Someshwarnagar News: बारामतीकरांच्या जे कल्पनेतही नव्हते ते आज सकाळी घडले. घराघरांत सकाळच्या न्याहारीची तयारी सुरू असतानाच अजितदादांच्या विमान अपघाताची बातमी समजली आणि अबालवृद्ध हबकून गेले. अजितदादा ठीक आहेत का, हे समजून घेण्यासाठी प्रत्येकाचीच अक्षरशः उरस्फोड सुरू झाली. काही मिनिटांतच अजितदादा गेल्याची बातमी समजली आणि आभाळ कोसळल्यासारखा आणि बारामती पोरकी झाल्यासारखा घराघरांत अश्रूंचा पूर वाहू लागला..बारामतीकरांसाठी शरद पवार हे श्रद्धास्थान आहेत. मात्र घराघरांत पोहोचलेला, तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा, प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणारा आणि चुलीपर्यंत विकास पोहोचविणारा, प्रपंचाला हातभार लावणारा ‘दादा’ हृदयात होता. त्यामुळे आज त्यांच्या अपघाती मृत्यूने आपल्याच घरातला कर्ता पुरुष किंवा कुटुंबप्रमुख हरविल्याची भावना प्रत्येकाच्या ठायी होती. जो दादांना कधी भेटला नव्हता किंवा वैचारिक मतभेदांमुळे दादांना मत देत नव्हता, असा माणूसही अंतर्बाह्य हादरून गेला..Ajit Pawar Passes Away: अजित पवारांसारखा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा होणे नाही; शेतकरी नेत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.सकाळी नऊलाच बारामतीकरांना अजितदादांच्या अपघाताची बातमी समजली. सुरुवातीला काही काळ ते सुरक्षित असल्याची अफवा पसरली आणि लोकांना हायसे वाटले. मात्र पुढच्याच काही क्षणांत खरी बातमी कळाली आणि घराघरांना हुंदके फुटले. सुरुवातीला कुणाचाच विश्वास बसला नाही. बातमी सांगणाऱ्यांवरच लोक भडकत होते. मात्र हळूहळू लोकांची खात्री पटली. आपल्याच घरात कुणी कुणाशी बोलत नव्हते. न्याहारी करणाऱ्यांचा घास घशातच अडकला. जेवण बनविण्यासाठी तर चुलीच पेटल्या नाहीत..सकाळी उघडलेली दुकाने, हॉटेल, मॉल्स, छोटे व्यवसायिक यांची शटर पुन्हा खाली झाली. अख्ख्या बारामती तालुक्यात चहाची टपरीसुद्धा उघडी नव्हती. गावोगावचे चौक सुने सुने झाले. एरवी प्रचंड गर्दीने वाहणारे बारामती शहर सुनसान स्मशानासारखे भासत होते. शाळांमध्ये गेलेले विद्यार्थी, शिक्षक डोळे पुसत पुसत दप्तर पाठीवर टाकून पुन्हा घराकडे परतले. विद्या प्रतिष्ठान, शारदानगर, सोमेश्वर शिक्षण मंडळ, शिवनगर या अजितदादांच्या कष्टाने बहरलेल्या शिक्षणसंकुलात मुलांचा आणि पाखरांचाही किलबिलाट थांबला. शिवनगरच्या क्रीडा स्पर्धा जागेवर थांबल्या..Ajit Pawar Death: 'दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला'; मुख्यमंत्री फडणवीसांकडून भावना व्यक्त, तीन दिवसांचा दुखवटा जाहीर .शाळांची स्नेहसंमेलनाची चाललेली तयारी चालू वर्षापुरती थांबविण्यात आली. साखर कारखान्यांवर, उद्योगांमध्ये कामाला गेलेल्या कामगारांना हृदयावर दगड ठेवून काम करावे लागले. राज्याच्या विविध भागांतून आलेले ऊसतोड मजूरही उसाच्या फडात काम करता करता तास-दोन तास थांबले. गावागावांत अजितदादांनी मोठमोठ्या पाणीयोजना दिल्या आहेत, आज त्या पाणीयोजना गावकारभाऱ्यांनी बंद पाडल्या आहेत. शहरातील अजितदादांच्या नजरेतून साकारलेली पंचायत समिती, नगरपालिकेचीही शटर ओढण्यात आली..अजितदादांनी उभारलेले सहकाराचे जाळे आज विस्कटल्यासारखे झाले. सोमेश्वर व माळेगाव कारखान्यांच्या चिमण्या धूर नव्हे तर दुःखाचा उसासा टाकत असल्यासारखे वाटत होते. तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, बँका बंद होत्या..आता शनिवारी किंवा रविवारी होणारा जनता दरबार भरणार नाही, अनोळखी माणसांचे कुठल्याही ओळखीशिवाय प्रश्न सुटणार नाहीत, गावोगावच्या सभांमध्ये अजितदादांची मिश्किली आणि भरदार आवाज ऐकायला मिळणार नाही. वांड नेतेमंडळींची झापाझापी होणार नाही, अशा चर्चा लोक करत होते. चौकाचौकांत धक्का बसलेले लोक एकमेकांमध्ये दुःख वाटून घेत होते. ‘अरे ये मुसळे, त्या महिलेचा अर्ज घे ना’ असे पीएवर चिडणार नाहीत आणि ‘तुला झेडपीचं नाही, आमदारकीचंच तिकीट देतो’ असं योगेश जगतापांना म्हणणार नाहीत, ‘ह्यो पोपट तर सारखा फुडं फुडं’ अशी पोपट तावरेंची हमखास होणारी खिल्ली उडणार नाही. ‘संभाजीनं चांगलं काम केलं’ अशी प्रशस्ती कुणी करणार नाही आणि ‘उसाला राज्यात एक नंबरचा असा भाव देतो की बासच’ असा शेतकऱ्यांना आधार मिळणार नाही, ‘गरिबांची पोरं आता नासाला जाणार नाहीत’ असे तालुक्यात लोक बोलत होते..बारामती शहरावरून ढळणारा सूर्य मावळण्यासाठी डोंगर नाही. सूर्य ढगातच मावळतो. त्याच बारामतीचा ‘विकाससूर्य’सुद्धा आज ढगात मावळल्यासारख्या भावना दाटून आल्या होत्या. या विकाससूर्याने आजवर बारामतीवर सप्तरंगाची उधळण केली होती, पण आज सायंकाळी विकाससूर्याची मावळतीची उदास सावली तालुक्यावर पसरली होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.