Wardha News : आम्ही हाडं मोडून शेती केली. बी-बियाणं, खतं, औषधं यावर हजारो रुपये खर्च केले. पण शेवटी हातात आलं काय? काळं पडलेलं शेत आणि रिकामं पोट! हे आमचं भविष्य आहे का? अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपली वेदना नागपूर विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांच्या नुकसान पाहणी दरम्यान व्यक्त केली. .सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यात सततच्या पावसाने कपाशी आणि तूर पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे. कर्जाचा डोंगर, पोटाची खळगी, आणि शेतात उघडं वाळलेलं पीक. सरकारनं जर मदत केली नाही तर शेतकऱ्यांना जिवंत राहणं कठीण होईल, अशी परिस्थिती आहे. पवनारच्या शिवारातली ही कहाणी केवळ एका गावाची नाही, तर संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांची प्रतिमा आहे..Flood Relief: अतिवृष्टीग्रस्त ७१२ कुटुंबांना शासनाकडून मदत जाहीर.पवनार हे गाव पिंपरी मेघे महसूल मंडलात आहे. या मंडलात अतिवृष्टीची नोंद नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची कोणतीही मदत मिळत नाही. पवनारच्या शेजारच्या सेवाग्राम मंडलात अतिवृष्टीची नोंद आहे. त्यामधील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे, पण पवनारचे शेतकरी मात्र हताश. तोच पाऊस, तीच जमीन, तीच पिकं, मग मदत एका मंडलाला आणि वंचना दुसऱ्याला का? हा अन्याय आम्ही किती काळ सहन करायचा, असा सवाल उपस्थित झाला..Beed Flood: बीडमधील पाणी ओसरले, पण जनजीवन विस्कळितच.अधिकारी मात्र यावर निरुत्तर झाले. परिस्थिती भीषण आहे. याचा सखोल अहवाल शासनाला पाठवू एवढंच ते म्हणाले. पण शेतकऱ्यांनी तडक उत्तर मागितलं. अहवालांनी पोट भरतं का साहेब? आम्हाला तर थेट मदत पाहिजे, असा आक्रोश शेतकऱ्यांनी या वेळी केला. पाहणीदरम्यान घाटगे यांच्यासह जिल्हा कृषी अधीक्षक रमाकांत कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी वैष्णवी शिंदे, चंद्रशेखर चवणे, सुभाष मुडे, जांबुवंत मडावी उपस्थित होते. शेतकरी सुरेश इखार, जानिक काळबांडे, वासुदेव सावरकर, किशोर देवतळे, संजय आदमने, शंकर काखे, प्रशांत भोयर, रामदास घुगरे, अरुण घुगरे आदींनी प्रश्नांचा भडीमार केला..ऑनलाइन योजनांचा फज्जा...पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या ऑनलाइन योजनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्ज भरण्यासाठी ना संगणक, ना मोबाइल, ना नेट गावात. तासन्तास रांगा लावल्या तरी अर्ज दाखल होत नाहीत. पोर्टल कधी बंद, तर कधी सर्व्हर डाउन. मग शेतकऱ्यांनी मदत घ्यायची तरी कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यामुळे शासनाच्या योजनांचा खराखुरा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही, तर त्या योजनांचं अस्तित्व कागदावरच मर्यादित राहतं. ऑनलाइन प्रणालीत सुधारणा न केल्यास शेतकरी केवळ कागदी आश्वासनांवर जगणार, असा आक्रोश या वेळी शेतकऱ्यांच्या तोंडून उमटला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.