डॉ. भिमराव कांबळे, डॉ. संजय तोडमलबहुतेक वेळेला नैसर्गिक ओढे व नाले बुजविल्यामुळे शेतजमिनीमधून होणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याला वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. हे पाणी शेतात साठून राहिल्यामुळे जमीन व पिकांचे नुकसान होते. जमिनीची धूप कमी करण्यासाठी पिकाच्या ओळी नेहमी उतारास आडव्या तसेच समपातळीत ठेवाव्यात. त्याचप्रमाणे नांगरणी, कुळवणी, कोळपणी उतारास आडवी करावी..मृदा ही मानवी समाजास निसर्गाने दिलेली अनमोल भेट आहे. पृथ्वीच्या उत्पतीबरोबर माती तयार झाली. पृथ्वीच्या पृष्ठभागावर १ सेंमी जाडीच्या मातीचा थर तयार होण्यासाठी जवळपास १००० वर्षे लागतात. मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या मातीच्या धुपेमुळे या थराचा एक वर्षात ऱ्हास होतो. मातीच्या रचनेचा विचार केला तर, मातीत ४५ टक्के खनिज पदार्थ, ५ टक्के सेंद्रिय पदार्थ, २५ टक्के ओलावा आणि २५ टक्के हवा असते. पिकास आवश्यक एकूण १७ अन्नद्रव्ये असतात..Soil Erosion : पाणलोट क्षेत्रातील धूप नियंत्रण.यांपैकी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही अन्नद्रव्ये वगळता, सर्व जमिनीतून उपलब्ध होतात. जमिनीतून उपलब्ध होणाऱ्या अन्नद्रव्यांमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम, गंधक, मॅग्नेशिअम, लोह, जस्त, मंगल, तांबे, बोरॉन, मॉलीब्डेनम यांचा समावेश होतो. ही बहुतेक अन्नद्रव्ये जमिनीच्या वरच्या थरात म्हणजेच ० ते ३० सेंमी खोलीपर्यंत मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. जमिनीच्या खालच्या मुरुमयुक्त थरांत त्यांचे प्रमाणात अत्यल्प असते. यावरुन जमिनीच्या वरच्या थराचे महत्त्व आपल्या लक्षात येईल..जमिनीचा पोत, जलधारण क्षमता, घट्टपणा, घडण, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण, हवेचे प्रमाण, उपयुक्त सूक्ष्मजिवांचे प्रमाण हे जमिनीची सुपीकता ठरविणारे महत्त्वाचे घटक आहेत. अतिवृष्टीच्या घटना आणि त्यामुळे येणारे पूर हे राज्यात तसेच भारतात प्रमुख नैसर्गिक धोक्यांपैकी एक आहेत. मागील १७५ वर्षांत जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान १.१ अंश सेल्सिअस वाढले आहे. जागतिक हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम शेती क्षेत्रावर होईल असे विविध अभ्यासावरुन आढळून आले आहे. त्याचा प्रत्यय पावसाचे असमान वितरण, तीव्र पावसाच्या घटना यांच्या रूपाने आपल्याला अनुभवास येत आहे..Soil Erosion : वनराई बंधारे रोखतायेत सातपुड्याची धूप!.जागतिक हवामान बदलाच्या घटनांबरोबरच जमिनीची धूप होण्यास इतरही घटक कारणीभूत आहेत. यामध्ये वृक्षतोड, आधुनिक शेती पद्धती, जमिनीची अतिमशागत, सेंद्रिय घटकांच्या वापराचा अभाव/ अत्यल्प प्रमाण, अशास्त्रीय पीक पद्धती, संकरित जातींच्या वापरावर भर, रोग व किडींचा वाढता प्रादुर्भाव, रासायनिक खतांचा असमतोल वापर, जमिनीत दिसून येणाऱ्या नवनवीन अन्नद्रव्यांच्या कमतरता, पिकांचा वाढता उत्पादन खर्च, शेतीत रसायनांचा वाढता वापर, सिंचनाच्या पाण्याचा अतिरेकी वापर, अपारंपरिक इंधनाचा वाढता वापर इत्यादींचा समावेश होतो..जमिनीच्या धूप करणाऱ्या घटकांपैकी ८० टक्के धूप पावसाच्या पाण्यामुळे होते. अशाप्रकारे होणारी जमिनीची धूप ५ ते ८० टन प्रति हेक्टर प्रति वर्ष एवढी आहे. पावसामुळे जमिनीचा वरचा थर वाहून गेल्यामुळे जमिनी नापीक होतात, पीक उत्पादनात घट येते, पाण्याचे प्रदूषण होते, जलाशयांची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते, डोंगराळ प्रदेशामध्ये दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होते..Soil Erosion : जमिनीच्या धुपेमुळे वाढते कार्बन उत्सर्जन.पावसाचे पाणी शेतात साठल्यामुळे होणारे नुकसान ः१) बहुतेक वेळेला नैसर्गिक ओढे व नाले बुजविल्यामुळे शेतजमिनीमधून होणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याला वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. हे पाणी शेतात साठून राहिल्यामुळे जमीन व पिकांचे नुकसान होते. जमिनीच्या भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्मांवर परिणाम होतो.२) जमिनीच्या पृष्ठभागावर वाळू व पोयटा मातीचे कणांचा थर तयार होतो. त्यामुळे मातीची सच्छिद्रता कमी होते, वरच्या थराची घनता वाढते, पाणी जिरून न जाता तसेच साठून राहते, पाणी सुकल्यानंतर जमिनीचा वरचा थर टणक होतो. शेती व मशागतीस जास्त श्रम लागतात. अशा जमिनीत पिकांची उगवण क्षमता कमी होऊन उत्पादनात घट येते..३) पाणी जास्त काळ साठून राहिल्यामुळे उपयुक्त जीवाणूंच्या संख्येत घट येते. जमिनीच्या वरच्या थरात असलेले अन्नद्रव्यांचा ऱ्हास होतो. अन्नद्रव्ये हवेत उडून जातात किंवा पाण्याबरोबर जमिनीच्या खालच्या थरात निघून जातात. त्यांचे विघटन होऊन ते पिकास वापरता येत नाहीत. सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन त्याचा ऱ्हास होतो. पिकांच्या मुळांना हवा न मिळाल्यामुळे ती जमिनीत सडतात. वेगवेगळ्या रोगकारक बुरशीची वाढ होते. अशा जमिनीत पुढील हंगाम पीक घेण्यास देखील मर्यादा येतात. उदा. हरभरा, करडई, भुईमूग इ. पिके रोगकारक बुरशींना खुप संवेदनशील असतात..Soil Erosion : मातीची धूप थांबविण्यासाठी उपाययोजना गरजेच्या .पाण्याबरोबर माती वाहून गेल्यामुळे होणारे नुकसान ः१) कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्यास पावसाचे पाणी जमिनीत न मुरता ते जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाते. नैसर्गिक ओढे व नाले यांचा अभाव किंवा त्यांचे अरुंद झालेले स्वरूप, यामुळे त्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता घटते. अशावेळी पाण्याचे प्रवाह लगतच्या शेत जमिनींमधून वाहतात. हे पाणी आपल्या बरोबर शेतातील सुपीक मातीत घेऊन जाते.२) आपल्या देशात वर्षभरात पाण्यामुळे होणाऱ्या सुपीक जमिनींची धूप ५.४ ते ८.४ दशलक्ष टनांपर्यंत आहे. सुपीक माती वाहून गेल्यामुळे जमिनीचा खालचा थर उघडा पडतो. हा थर मुरमाड, वाळूमिश्रीत अथवा कमी सुपीक असतो. अशी जमीन पीक उत्पादनास योग्य बनविण्यासाठी अधिक कालावधी लागतो व ही बाब खर्चीक आहे..३) मातीबरोबरच सेंद्रिय पदार्थ व अन्नद्रव्ये वाहून जातात. याचे प्रमाण प्रति हेक्टरी शेकडो किलोमध्ये असते. जमिनीच्यावरील भागातील दगड, गोटे, मुरूम शेत जमिनीत येऊन साठतात.४) जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहणारे पाणी कमी वेळात जास्त प्रमाणात न मुरता वाहून जाते. त्यामुळे भूजल पातळीत वाढ होत नाही. म्हणजेच विहिरींच्या पाण्याची आवक आणि भरपाई कमी होते. विहिरीत पाणी कमी आल्यामुळे ओलितावर परिणाम होतो, पिकाचे उत्पन्न कमी होते.५) अन्नद्रव्ये मिश्रित माती जलाशयामुळे वाहून गेल्यामुळे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता घटते. याचबरोबर पाणवनस्पतींची वाढ झाल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. असे पाणी पिण्यास अयोग्य होते. जलाशयातील जलचर प्राणी प्राणवायूच्या अभावामुळे मरतात. पाण्याचा प्रवाह ओढे, नाल्यांच्या खालच्या भागात वाढत जातो. अशावेळी जीवित व मालमत्तेची हानी मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीवर मात करणे अवघड आहे; अशक्य मात्र नाही..जमिनीची धूप थांबविण्यासाठीचे उपाय ः१) पडीक जमिनींवर गवताची कुरणे किंवा वृक्षारोपण करुन जमिनीवर हरित आच्छादन तयार करावे. अशा जमिनींवर दीर्घायुषी वृक्ष लागवड करावी. नैसर्गिक ओढे व नाले यांचे प्रवाह पुर्नजीवन करावे. त्यांची नैसर्गिक पाणी वहन क्षमता टिकून राहील याबाबत कायम दक्ष राहावे.२) सखल जमिनीत अथवा घळींमध्ये अंजन, ब्लू पॅनिक, मारवेल गवत लावावे.३) पीक पेरताना उताराला आडवे पेरावे. समपातळीत मशागत करावी. पिकांच्या फेरपालटीने जमिनीची धूप कमी करता येते. यामुळे जमीन व पाणी यांचे संधारण होते. यासाठी धूप प्रतिबंधक पिकाच्या ३ ओळी व धुपेस प्रतिबंध न करणाऱ्या पिकाच्या ९ ओळी घेण्याची शिफारस विद्यापीठामार्फत करण्यात आली आहे..४) जमीन नेहमी पीक लागवडीखाली ठेवावी. वारा आणि पाण्यास विरोध करण्यासाठी शेताच्या सीमेवर गवताचे जैविक बांध तयार करावेत. पिकांची लागवड समपातळीत केल्यास जमिनीची धूप थांबविता येते अथवा कमी करता येते.५) पिकाच्या ओळी नेहमी उतारास आडव्या तसेच समपातळीत ठेवाव्यात. त्याचप्रमाणे नांगरणी, कुळवणी, कोळपणी उतारास आडवी करावी. भुईमूग, हुलगा, मटकी पिकांमुळे धूप कमी होते. ज्वारी, बाजरी पिकांमुळे जमिनीची धूप अधिक होते. म्हणून ही दोन प्रकारची पिके आलटून पालटून पेरावीत. यालाच आपण पट्टा पेरणी म्हणतो.संपर्क ः डॉ. भिमराव कांबळे, ८२७५३७६९४८(प्रमुख, मृदा विज्ञान विभाग,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि.अहिल्यानगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.