळखतात. बैलांच्या पावलाने रानाची माती खाली-वर होते. तणकट मातीत दबते. जमिनीचे खरे सौभाग्य बैलांच्या खुराने साजिरे होते. तरारून आलेल्या हिरव्या पिकांचे सौंदर्य शेतकऱ्यांच्या मनाला उभारी देते. म्हणून मला बैलांचा ‘लळा’ लागलेला आहे..Bail Pola : पुणे जिल्ह्यात भाद्रपदी बैलपोळा उत्साहात.खांदेमळणीला तुरीचे फिके वरणफळं, भात असा नैवेद्य भरवून पोळ्याच्या दिवशी सकाळी नारळ फोडून, बैलांना साजशिंगार केला जातो, त्यानंतर मारुतीच्या मंदिरापुढे सामूहिक लग्न लावून, बँडच्या दणक्यात गावभर मिरविले जाते, बाजेवर जू-पळसाचे डहाळे-लोखंडी पास पूजा करून, गाडगे वाजवून, पायावर पाणी टाकून हळद- कुंकू-अक्षदा टाकून मालक - मालकीण पुरणपोळीचा घास अगोदर बैलाला भरवतात. नंतर मालक लोक आपल्या लोकांबरोबर पंगत करतात. हा जीवन जगण्याचा समभाव शेतकरी माणसं जपतात. त्यामुळे खरी ‘सुगी’ हीच आहे. पोळ्याची बरकत शेतकऱ्यांची आबादानी आहे..थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची ‘पोया’ (पोळा) ही एक अस्सल कविता असून प्रत्यक्ष शेतकऱ्याने बैलांचा सांभाळ करताना सदैव ध्यानात ठेवण्यासारखी आहे.आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सन मोठाहाती घेईसन वाट्या, आता शेंदूराले घोटाआता बांधा रे तोरनं, सजवा रे घरदारकरा आंघोयी बैलाच्या, लावा शिंगाले शेंदूरलावा शेंदूर शिंगाले, शेंव्या घुंगराच्या लावागयामधी बांधा जीला, घंटया घुंगरू मिरवाबांधा कवड्याचा गेठा, आंगाव-हे झूल छानमाथा रेसमाचे गोंडे, चारी पायात पैंजनउठा उठा बह्यनाई, चुले पेटवा पेटवा.आज बैलाले नीवद, पुरनाच्या पोया ठेवावढे नागर वखर, नही कष्टाले गनतीपीक शेतकऱ्या हाती, याच्या जीवावर शेती!उभे कामाचे ढिगारे, बैल कामदार बंदायाले कहीनाथे झूल, दानाचाऱ्याचाच मिंधाचुल्हा पेटवा पेटवा, उठा उठा आयाबायाआज बैलाले खुराक, रांधा पुरनाच्या पोयाखाऊ द्या रे पोटभरी, होऊ द्या रे मगदूलबशीसनी यायभरी, आज करू द्या बागूल.आता ऐका मनातलं, माझं येळीचं सांगनंआज पोयाच्या सनाले, माझं येवढं मांगनंकसे बैल कुदाळता, आदाबादीची आवडवझं शिंगाले बांधता, बाशिंगाचं होई जडनका हेंडालू बैलाले, माझं ऐका रे जरासंव्हते आपली हाऊस, आन बैलाले तरासआज पुंजा रे बैलाले, फेडा उपकाराचं देनंबैला, खरा तुझा सन, शेतकऱ्या तुझं रीन!बहिणाबाईंची ही कविता वाचल्यानंतर आपण लक्षात ठेवूया, की मगदूल (चारा खाल्ल्यानंतर प्रसन्न होणे) यासाठी नेहमी जनावरांच्या खाण्यापिण्याची काळजी घेऊ. हेंडालू (गावभर पळविणे) बैलांना असा त्रास देणार नाहीत. बैलांच्या उपकाराचं देणं सदैव जपू!७७७५८४१४२४(लेखक रानमेवा शेती साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.