Devendra Fadnavis : वर्ष २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि ते जणू हेडमास्तर असलेल्या धाटणीनेच काम करत होते. प्रशासनावर मजबूत पकड, आव्हान देणाऱ्या मंत्र्यांना शांत करण्याची रणनीती आणि जनसंपर्क या जोरावर पहिल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी आपण सक्षम असल्याचे दाखवून दिले होते. २०१४ च्या तुलनेमध्ये आता त्यांच्या पक्षाकडे सक्षम बहुमत आहे. त्यामुळे या वेळी ते अधिक प्रगल्भतेने आणि सक्षमपणे कारभार करतील असे वाटत होते. मात्र त्यांनी घेतलेल्या निर्णयाला स्व पक्षातील आणि सहकारी पक्षातील मंत्री आव्हान देत असताना ते मात्र निमूट आहेत..पंधरा दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ हजारो आंदोलनकर्ते मुंबईत आल्याने मुंबईची दैना उडाली होती. त्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीने दीर्घ चर्चा करून मराठवाड्यासाठी हैदराबाद राजपत्र (गॅझेटिअर) लागू करण्याची घोषणा केली. त्या संदर्भातला शासन आदेश काढला आणि अंमलबजावणीसाठी बैठकांचे सत्र सुरू झाले. दरम्यानच्या काळामध्ये ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता पसरली आहे..मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी यावरून एका मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला तर दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत शासनाने काढलेला आदेश रद्द करावा, असे निवेदन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयावर त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री आक्षेप घेतात, मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकतात आणि माध्यमांमध्ये उघड उघड विरोधाची भूमिका मांडतात. यावर ना भाजपमधून ब्र काढला जातो, ना मुख्यमंत्री फडणवीस त्यांची कान उघडणी करतात. वास्तविक भुजबळ तसे आक्रमक नेते आहेत. मात्र अलीकडे त्यांनी सत्याग्रहाची भूमिका स्वीकारलेली दिसते. मंत्री पदाची शपथ घेताना जे काही शब्द आपण वाचलेले आहेत त्याच्या उलट भूमिका भुजबळ घेत आहेत..Maharashtra Politics: काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपच काँग्रेसयुक्त.बिल्डरांच्या घशात मोक्याचा जागा२०१९ मध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस सोबत जाण्याला अनेकांचा विरोध होता. मात्र सत्तेची फळे चाखत असलेले मंत्री त्याबाबत अवाक्षर काढत नव्हते. त्याच वेळी ईडीचा फास आवळत जात होता आणि हा फास सेल करण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि विद्यमान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपण भाजपसोबत जावे, अशी मागणी केली होती. शिवसेना फुटली मात्र त्याची बीजे या पत्रात रोवली होती. याचेच बक्षीस म्हणून की काय प्रताप सरनाईक मुख्यमंत्री फडणवीस यांचे लाडके मंत्री आहेत. प्रताप सरनाईक प्रस्ताव आणतात आणि तो मान्य केला जातो, अशी परिस्थिती आहे. .दुर्दैवाने हे प्रस्ताव राज्यातील परिवहन व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी नसतात हे येथे अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे. त्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणजे राज्यातील बस स्थानके खासगी भागीदारी तत्त्वावर विकसित करून मोक्याच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा आहे. मंत्रिमंडळ बैठकीत त्यांच्या या प्रस्तावाला मान्यता दिली. आता राज्यभरामधील बस स्थानकांच्या जागा विकसित होतील. मुंबईसारख्या शहरांमध्ये मुंबई सेंट्रल, परेल, कुर्ला आणि नवी मुंबईतील पनवेल ही बस स्थानके देशाच्या आर्थिक राजधानीत मोक्याच्या जागी आहेत. राज्यभरामध्ये लहान, मोठ्या शहरांमध्ये गावाबाहेर किंवा शहराबाहेर असलेली स्थानके आता मध्यवर्ती ठिकाणी आले आहेत. त्यामुळे ही स्थानके विकसित करायची आणि एसटीचे जे काही होईल ते रामभरोसे सोडून खासगी बिल्डरांच्या फायद्यासाठी ते विकसित करायचे असा घाट घातला आहे. आता निर्णय झाल्याने तो बदलू शकत नाही हे मान्य आहे. मात्र आपण राज्यातील परिवहन व्यवस्था सुधारण्यासाठी बरेच काही करतो असा आव सरनाईक मंत्री झाल्यापासून आणत आहेत..Maharashtra Politics: सामूहिक अभयदान योजना.राज्यातील एसटीची व्यवस्था सुधारावी यासाठी प्रताप सरनाईक यांनी पहिल्या काही महिन्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू केले. त्यानंतर गुजरात आणि कर्नाटकचा दौराही केला. आता या सर्व गोष्टींना अनेक महिन्यांचा कालावधी उलटला तरीही या बैठका आणि दौऱ्यांचे दृश्य परिणाम काही राज्यभरामध्ये दिसत नाहीत. राजकीय हस्तक्षेपामुळे एसटीची दैना उडाली आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवामध्ये मुंबई शहरातून हजारो बसेस राज्यातील विविध भागांमध्ये सोडण्यात आल्या. कोणतेही नियोजन नसलेल्या एसटी महामंडळाने राज्यभरातील विविध आगारांमधून एसटी बसेस मागवून घेतल्या आणि त्या मुंबईसारख्या शहरांमधून राज्यभरामध्ये सोडल्या..याचा परिणाम राज्यभरातील वाहतूक व्यवस्थेवर झाला. एसटीची पूर्ण व्यवस्था कोलमडून गेल्याने ऐन गणेशोत्सवामध्ये प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सत्तेतील सर्व आमदार आणि मंत्र्यांनी एसटी महामंडळाचा पुरेपूर वापरून करून घेतला. त्याच वेळी महाराष्ट्रातील उर्वरित प्रवासी मात्र बेहाल झाले. दुप्पट आणि तिप्पट भाडे देऊन खासगी बसेसने नागरिकांना प्रवास करावा लागला. सरनाईक कधीकाळी ठाण्यात रिक्षा चालवायचे. मात्र त्यांनी नुकतीच आपल्या नातवाला टेस्ला ही अमेरिकन बनावटीची कार भेट दिली आहे. ज्यांचे विश्व टेस्लाचे आहे त्यांना लालपरी लयाला गेली तरी काहीच फरक पडणार नाही..एकत्र येणे दोघांच्याही फायद्याचेउद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आगामी दसरा मेळाव्यात एकत्र येतील अशी अटकळ बांधली जात आहे. दोन ठाकरे एकत्र येण्यासाठी जी पार्श्वभूमी तयार व्हावी लागते, ती आता तयार झाली आहे. ठाकरे या नावात जादू आहे, असे म्हटले जाते. मात्र निवडणुकीची जी तंत्रे भाजप वापरते त्यापुढे ही जादू कितपत चालते हे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दिसून येईल. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आतापर्यंत शिंदे यांच्या बंडाला साथ दिली नव्हती. एक एक करून ५५ ते ६० माजी नगरसेवक फोडण्यात शिंदे यांना यश आले आहे. हे नगरसेवक वर्षानुवर्षे आपल्या प्रभागावर वर्चस्व ठेवून आहेत. त्यामुळे निवडणुकांमध्ये शिंदे यांचा वरकरणी वरचष्मा दिसतो. तर मागील निवडणुकीत भाजप एकटी लढल्याने या पक्षाची ताकदही आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर ठाकरे यांच्यासाठी हा धोका मानला जातो. प्रत्येक निवडणुकीत वेगळी भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जावे ही नेमकी कोणाची इच्छा आहे, हे अद्याप गुलदस्तात आहे. काहीही असले तरी या दोघांचे एकत्र येणे दोन्ही पक्षांसाठी फायद्याचे ठरणार आहे.: ९२८४१६९६३४(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे मुंबई प्रतिनिधी आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.