Buldana News: २२ सप्टेंबरची ती काळरात्रच म्हटली पाहिजे. रात्रभर पाऊस सुरू होता. काही दिवस सतत पाऊस होत असल्याने या पावसाचे लोकांना काही वाटले नाही. मात्र दिवस उगवताच गावाशेजारून वाहणाऱ्या धोयाडी नदीने उग्ररूप धारण केले. कारण सोनोशी (ता. सिंदखेडराजा) महसूल मंडलात तब्बल १७५ मिलिमीटर पाऊस अवघ्या काही तासांत पडला होता. सकाळ होताच नदीला महापूर आला. .या महापुरात शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न वाहून गेले. हातातोंडाशी आलेले पीक हिरावून नेले. आता प्रत्येक शेतात या नुकसानीच्या खुणा तेवढ्या दिसतात. कुठे सोयाबीन, कपाशी, हळदीचे पीक पूर्णपणे खरडलेले आहे, तर कुठे पाण्याच्या प्रवाहामुळे शेतच गायब झाले असून केवळ सऱ्या पडलेल्या दिसतात. कुणाची विहीर वाहून गेली. आजवर कधीही न पाहलेला हा पूर कायमच मनात भीती तयार करणारा ठरला..पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्या विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेलगत असलेल्या रुम्हणा, देवखेड, तांदूळवाडी, सोयंदेव, खैरखेड, सोनोशी, वर्दडी, चांगेफळ... अशी गावांची लांबलचक यादीच तयार होते. २९ सप्टेंबरला या भागात प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा आपत्तीला बरोबर एक आठवडा लोटला होता. मात्र या काळात लोकप्रतिनिधींच्या भेटी, कोरड्या सांत्वनाशिवाय काहीही झालेले नसल्याचे शेतकरी सांगत होते. या काळात पंचनामा करायला कुणीही आलेला नाही, असेही शेतकरी बोलत होते..Maharashtra Flood : पंचनाम्यांचा सोपस्कार कशासाठी?.रुम्हणा गावातील प्रदीप जायभाये म्हणाले, ‘‘आमच्या आयुष्यात पहिल्यांदा असा पूर पाहला. १९५८ नंतर कधीही एवढा पूर आला नव्हता. या वर्षी आम्ही मोठा खर्च करून हंगामात लागवड केली. पण सर्व वाहून गेले. मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार असे सर्वच येऊन पाहणी करून गेले. शेतकरी कर्जात बुलडालेला आहे. या वर्षी अक्षरशः बाहेरून कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी पीक उभे केले होते. पण निसर्गाने त्याचे त्याचे स्वप्नच हिरावून घेतले.’’.विनोद सर्जेराव कायंदे (रा. रुम्हणा) म्हणाले, ‘‘आमच्या गावाचे सातशे ते आठशे हेक्टर क्षेत्र आता नापीक झाले आहे. भेटी सर्वांनी दिल्या पण पंचनामेच झालेले नाहीत. मी तीन बॅग सोयाबीन पेरले होते. दोन एकर कपाशी लावली होती. दोन्ही पिकांचे नुकसान झाले. सोयाबीन तर सोंगणीचीही गरज दिसत नाही.’’.सतीश नवल म्हणाले, ‘‘आमच्या गावाच्या वरील भागात सोनोशी, वर्दडी शिवारात अतिवृष्टी झाली आणि त्याचा पूर आला. आमच्या गावशिवारात नदीपासून एक ते दीड किलोमीटरचा परिसर दोन दिवस पाण्याखाली होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पीकच शिल्लक राहलेले नाही.’’.देवखेडचे शरद भोसले म्हणाले, ‘‘आमचे महापुरात तीन एकर शेत वाहून गेले. विहीर वाहून गेली. कृषिपंप, स्प्रिंकलरचे पाइपही गेले. कपाशीचा सीडप्लाॅट घेतला असून या शेतात नर लावलेला होता. आता तो शिल्लकच नसल्याने परपरागीकरणाची समस्या बनली. कपाशी, हळद, पुराने खरडून नेली. दोन फूट खोल अशा सऱ्या पडल्या आहेत. दीड लाखावर नुकसान झाले असून शेतीचे नुकसान तर पैशात मोजता येणार नाही. मातीच राहिली नसल्याने पुढे पीक कसे पेरता येईल हा प्रश्नच आहे.’’याच गावचे सुंदरराव अढाव म्हणाले, ‘‘या वर्षी २० गुंठ्यांतील शेडनेटमध्ये काकडी लावली होती. .Maharashtra Flood Crisis: धोरणातील गाफीलपणामुळे ‘सुलतानी’ संकटाचा महापूर.या वर्षात सुरुवातीपासूनच पाऊस सुरू होता. नागपंचमीच्या काळात काकडी धरली होती. पण पाऊस व पुरामुळे संपूर्ण वेल वाळून गेले. ३५ हजार रुपये खर्च केला होता. त्यातून एकही रुपया मिळाला नाही. दुसऱ्या ३० गुंठे शेडनेटमध्ये मिरची पेरली होती. पिकात पाणी राहिल्याने तीसुद्धा वाळून गेली. दोनदा रोपे लावली. पण काहीही फायदा झाला नाही. बीजोत्पादन क्षेत्राला असा मोठा फटका बसला.’’.अर्धा खरीप पाण्यातया वर्षात संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी अतिपावसाने नुकसान झेलतो आहे. सिंदखेडराजा, देऊळगावराजा, मेहकर, लोणार, मलकापूर, चिखली या तालुक्यांत तर सरासरीपेक्षा कितीतरी जास्त पाऊस झाला. सिंदखेडराजा तालुक्यात सरासरी ६७१ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ९७० मिलिमीटर पाऊस झाला. सरासरीच्या जवळपास दीडपट हा पाऊस आहे. गेले काही दिवस पिकांना ऊन्हच मिळू शकलेले नव्हते. सलग पाऊस, कधी पूर या आपत्तींनी जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरपैकी तीन लाख हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झालेले आहे. जी पिके उभी दिसतात त्यांची उत्पादकताही ५० ते ७० टक्क्यांपर्यंत घटण्याचीच शक्यता आहे. काही ठिकाणी सोयाबीन काढणी सुरू झाली तर उतारा एकरी चार ते पाच क्विंटलच्या आतच येत आहे. उत्पादित सोयाबीनचा दर्जाही सुमार आहे. बाजारात हे सोयाबीन अवघे ३००० पासून विकते आहे..पाणावलेले डोळेच बोलतात सर्वकाहीपुराचा सर्वांत मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. अनेक शेतांमध्ये उभे असलेले काढणीस तयार झालेले सोयाबीन पाण्याखाली गेले. कपाशीचे पीक जमीनदोस्त झाले. पुराच्या आधीही सतत पाऊस झाल्याने कपाशीची यंदा केवळ वाढच होत होती. झाडावर बोंडांची संख्या जेमतेम आहे. त्यामुळे पीक उत्पादन ५० टक्क्यांवर घटण्याची चिन्हे सुरुवातीपासूनच दिसून येत होती. आता तर डोळ्यांदेखत झालेले पिकांचे नुकसान ही मोठी जखम बनली आहे. आम्ही दिवसरात्र मेहनत करून उभे केलेले पीक काही क्षणांत वाहून गेले. आता पुढे उदरनिर्वाह कसा करायचा, हाच मोठा प्रश्न आहे, असेही शेतकरी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगत होते..जीव वाचला, हेच कमावलेअचानक आलेल्या एवढ्या मोठ्या पुराने सर्वांची तारांबळ उडाली. रुम्हणा गावात अनेकांच्या उंबरठ्यापर्यंत पाणी आले. सखल भागातील अनेकांनी घरे सोडून दुसरीकडे आश्रय घेतला. शेतात, गोठ्यात असलेली जनावरे सोडण्यासाठी तातडीने लोकांनी प्राणपणाने धाव घेतली. या आपत्तीच जीव वाचला हेच कमावले, असे रुम्हणा गावातील बुजुर्गांनी सांगितले. याचा परिणाम केवळ शेतकरी आणि नागरिकांवरच नव्हे, तर हातावर पोट असणाऱ्या अनेकांवर झाला. दळणवळण ठप्प पडले होते. तातडीच्या कारणांसाठी लोकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.