Career Opportunities: आजच्या तरुण पिढीला दिशा देणारे दोन प्रसंग नुकतेच मी अनुभवले. मागील महिन्यात माझ्या शेतावर शेडच्या फॅब्रिकेशनचे काम चालू होते. काम क्लिष्ट आणि जोखिमीचे होते. राहुल जाधव आणि सचिन शिरसाठ ही दोन तरुण मुले काळा गॉगल आणि डोक्यावर हेल्मेट घालून वेल्डिंगचे काम करत होती. दिवसभर ते आपल्या कामात मग्न होते. त्यांची कार्यशैली मला भावली. मनात विचार आला, की ही मुले शिकली तर नक्कीच फार पुढे जातील. मी त्यांना विचारले,.‘तुम्ही सध्या काय करता?’‘सर, आम्ही संगमनेरच्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला बी.ई. मेकॅनिकलच्या तिसऱ्या वर्षाला आहोत.’मला धक्काच बसला. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांना हातात वेल्डिंग रॉड घेऊन प्रत्यक्ष फॅब्रिकेशनचे काम करताना मी पहिल्यांदाच पाहत होतो. ही दोन्ही मुले कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच सुट्टीच्या दिवशी फॅब्रिकेशनची कामे करतात आणि आपल्या शैक्षणिक खर्चाचा भार स्वतः उचलतात. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, पदवी मिळण्यापूर्वीच त्यांच्या हातात एक उपयुक्त कौशल्य आले आहे. त्या कौशल्याच्या बळावर त्यांना नोकरी मिळू शकते किंवा स्वतःचा व्यवसायही उभा करता येऊ शकतो..World Youth Day: किती युवकांना आपण सक्षम करतोय?.मी विचारले, ‘बी.ई. झाल्यानंतर तुम्ही काय करणार?’ते म्हणाले, ‘सर, आम्ही आमचा स्वतंत्र व्यवसाय करणार आहोत.’त्या उत्तरात आत्मविश्वास होता, स्वाभिमान होता आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न होते. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त १५ जुलै रोजी एमआयडीसी कौशल्य विकास केंद्र, नाशिक येथे या दोन्ही तरुणांचा मी सत्कार केला.दुसरा अनुभवही तितकाच बोलका..माझ्या शेतावर गावरान आंब्याची झाडे आहेत. त्यावर केसर आंबा जातीची कलमे करण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून मी कलम करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात होतो. अखेर माझा नंबर लागला. दोन व्यक्तींनी चार दिवस काम करून सर्व झाडांवर केशर कलमे केली . मी सहज विचारले,‘महिन्याला प्रत्येक जण चाळीस-पन्नास हजार रुपये कमवत असाल?’ते हसत म्हणाले, ‘सर, महिन्याला कमीत कमी एक लाख रुपये आम्ही कमवतो.’.Youth Employment: कष्ट करून मोठे होऊ! परंतु पर्याय कुठे आहेत?.त्यांचे काम सुरूच होते आणि मी मात्र विचार करत त्यांच्याकडे पाहत होतो. काम कष्टाचे होते; पण त्यांच्या हातात कौशल्य होते. म्हणूनच त्यांना कामाची कमतरता नव्हती. उलट त्यांच्या कौशल्याला सतत मागणी होती.आज देशात लाखो तरुण-तरुणी सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि दुसरीकडे कारखाने कुशल मनुष्यबळाच्या शोधात आहेत. अनेक इंजिनिअर्स, वकील पंधरा-वीस हजार रुपयांच्या पगारावर नोकऱ्या करतात; तर औपचारिक शिक्षण कमी असतानाही एखादे कौशल्य आत्मसात केलेले अनेक तरुण चांगले उत्पन्न मिळवत आहेत. .तंत्रज्ञान आणि उद्योगधंदे झपाट्याने बदलत असताना शिक्षणपद्धतीतील बदल त्या वेगाने होत नाहीत. त्यामुळे शिक्षण आणि रोजगार यांच्यात दरी निर्माण झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भविष्यात अनेक पारंपरिक नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल. अशा परिस्थितीत केवळ पदवी पुरेशी राहणार नाही; पदवीसोबत कौशल्य असणे ही काळाची गरज आहे.शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कौशल्याधारित प्रशिक्षण मोठ्या प्रमाणावर सुरू करणे आवश्यक आहे. कुशल भारताच्या विविध योजनांबरोबरच नवीन शैक्षणिक धोरणातही कौशल्य विकासाला महत्त्व देण्यात आले आहे. मात्र भविष्यातील आव्हाने लक्षात घेता या क्षेत्रात आणखी मोठी गुंतवणूक आणि मूलभूत सुधारणा गरजेच्या आहेत..राहुल आणि सचिन यांच्या हातातील वेल्डिंग रॉड असो किंवा त्या दोन कारागिरांच्या हातातील कलम करण्याचा छोटासा चाकू, दोन्ही हात एकच संदेश देऊन जातात, की ‘भविष्य केवळ पदवीच्या कागदावर लिहिले जात नाही; ते आपल्या हातातील कौशल्याने घडवावे लागते.’ म्हणूनच आजच्या तरुणांनी शिक्षणाची कास धरावीच; पण त्यासोबत कौशल्याचीही कास धरावी. कारण पदवी रोजगाराची दारे उघडू शकते; पण कौशल्य माणसाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देते.डॉ. मुकुंद शिंदे, (९४०३६०५९७९)(माजी विभाग प्रमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि संचालक, एमआयडीसी कौशल्य विकास केंद्र, नाशिक).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.