Jalgaon News: देशभरात वाढलेली केळीची आवक, लागवड व उत्पादकता आणि आक्रसलेली बाजारपेठ यामुळे केळी दरांवर मोठा दबाव तयार झाला आहे. शेतातच केळी पिकून लागली आहे. मागील साडेतीन महिन्यांतील केळी दरांवरील दबावाने देशात कोट्यवधींची हानी झाली आहे. यातच देशाचा पारंपरिक शत्रू असलेल्या पाकिस्तानच्या केळीने आखातातील बाजारात शिरकाव केल्याने देशातील केळी निर्यातीसही फटका बसू लागला आहे. .राज्यात कापूस, ऊस व अन्य फळे, भाजीपाला पिकांच्या तुलनेत केळी पीक परवडत असल्याने अनेक बागायतदार केळीकडे वळले. केळी लागवडीत राज्यात मोठी वाढ मागील दोन वर्षांत झाली. पाऊसमानही चांगले राहिल्याने राज्यातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता सर्वत्र केळी लागवड होत आहे. ड्रीप यंत्रणेमुळे मध्यम, हलक्या, उताराच्या जमिनीत केळी जोमात येवू लागली. त्यात मागील तीन हंगामात काही महिने वगळता केळीचे दर बऱ्यापैकी होते. गणेशोत्सव, नवरात्रीत मागील वेळेत केळी दर कमाल ३३०० रुपयांपर्यंत पोचले होते..राज्यात नाशिकसह नगर, पुणे, कोकण, पालघर, बुलडाणा, वाशीम, अमरावती, नागपूर, अकोला, परभणी, नांदेड, धाराशीव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आदी सर्वच भागात केळीची लागवड झाली आहे. देशातही उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल या भागात केळी पीक वाढले आहे. राज्यातील केळी लागवड दोन वर्षांपूर्वी ८२ हजार हेक्टरवर होती. २०२४-२५ मधील केळी लागवड दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी, गोरखपूर या भागात केळी पीक प्रमुख बनले आहे. या भागातही उसाऐवजी केळीस पसंती मिळाली. पण तेथेही केळी दरांवर परिणाम झाल्याने केळीवर नांगर फिरविला जात आहे..Banana Price Crash: निर्यातक्षम केळीस १५ ते २० रुपये दर.ठळक बाबीदेशात केळी लागवडीत ३५ टक्के वाढ मागील वर्षभरात झाली आहे.केळी लागवडीत वाढ झाली, पण निर्यातीत देशाचा वाटा तीन टक्क्यांवरही नाही.जगात केळी लागवडीत भारत क्रमांक एकचा देश आहे.देशाची केळी उत्पादकता हेक्टरी २५ ते ३० टनांवरून ४० टनांवर पोचली आहे.देशात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल व मध्य प्रदेशात केळी लागवडीत ३५ टक्क्यांवर वाढ दिसत आहे.दाक्षिणात्य क्षेत्रातही केळी लागवड कायम आहे..अन्य देशांचा निर्यातीत दबदबाजगात केळी निर्यातीत फिलिपिन्स, इक्वेडोर, ग्वाटेमाला, होंडुरास व अलिकडे श्रीलंकेचाही वाटा वाढत आहे. केळी लागवड कमी व उत्पादकता आणि निर्यात अधिक, असे सूत्र या देशांत आहे. या तुलनेत भारतीय केळीला स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागत आहे. देशांतर्गत मागणीवर परिणाम झाल्यास भारतीय केळी दरांवर दबाव वाढतो..भंगारापेक्षा कमी दरसध्या देशातील बाजारांत केळीचे दर कोसळले आहेत. भंगारापेक्षा कमी दर केळीचे असल्याचे दुःख शेतकरी व्यक्त करीत आहेत. सध्या केळीचा प्रति किलोचा दर ५ ते ७ रुपयांवर खाली आला आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यातून प्रतिदिन १० ते २० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) होणारी निर्यात आता केवळ बोटावर मोजण्याइतपत खाली आली आहे, खानदेशातील केळी निर्यातही रखडत सुरू असून, रोज १५ ते २० कंटेनर केळी परदेशात जात आहे. राज्यातून मार्च ते जून या कालावधीत रोज ७५ ते ८० कंटेनर केळीची परदेशात पाठवणूक सुरू होती. ती आता ३० कंटेनरपेक्षा कमी आहे. दुसरीकडे केळी आवक सर्वत्र वाढली आहे..Banana Price: आवक घटल्याने खानदेशात केळी दर स्थिर.खर्च, उत्पन्नाचा ताळमेळ नाहीअन्य बागायती पिकांच्या तुलनेत केळी परवडणारे पीक ठरल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी केळी शेतीवर अवलंबून आहेत. केळीला प्रतिएकर सुमारे १ लाख ८० हजार ते २ लाख रुपये इतका खर्च येतो. उसाच्या तुलनेत केळीला मिळणारा दर आणि उत्पन्न शेतकऱ्यांना परवडणारे होते. परंतु सध्याच्या दरानुसार एवढा खर्चही निघणे कठीण झाले आहे. काही शेतकऱ्यांना तर मजुरांचा पगार आणि खतांच्या उधाऱ्या, घेतलेले कर्जही अजून फेडता आलेले नाही. त्यामुळे झालेला खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याचे चित्र आहे..पाकिस्तानी केळीची स्पर्धाभारतामधून निर्यात होणाऱ्या एकूण केळीपैकी ७० टक्के केळी इराणला पाठवली जातात. तसेच इराकमध्येही खानदेशातून अधिकची केळी जाते. परंतु सध्या इराक, इराण बाजारात पाकिस्तानमधून केळीची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने भारतीय केळीला तुलनेने कमी उठाव आहे. निर्यात रोडावल्याने स्थानिक बाजारपेठेत केळीसंबंधी पोकळी तयार होत नसल्याची स्थिती आहे. केळी नाशवंत आहे. दरांचा फारसा विचार, चिंता न करता वेळेत तिची काढणी करावीच लागते. परिणामी केळी दरांवर मोठा दबाव आहे. पाकिस्तानातील सिंध व अन्य भागात केळी लागवड होत आहे. या केळीचा दर्जा भारतीय केळीपेक्षा सरस नाही, पण पाकिस्तानातील केळी इराण, इराकमध्ये पाठवणुकीचा खर्च किंवा वाहतूक (लॉजिस्टीक कॉस्ट) तुलनेने कमी असल्याने इराणी, इराकमधील आयातदार पाकिस्तानी केळीस पसंती देत आहेत..राज्यातील स्थितीसोलापूर जिल्ह्यात एकूण २५ हजार हेक्टरवर केळीचे क्षेत्र विस्तारले आहे. त्यापैकी १८ हजार हेक्टरवर केळीची निर्यात होते, तर उर्वरित ७ हजार हेक्टर केळी स्थानिक बाजारात जाते. जानेवारी ते ऑगस्ट हा मुख्य हंगाम आहे, पण थंडीचे २-३ महिने वगळता वर्षभर लागवड होते. वजन, आकारमान, चव या बाबतीत सोलापूरची केळी सरस आहे. तर खानदेशातील केळी लागवड एकूण ८५ हजार हेक्टर आहे. कांदेबाग बहर (ऑक्टोबर ते डिसेंबर) व मृग बहर (मे ते सप्टेंबरमधील बागा) केळी लागवड खानदेशात अधिक आहे..केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ कठीण आहे. दर घसरणीमुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. निर्यातीची मागणी घटली आहे, शिवाय वातावरणाचाही फटका बसला आहे, पण ही स्थिती कायम राहील असे नाही, गुणवत्तापूर्ण केळीला उठाव मिळेल.किरण डोके, केळी निर्यातदार, कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर.माझी ५ एकर केळी आहे, सध्या काढणी शेवटच्या टप्प्यात आहे, निर्यातीसाठी १०-११ रुपयांचा दर मिळतो आहे. तो अजिबात परवडत नाही, पण करणार काय, दुसरा पर्याय नाही. खर्चही निघणे मुश्कील झालं आहे. व्यापारी तर प्रत्येकवेळी दर पाडून मागत आहेत.सोमनाथ हुलगे, शेतकरी, बेंबळे, (ता. माढा, जि. सोलापूर).केळीची आवक वाढली आहे. मिळतील त्या दरात तिची विक्री करण्याची वेळ आली आहे. खर्चही निघत नाही. एका केळी झाडावर किमान १०० रुपये खर्च होतात. पण सध्या एक केळीचा घड तोट्यात द्यावा लागत आहे.सौरव महाजन, शेतकरी, खेडी खुर्द, ता. जळगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.