सुनीता लांडेWomen Entrepreneurs: पतीच्या निधनाचा धक्का बसलेल्या लोणी खुर्द (जि. अहिल्यानगर) येथील सुनीता लांडे यांनी स्वतःला सावरले. कुटुंबाची अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत करण्यासाठी खंबीरपणे त्या उभ्या ठाकल्या. घरगुती व लघू स्वरूपात सुरू असलेल्या आवळ्यावर आधारित विविध उत्पादने निर्मिती उद्योगाला अधिक व्यापक रूप देण्यास सुरुवात केली. महिला बचत गटाची मदत घेत विक्रीव्यवस्था उभारली. उत्पादनांची गुणवत्ता जपत ग्राहकांचा विश्वास संपादन केला. खंबीर राहून, जिद्द, चिकाटी कायम ठेवून ‘पोषण रिच’ हा ब्रॅण्ड विकसित केला. वर्षाला ६० लाखांपर्यंत उलाढाल पोहोचविली. आज आदर्श प्रक्रिया उद्योजिका म्हणून सुनीता यांनी नाव कमावले आहे. .अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुका परिसरात पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी आहे. त्यामुळे शेतीचे चित्र तुलनेने चांगले आहे. तालुक्यातील लोणी खुर्द येथील सुधीर लांडे हे अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबातील आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठात फळ प्रक्रियांच्या संशोधन विभागात ते नोकरीस होते. कृषी विद्यापीठात वीस वर्षांपूर्वी आवळ्यापासून कॅण्डी तयार करण्याचा संशोधन प्रक्रियेत त्यांचा सहभाग होता. त्यांना आवळ्यावर आधारित उत्पादने निर्मितीचा उद्योग घरीही सुरू करण्याची इच्छा होती. .Pickle Business Success Story: जिद्दीतून साकारले ‘सुगरणीचे लोणचे’.त्यासाठी पत्नी सुनीता यांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्याच मार्गदर्शनातून एमएपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुनीता यांनी २००६ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठात आवळा कॅण्डी व अन्य पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. घरगुती स्वरूपात व्यवसाय सुरू केला. दरम्यान, मुलगा यशचे अभियांत्रिकेचे तर मुलगी सुकन्याचे कृषी पदवीचे शिक्षण सुरू होते. सुधीर नोकरीत व्यस्त होते. कुटुंबाचा गाडा सुरळीत सुरू होता. मात्र २०२० मध्ये सुधीर यांचे अचानक निधन झाले. संसाराचा संपूर्ण भार सुनीता यांच्यावर आला. अचानक आलेल्या संकटाने हतबल झालेल्या सुनीता यांनी स्वतःला सावरले. प्रपंच सुरळीत सुरू करणे आणि कुटुंबाच्या अर्थकारणाला चालना देणे गरजेचे होते. या वेळी पूर्वी घेतलेले प्रशिक्षण व निर्मिती कौशल्य मदतीस आले. लघू स्वरूपात सुरू असलेल्या आवळा आधारित उत्पादने निर्मिती उद्योगाला मोठे व्यापक रूप द्यायचे असा निश्चय सुनीता यांनी केला..उद्योगाने घेतली उभारीखंबीरपणे एकेक समस्येला तोंड देत, चिकाटी व जिद्दीने सुनीता एकेक पाऊल पुढे टाकत राहिल्या. हळूहळू आत्मविश्वास येऊ लागला. बघता बघता पाच- सहा वर्षांच्या अनुभवातून उद्योगाने चांगली भरारी व पकड घेतली, वर्षाला ४० टनांपेक्षा अधिक कच्च्या मालापासून (आवळा) आज हनी, चटपटा, गूळ व प्रीमियम अशा चार प्रकारची कॅण्डी तयार होत आहे. सोबत आवळ्यापासून ज्यूस, लोणचे, पावडर, सिरप, शीतपेय, खिस व सुपारी अशा विविध उत्पादनांची निर्मिती केली जाते. पूर्वी स्थानिक पातळीवरून आवळ्याची खरेदी व्हायची. पाच वर्षांपासून राजस्थानातून खरेदी होते. या आवळ्यामुळे दर्जेदारपणा वाढल्याचा अनुभव आहे. ग्राहकांची मागणी ओळखून दोन वर्षांपासून कैरी लोणचे त अलीकडील काळापासून लिंबू, लसूण, मिरची आधारित लोणची तयार करण्यास सुरुवात केली आहे..Success Story of Dairy Business : दुग्ध व्यवसायात महिला बचत गटाची आघाडी .विक्री व्यवस्था केली उभीआपल्या उत्पादनांना बाजारपेठ तयार करण्यासाठी सुनीता यांना सुरुवातीच्या काळात महिला बचत गटाची मदत झाली. सन २००५ मध्ये सुनीता यांनी परिसरातील महिलांना सोबत घेतले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या ‘जनसेवा’ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यातून स्वामी समर्थ महिला बचतगट सुरू केला. अहिल्यानगर येथे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेकडून आयोजित महोत्सवात या बचत गटाला आपल्या उत्पादनांची विक्री करण्याची संधी मिळाली. त्यानंतर भीमथडी व अन्य ठिकाणीही अशी संधी मिळाली. ग्राहक, विक्री व्यवस्था, बाजारपेठ यांचा आवाका त्यातून येत गेला. विस्तार वाढल्यानंतर स्वतः फिरून तसेच विक्रेते ग्राहकांना विश्वास देत विक्री व्यवस्था मजबूत केली. सध्या.राज्यासह राज्याबाहेरही सुनीता यांच्या उत्पादनांना मागणी आहे. पुण्यात मुख्य तर अन्य ठिकाणी २५ पेक्षा अधिक विक्रेते आहेत. वर्षाला साठ लाख ते त्याहून अधिक उलाढाल होऊ लागली आहे. पोषण रिच असा उत्पादनांचा ब्रॅण्ड विकसित करीत सुनीता आज यशस्वी महिला उद्योजिका झाल्या आहेत. मुलगा यशची उद्योगात महत्त्वाची मदत मिळत आहे. प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने विस्तारलेल्या या उद्योगातून सुनीता यांनी कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे..अन्न प्रक्रिया योजनेची मदतयुनिट जागा, बांधकाम, पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी यंत्रे आदींसाठी टप्प्याटप्प्याने सुमारे ६० ते ७० लाखांची गुंतवणूक झाली आहे. घरची आर्थिक तजवीज करण्यासह पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून सोळा लाखांची मदत मिळाली. अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक प्रदीप लाटे आणि पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचे जिल्हा समन्वयक राजेश अभोरे यांचे सहकार्य लाभले. राहाता तालुक्यातील कृषी विभागाचीही महत्त्वाची मदत झाली. यंत्रसामग्रीमध्ये निर्मितीपासून ते पॅकेजिंगपर्यंतची साहित्य सुविधा आहे..रोजगार निर्मितीसंघर्षपूर्ण वातावरणात आणि अडचणींवर मात करत सुनीता यांनी उद्योगात भरभराट आणली. कधीकाळी स्वतःच्या रोजगारासाठी धडपड करणाऱ्या सुनीता यांनी आज आपल्या उद्योगातून अन्य महिलांना रोजगार दिला आहे. आवळ्यापासून उत्पादने तयार करण्याचा हंगाम सप्टेंबर ते मार्च असा असतो. या काळात दररोज १४ महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. अन्य वेळी दोन महिला कायमस्वरूपी तर चार ते पाच महिला गरजेनुसार कामाला असतात. कामगार महिलांना सर्व सुविधा मिळाव्यात असा सुनीता यांचा प्रयत्न असतो.सुनीता लांडे ९९२२३६२५११.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.