Outdoor Life: एका दुर्गवेड्याच्या शोधयात्रेचा हा लेखाजोखा जसा निसर्गाभिमुख जीवनशैलीची चुणूक दाखविणारा आहे, तसाच तो कैक मैलांचे अवघड अंतर स्थितप्रज्ञतेने पार करणाऱ्या मानवाच्या आदिम प्रवासी वृत्तीचाही द्योतक आहे. मनोज कापडे यांनी हे अंतर आपल्या छंदासाठी अतीव आनंदाने पार केले..शिवकालीन घाटवाटा, दऱ्या-डोंगरातील कृषी संस्कृती आणि मावळ्यांच्या जीवनशैलीची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी मनोज कापडे नावाचा एक अवलिया थेट रायगड ते साल्हेर असे अठरा दिवस अखंडपणे पायी चालत गेला आहे. विशेष म्हणजे, या डोंगरयात्रेत त्याने वाटाड्या, नकाशा किंवा मोबाइल तर वापरला नाहीच, शिवाय जंगलात राहून स्वतः अन्न शिजवले. तसेच कडाक्याची थंडी असून कधीही अग्नी पेटवला नाही..‘अॅग्रोवन’ दैनिकात उपमुख्य वार्ताहर असलेला हा निसर्गप्रेमी माणूस एरवीदेखील विविधांगी लेखनातून सह्याद्री पर्वतरांगांमधील कृषी संस्कृतीचा सतत वेध घेत असतो. गेल्या वर्षी त्यांनी पहिली महाभ्रमंती यशस्वीपणे पार पाडली होती. त्यात कोयना खोऱ्याच्या पश्चिमेकडील मधुमकरंदगडाच्या जंगलातून त्यांनी पुढे अखंड सतरा दिवस सह्याद्री डोंगररांगांमध्ये प्रवास केला. शेवटी ते थेट कळसूबाई शिखरावर पोहोचले होते..Panjabrao's Inspiring Journey : २ कोटी शेतकऱ्यांनी पाहिलेल्या कृषी प्रदर्शनाची आजही चर्चा.यंदा मात्र त्यांनी आणखी अधिक कठीण प्रयोग केला. ७ डिसेंबर २०२५ रोजी रायगडच्या पाचाड येथून पहाटे पाच वाजता त्यांच्या दुसऱ्या महाभ्रमंतीला सुरुवात केली. राष्ट्रगीत आणि शिवकल्याण राजा या गीतानंतर त्यांनी दुर्गदुर्गेश्वर रायगड गाठला. तेथे आई भवानी, आई शिरकाई आणि राजाधिराज छत्रपती शिवरायांना त्रिवार वंदन करून त्यांनी सह्याद्रीच्या तडक उत्तर दिशेने पावलं टाकली. लक्ष्य एकच होतं, थेट दुर्गराज साल्हेर गाठण्याचं..ही मोहीम म्हणजे निसर्ग यात्रा, शिवयात्रा आणि दीर्घ पल्ल्याची भटकंती यांचा अभूतपूर्व असा संगम होती. मात्र या महाभ्रमंतीची वैशिष्ट्ये ठरली ती मनोजने स्वतःवर लादून घेतलेले दहा कठोर नियम. त्यानुसार, ही संपूर्ण भटकंती एकट्यानेच करायची, कुठेही वाटाड्या वापरायचा नाही, कोणालाही वाट विचारायची नाही. मोबाइल पूर्णपणे बंद, कागदी नकाशे, गुगल मॅप, जीपीएस किंवा कोणतेही ट्रेक अॅप वापरायचे नाहीत. सर्व निर्णय स्वतः घ्यायचे, कोणाकडेही जेवायचं नाही, जंगलात स्वतःच अन्न तयार करायचं आणि त्यासाठीही जंगलातील लाकूड जाळायचं नाही..कोणाकडे पाणी मागायचं नाही, डोंगरातील पाणी प्यायचं, कोणाच्याही घरात झोपायचं नाही, जंगलात, गुहेत किंवा प्राचीन मंदिरातच विसावा घ्यायचा. सर्व शिधा स्वतः पाठीवर वाहायचा, कुठेही काहीही विकत घ्यायचं नाही, गाणी म्हणायची नाहीत, मौन पाळायचं आणि प्रत्येक पावलागणिक आनंद मिळवायचा, असे हे अजब नियम होते..FPO Success Story: शेतकरी हिताला प्राधान्य देत ‘श्रमविकास’ ची झेप .या कठोर नियमांनुसार मनोज कापडे चालत चालत अठरा दिवसांनी म्हणजेच २४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सात वाजता महाराष्ट्राच्या उत्तरेतील, गुजरात सीमेवरील दुर्गराज साल्हेर किल्ल्यावरील परशुराम शिखरावर पोहोचले. कळसूबाईनंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे ते उंच शिखर आहे. तेथे त्यांनी शिवस्तोत्र, पसायदान आणि महाराष्ट्र गीताने या महाभ्रमंतीची सांगता केली व मध्यरात्री तीन वाजता ते साल्हेर गड उतरून साल्हेरवाडीत आले..या प्रवासात त्यांनी डोंगररांगा, दऱ्याखोऱ्या, खिंडी, नद्या-नाले आणि घाट पार केले. रायगड, अंशतः ठाणे, पुणे, अहिल्यानगर, अंशतः पालघर व नाशिक जिल्ह्यांतून ही निसर्ग यात्रा गेली. काळ नदीच्या खोऱ्यापासून सुरू झालेला हा प्रवास मोसे, मुठा, मुळा, इंद्रायणी, पवना, भीमा, प्रवरा, दारणा, वैतरणा, गोदावरी, कादवा, गिरणा आणि पुनद नद्यांच्या खोऱ्यांतून पुढे सरकला..या भ्रमंतीत एक दिवस ते जंगलात आजारी पडले. तेव्हा स्थानिक शेतकरी त्यांच्या मदतीला धावले. त्यामुळे पुन्हा कंबर कसून ते पुढील प्रवास करू शकले.या काळात प्रचंड थंडी, हिंस्त्र श्वापद, जंगल चकवे, चोर-भामटे अशा अनेक संकटांशी त्यांना सामना करावा लागला. २५ ते ३० किलो वजनाची पिशवी पाठीवर घेऊन ही महाभ्रमंती करताना त्यांची शारीरिक आणि मानसिक कसोटी पणाला लागत होती. परंतु, निसर्गाला बाधा न पोहोचविता भटकंती करणं हे मनोज कापडेंचं वैशिष्ट्य बनले आहे..मावळ्यांच्या पायाची धूळ बनलो...“रायगड ते साल्हेर या एकल महाभ्रमंतीत स्वराज्यातील मावळ्यांचं स्मरण मी करीत होतो. त्यांच्या पावलांची धूळ होत सह्याद्रीत एकांतात जगण्याचा अनुभव मिळाला हे मी माझे भाग्य समजतो,” असे श्री.कापडे यांनी सांगितले. “हा डोंगरप्रवास माणुसकीची बेटं दाखविणारा होता.विशेषतः सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील शेतकऱ्यांकडे शिवकालीन मावळ्याची शूर, त्यागी आणि मदतीची वृत्ती अजूनही टिकून असल्याचे दिसून आले. जंगलात आणि वाटेत भेटलेल्या शेकडो हितचिंतकांबद्दल मी कायम ऋणी आहे,” अशा शब्दांत ते कृतज्ञता व्यक्त करतात.- मनोज कापडे ९८८११३१०५९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.