डॉ. विक्रम कड डॉ. गणेश शेळके डॉ. सुदामा काकडे वेगवेगळ्या उत्पादनाच्या पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक व अन्य घटकांमुळे कचऱ्याचे प्रमाण प्रचंड आहे. हे प्लॅस्टिक अनेक दशके पर्यावरणात टिकून राहते. अन्न उत्पादन क्षेत्रात, विशेषतः फळे आणि भाज्यांच्या पॅकेजिंगमध्ये प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याचे विघटनही होत नसल्याने तो कचऱ्याचे डोंगर वाढत चालले आहे. बहुतांश कचरा डेपोमध्ये प्लॅस्टिक आणि घटकांची विल्हेवाट कशी लावायची, हा मोठा प्रश्न जगभरातील सर्व नागरी प्रशासनासमोर आहे. अशा स्थितीमध्ये सध्याच्या पॅकेजिंगचे सर्व गुणधर्म असलेले पण वेगाने विघटन होणाऱ्या पॅकेजिंगच्या संशोधनावर जगभरामध्ये काम चालू आहे. त्यातून पुढे येत असलेल्या पॅकेजिंगमध्ये जैवविघटनशील पॅकेजिंग हे महत्त्वाचे ठरत आहे. .जैवविघटनशील पॅकेजिंग म्हणजे काय?पॅकेजिंगमध्ये वापरलेला सर्व साहित्य हे सूक्ष्मजीवांमार्फत नैसर्गिकरीत्या वेगाने विघटीत होऊ शकतात. त्यांचे रूपांतर पाणी, कार्बन डायऑक्साइड आणि सेंद्रिय पदार्थांमध्ये (बायोमास) होऊ शकते. हे साहित्य पारंपरिक प्लॅस्टिकला एक टिकाऊ आणि पर्यावरणस्नेही पर्याय पुरवू शकते. त्यामुळे शेतकरी, उद्योजक आणि ग्राहक यांनी अधिक जबाबदारीने बाजारात उतरण्याची आवश्यकता आहे. पर्यावरणाला हानिकारक अशा प्लॅस्टिकचा वापर कमी करत शून्यावर नेण्याची गरज आहे. या लेखात प्रामुख्याने आपण फळे आणि भाज्यांसारख्या नाशिवंत उत्पादनांसाठी जैवविघटनशील पॅकेजिंगच्या वापराबाबत माहिती घेऊ. अशा पॅकेजिंग उत्पादने केवळ पर्यावरणाची काळजी घेत नाहीत, तर उत्पादनाचे आयुष्यमान वाढणवणे, गुणवत्ता टिकवून ठेवणे यातही मदत करू शकतात..Smart Packaging : सक्रिय पॅकेजिंगपासून स्मार्ट पॅकेजिंगकडे.गरज आणि महत्त्वपारंपरिक प्लॅस्टिक पॅकेजिंगमुळे होणारे गंभीर पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक दुष्परिणाम जैवविघटनशील पॅकेजिंग साहित्याची गरज आणि महत्त्व अधोरेखित करतात.पर्यावरण संरक्षण : प्लॅस्टिक कचरा जमिनीत आणि पाण्यात जमा होऊन मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहेत. असे ढीग विविध पाणी स्रोतांसोबतच सागरामध्येही वाढत असून, जलचर प्राण्यांना धोका निर्माण होत आहे. त्यांचे सूक्ष्म कण अन्नसाखळीमध्ये समाविष्ट होत असून, नैसर्गिक परिसंस्थेचे संतुलन बिघडविण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे जैवविघटनशील पॅकेजिंग या समस्या कमी करण्यास मदत करेल.कचरा व्यवस्थापनावरील ताण कमी : प्लॅस्टिक कचरा विघटित होत नसल्याने कचरा डेपोवरील ताण वाढत आहे. जैवविघटनशील पॅकेजिंगचे कंपोस्टिंग शक्य असून, त्याद्वारे मातीमध्ये मिसळून जातील. कचरा व्यवस्थापनावरील खर्च आणि ताण कमी होतो..नैसर्गिक संसाधनांचे जतन : पारंपरिक प्लॅस्टिक पेट्रोलियम (petroleum) घटकांवर आधारित आहेत. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होतो. जैवविघटनशील साहित्यामध्ये वनस्पती आधारित घटकांचा (उदा. स्टार्च, सेल्युलोज) समावेश असल्याने त्यांचे विघटन व पुनर्वापर शक्य आहे. ते नवीकरणीय (renewable) संसाधनांवर आधारित असते.मातीची गुणवत्ता सुधारणे : कंपोस्टिंग केलेल्या जैवविघटनशील साहित्याचा वापर मातीची सुपीकता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवतो.जागरूक ग्राहक : ग्राहकांनीही जागरूकतेने पर्यावरणपूरक उत्पादनांना अधिक महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. ही मानसिकता हळूहळू वाढत असून, मागणी वाढत आहे. परिणामी जैवविघटनशील पॅकेजिंग वापरून शेतकरी आणि उद्योजक या संधीचा फायदा घेऊ शकतात.सरकारी नियम आणि प्रोत्साहन : अनेक देशांतील शासन व्यवस्था या पर्यावरणाला हानिकारक घटकांच्या (प्लॅस्टिकच्या) वापराला प्रतिबंध आणत आहे.त्याच वेळी जैवविघटनशील पॅकेजिंग उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी नियम आणि योजना लागू करत आहेत..जैवविघटनशील पॅकेजिंग साहित्याची निर्मिती व गुणधर्मफळे आणि भाज्यांसाठी विविध प्रकारचे जैवविघटनशील पॅकेजिंग साहित्य उपलब्ध आहे. त्याचे प्रत्येकाचे स्वतःचे विशिष्ट गुणधर्म असून, त्यानुसार त्यांचा वापर करणे शक्य आहे.स्टार्च आधारित प्लॅस्टिकउत्पादन : मका, बटाटा आणि साबुदाणा (ट्रॅपिओका) यांसारख्या वनस्पतींच्या स्टार्चपासून हे प्लॅस्टिक तयार केले जाते. स्टार्चला थर्मोप्लॅस्टिक (thermoplastic) बनविण्यासाठी त्यात काही घटक (ॲडिटिव्हज) मिसळले जातात.गुणधर्म : हे साहित्य स्वस्त, भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचे अंतिमतः उत्तम खत बनू शकते. त्याची वायू अवरोधक क्षमता मध्यम असते. मात्र ते काही प्रमाणात ओलावा संवेदनशील असू शकते.उपयोग : फळे आणि भाज्यांसाठी फिल्म्स, ट्रे, लूज-फिल पॅकिंग आणि कंपोस्टेबल बॅग्स बनविण्यासाठी याचा वापर होतो. ओलावा संवेदनशीलतेमुळे थेट ओल्या उत्पादनांसाठी किंवा जास्त आर्द्रतेच्या वातावरणासाठी हे तितके योग्य नाही..पॉलिलेक्टिक ॲसिडउत्पादन : कॉर्न स्टार्च किंवा उसाच्या साखरेपासून किण्वन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक ॲसिड तयार केले जाते. त्याचे पॉलिमरायझेशन केल्यानंतर पॉलिलेक्टिक ॲसिड मिळते.गुणधर्म : पॉलिलेक्टिक ॲसिडमध्ये चांगली पारदर्शकता, चांगली ताकद आणि मध्यम वायू अवरोधक क्षमता असते. हे कंपोस्टेबल आहे. परंतु औद्योगिक कंपोस्टिंग सुविधेची आवश्यकता असते. उच्च तापमानाला ते नरम होऊ शकते.उपयोग : फळे आणि भाज्यांसाठी क्लॅमशेल कंटेनर / पनेट, कप, बॉक्सेस आणि फिल्म्स बनविण्यासाठी याचा वापर होतो. कमी आयुष्यमान असलेल्या आणि जास्त उष्णता नसलेल्या वातावरणातील उत्पादनांसाठी ते योग्य आहे..Smart Packaging : उत्पादनाच्या गुणधर्मानुसार निवडा स्मार्ट पॅकेजिंग.सेल्युलोज आधारित साहित्यउत्पादन : वनस्पतींच्या सेल्युलोजपासून (उदा. लाकूड लगदा, कापूस) सेल्युलोज ॲसिटेट , सेल्युलोजचे अतिसूक्ष्म स्फटिक (नॅनोक्रिस्टल्स) आणि पुनर्निर्मित सेल्युलोज (उदा. सेलोफान) तयार केले जातात.गुणधर्म : सेल्युलोज आधारित साहित्यामध्ये चांगली ताकद, पारदर्शकता आणि वायू अवरोधक क्षमता असते. त्यांची विघटन क्षमता (कंपोस्टेबिलिटी) बदलते. सेल्युलोज नॅनोक्रिस्टल्समध्ये उच्च ताकद आणि उत्तम अवरोधक गुणधर्म असतात.उपयोग : फळे आणि भाज्यांसाठी फिल्म्स, बॅग्स आणि आवरणे (कोटिंग्स) बनविण्यासाठी याचा वापर होतो. असे वेष्टन चांगले ओलावा अवरोधक नसले तरी, वेगळ्या आवरणाद्वारे (लॅमिनेशन) गुणधर्म सुधारता येतात..कायटोसॅन (Chitosan)उत्पादन : शेलफिशच्या कवचातील कायटीन (chitin) या नैसर्गिक पॉलिमरपासून कायटोसॅन मिळते.गुणधर्म : कायटोसनमध्ये सूक्ष्मजिवविरोधी (अँटिमाइक्रोबिअल) आणि बुरशीविरोधी (अँटीफंगल) गुणधर्म असतात. त्यामुळे फळे आणि भाज्यांवरील बुरशी आणि जिवाणूंची वाढ रोखण्यास मदत करते. हे जैवविघटनशील आणि जैवसुसंगत (बायोकॉम्पॅटिबल) आहे.उपयोग : फळे आणि भाज्यांवर थेट कोटिंग म्हणून किंवा पॅकेजिंग फिल्म्समध्ये वापरले जाते. त्यामुळे उत्पादनाचे आयुष्यमान वाढते. नासाडी कमी होते.लिग्निन आधारित साहित्यउत्पादन : लाकूड आणि इतर वनस्पतींच्या बायोमासमधील लिग्निन हा एक नैसर्गिक पॉलिमर आहे. त्याच्यापासून जैवविघटनशील प्लॅस्टिक आणि फिल्म्स विकसित करण्याचे संशोधन चालू आहे.गुणधर्म : लिग्निनमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटिमायक्रोबिअल गुणधर्म असतात. ते पाणी प्रतिरोधक आणि अतिनील किरण अवरोधक (UV-blocking) असू शकते.उपयोग : सध्या संशोधनाच्या अवस्थेत असले तरी, भविष्यात फळे आणि भाज्यांसाठी टिकाऊ आणि संरक्षक पॅकेजिंग साहित्य म्हणून याची क्षमता प्रायोगिक पातळीवर सिद्ध होत आहे..बायो-पॉलिस्टरउत्पादन : सूक्ष्मजिवांमार्फत किण्वन प्रक्रियेद्वारे हे पॉलिस्टर तयार केले जातात. पॉलिहाइड्रॉक्सिअल्कानोएट्स (PHA) आणि पॉलिब्युटिलीन सक्सिनेट (PBS) हे त्याचे प्रमुख प्रकार आहेत.गुणधर्म : हे पूर्णपणे जैवविघटनशील असून, संपूर्णपणे खत बनण्यायोग्य (कंपोस्टेबल) आहेत. त्यांची यांत्रिक ताकद आणि औष्णिक गुणधर्म पारंपरिक प्लॅस्टिकसारखे आहेत.उपयोग : फळे आणि भाज्यांसाठी फिल्म्स,कंटेनर आणि ट्रे बनविण्यासाठी यांचा वापर वाढत आहे.पीक अवशेषापासून पॅकेजिंगउत्पादन : गव्हाचा कोंडा, उसाचा चोथा, धान्याचा कोंडा आणि इतर कृषी अवशेषांमधील सेल्युलोज आणि लिग्निनचा वापर करून बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग साहित्य विकसित केले जात आहे.गुणधर्म : हे साहित्य स्वस्त आणि टिकाऊ असते. या टाकाऊ घटक वापरले जात असल्याने पर्यावरणासाठी फायदेशीर आहे. त्याचे गुणधर्म वापरलेल्या कृषी अवशेषाच्या प्रकारानुसार बदलू शकतात.उपयोग : फळे आणि भाज्यांसाठी ट्रे, बॉक्सेस आणि काही प्रमाणात फिल्म्स बनविण्यासाठी याचा वापर होऊ शकतो.- डॉ. विक्रम कड ०७५८८०२४६९७(कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.