हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथील (ता. वसमत) येथील विष्णूराजे इंगोले यांनी कुरुंदकर फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. या भागात केळी मुख्य असल्याने बागायतदारांना हक्काची बाजारपेठ व हमीचा दर मिळावा यादृष्टीने इंगोले यांनी कंपनीच्या माध्यमातून केळी चिप्सची निर्मिती सुरू केली. सुमारे शंभर केळी उत्पादक या कंपनीशी जोडले आहेत. दररोज एक क्विंटल चिप्स निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून काम सुरू असून, वर्षाला ८५ लाखांची उलाढाल करण्यापर्यंत कंपनीने यशस्वी पल्ला गाठला आहे. .हिंगोली जिल्ह्यात वसमत शहरापासून १५ किलोमीटरवर वसमत ते बोल्डामार्गे कळमनुरी राज्य रस्त्यावर कुरुंदा हे महसूल मंडलाचे ठिकाण आहे. पैनगंगा नदीवरील इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कालव्यामुळे पाण्याची मुबलकता असते. केळी आणि हळद ही या भागातील शेतकऱ्यांची प्रमुख पिके आहेत. केळी हे पीक विचारात घेता वसमत तालुक्यात ६८० हेक्टर, कुरुंदा मंडलात ३०० हेक्टर, तर कुरुंदा गावात ७५ हेक्टरपर्यंत लागवड आहे. प्रगतिशील शेतकरी मारोतराव इंगोले यांचे संयुक्त कुटुंब असून त्यांना किशन, विष्णूराजे व सुरेश अशी तीन मुले आहेत. कुरुंदा व सोमठाणा अशी मिळून २५ एकर शेती आहे. हळद, ऊस, सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत. .Banana Chips : कुरकुरीत आणि चवदार कच्च्या केळीचे चिप्स घरच्याघरी कसे बनवाल?.शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना विष्णूराजे यांनी बी.टेक.(अन्नतंत्र) पदवीच्या द्वितीय वर्षांपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर काही काळ पुणे येथे ‘ॲनिमेशन रायटर’ म्हणून काम केले. त्यानंतर गावी कुरुंदा येथे परतून त्यांनी शेतीतच प्रगती करण्याचे ठरवले. आपल्या परिसरातील सुमारे आठ गावांतील शेतकऱ्यांना एकत्र करून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ‘नाबार्ड’चे स्थानिक जिल्हा व्यवस्थापक प्रीतम जंगम यांच्या मार्गदर्शनातून १५ नोव्हेंबर २०१९ मध्ये कुरुंदकर फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. .कुरुंदा परिसरातील दाभडी, सोमठाणा, पार्डी बागल, ममदपूरवाडी, कोठारी, सुकळी, डोणवाडा आदी गावांमधील मिळून ५०८ शेतकरी या कंपनीचे सभासद आहेत. प्रति सभासद एकहजार रुपये भागभांडवल जमा करण्यात आले. विष्णूराजे इंगोले अध्यक्ष, गोविंद अंभोरे उपाध्यक्ष तर नागेश पडोळे सचीव आहेत. संचालक मंडळात संगीता पडोळे, गोविंद दळवी यांचा समावेश आहे. .Coconut Chips : ओल्या नारळाचे कुरकुरीत गोड, खारे चीप्स .केळी चिप्स निर्मितीत पाऊल नाबार्ड अंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणे घेण्यात आली. त्यानुसार कुरुंदकर कंपनीने हळद खरेदी- विक्री तसेच प्रक्रिया याद्वारे हळद पावडर निर्मिती सुरु केली. वसमत हळदीला भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळण्यासाठी कुरुंदकर कंपनीने सूर्या फार्मर्स कंपनीसोबत प्रस्ताव सादर केला होता. जेमतेम वर्षभर विक्री केली.परंतु २०२० मध्ये कोरोनाच्या संकटात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. अखेर पावडर निर्मिती बंद करावी लागली. .त्यानंतर भागातील केळी या अन्य मुख्य पिकातून कंपनीने प्रक्रियेसाठी दुसरा पर्याय शोधला. त्याला कारणेही तशीच होती. क्षेत्र मोठ्या प्रमाणावर होते. मात्र दरांमध्ये सातत्याने चढउतार होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात व्हायचे. या भागात केळीवर प्रक्रिया करणारे उद्योगही फारसे नव्हते. त्यामुळे केळीपासून चिप्स हा पर्याय आश्वासक होता. मात्र निर्णय पक्का करण्यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील केळी चिप्स उद्योगांना भेटी दिल्या. तेथील उद्योजक शेतकऱ्यांकडून उद्योगातील संधी, आव्हाने याबाबत जाणून घेतले. .चिप्सचे विविध फ्लेव्हर्ससन २०२१ मध्ये शेतातच युनिट उभारून विष्णूराजे आणि सईराणी या इंगोले दांपत्याने घरगुती पद्धतीने चिप्स तयार करण्यास सुरुवात केली. आवश्यक यंत्रसामग्रीसाठी ४० हजार रुपये खर्च केला. एकूण सभासदांपैकी सुमारे शंभर शेतकरी कंपनीला कच्च्या केळीचा पुरवठा करतात. त्यांना १० रुपये प्रति किलो हमीभाव देण्यात आला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनाही नजीक व हक्काची बाजारपेठ तयार ढाली आहे. .Banana Processing Foods: कच्च्या केळीपासून पीठ, चिप्स निर्मिती .सुरवातीच्या काळात थोड्या प्रमाणात चिप्स निर्मिती व्हायची. आज प्रति दिन एक क्विंटल निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून काम होते. ‘ओरिजनल’, काळी मिरी, खट्टा-मीठा या तीन मुख्य फ्लेव्हर्समध्ये चिप्स उपलब्ध केल्या आहेत. त्यासाठी घरगुती पद्धतीने मसाले देखील तयार केले जातात. याशिवाय बाहेरील मसाल्यांवर आधारित पेरीपेरी, मॅगी आदी फ्लेव्हर्सही सादर केले आहेत. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन २० ग्रॅम, १०० ग्रॅम, २०० ग्रॅम व ५०० ग्रॅम असे पॅकिंग केले आहे. .बाजारपेठ व उलाढाल किराणा दुकानदार, स्वीट मार्ट, फेरीवाले आदींना चिप्सचा पुरवठा होतो. नांदेड शहर जवळ असल्याने मार्केटिंगच्या दृष्टीने या ठिकाणी अधिक व त्याचबरोबर हिंगोली व परभणी जिल्ह्यातील बाजारपेठांवर भर दिला आहे. विविध कृषी प्रदर्शनांमध्येही स्टॉल उभारून ब्रॅंड लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला आहे. हैदराबादपर्यंत चिप्स पोहोचले आहेत. व्यापाऱ्यांना मागणीनुसार थेट वाहनाद्वारे जागेवर पुरवठा केला जातो. .उद्योगाच्या पहिल्या आर्थिक वर्षात म्हणजे २०२२ मध्ये १०० ते १२० क्विंटल चिप्समिर्मिती होऊन ४९ लाखांची उलाढाल झाली. सन २०२३ मध्ये २०० ते २८० क्विंटलपर्यंत उत्पादन तर ५५ लाखांपर्यंत उलाढाल झाली. तर मागील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये २४० क्विंटल चिप्स उत्पादन होऊन ८० लाखांच्या दरम्यान उलाढाल झाली. महिन्याला २० ते २५ क्विंटल, तर वर्षाला २५० ते ३०० क्विंटल चिप्स उत्पादन घेतले जाते. सध्या चिप्सचे किरकोळ विक्रीचे दर प्रति किलो २०० रुपये आहेत. खर्च जाता सुमारे २० टक्के नफा शिल्लक राहतो. .रोजगार निर्मिती विष्णूराजे यांना उद्योगात पत्नी सईराणी तसेच कंपनीच्या सर्व सदस्यांची समर्थ साथ आहे. उद्योगातून आठजणांना कायमस्वरूपी रोजगार दिला आहे. कंपनीला आता पुढील टप्पा गाठायचा आहे. शासनाच्या मॅग्नेट प्रकल्पांतर्गत लागवड, उत्पादन, शीतगृहे, प्रक्रियेपर्यंतची मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी कुरुंदकर कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत. सुमारे २५० टन क्षमतेचे शीतगृह उभारण्याचे नियोजन आहे. विष्णूराजे यांचे मोठे बंधू किशन घरच्या शेतीची जबाबदारी पाहतात. तर धाकटे बंधू सुरेश कंपनीच्या दूध प्रक्रिया उद्योगाचे कामकाज पाहतात. दररोज २०० ते ३०० लिटर दूध संकलन होते. त्यावर प्रक्रिया करून पनीर, खवा, तूप निर्मिती सुरू केली आहे.विष्णूराजे इंगोले ७०२०००५४९१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.