All American Reptile and Plant Expo: अमेरिकेतील कॅन्सस शहराजवळ ‘ऑल अमेरिकन रेप्टाइल अँड प्लांट एक्स्पो’ला मला भेट देण्याची संधी मिळाली. या ठिकाणी लोक सहज अजगर, विविध आकारांतील कासव, पाली, सरडे, पक्षी, ससे, उंदीर, खरेदी करत होते. प्राण्यांना ठेवण्यासाठी लागणारे पिंजरे, त्यांचे खाद्य, पिंजऱ्यामध्ये विशिष्ट वातावरण निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू पाहायला मिळाल्या. खासगी पशुवैद्यकीय दवाखाने, पशुवैद्यकांचे स्टॉल, माहिती केंद्र या ठिकाणी होते. या अनोख्या अजगर बाजाराचा थोडक्यात घेतलेला आढावा... .सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत असताना मला कॅन्सस शहराजवळ ‘ऑल अमेरिकन रेप्टाइल अँड प्लांट एक्स्पो’ला भेट देण्याची संधी मिळाली. खरं तर प्रदर्शन कमी आणि एक मोठा बाजार होता. प्रदर्शनातील अनेक स्टॉलवर आपण भाजीपाला, कपडे ज्या पद्धतीने खरेदी करतो त्याप्रमाणे लोक सहज अजगर, विविध आकारांतील कासव, पाली, सरडे, वेगवेगळे कीटक, पक्षी, ससे, उंदीर, खरेदी करत होते. खरेदीचा एक आनंद आणि उत्साह सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. .सोबत या सर्व प्राण्यांना ठेवण्यासाठी लागणारे पिंजरे, त्यांचे खाद्य, पिंजऱ्यातील विशिष्ट प्रकारचे वातावरण निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू यांचे देखील स्टॉल या ठिकाणी होते. विशेष म्हणजे या सर्व प्राण्यांसाठी आरोग्य सेवा पुरविणाऱ्या खासगी पशुवैद्यकीय दवाखाने, पशुवैद्यकांचे स्टॉल, माहिती केंद्र यासोबत या सर्वांचा विमा उतरवण्याच्या यंत्रणांचे स्टॉल या ठिकाणी होते. हे सर्व पाहताना खूप आश्चर्य वाटत होते..यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अजगर विक्रीसाठी प्रदर्शित केले होते. सुमारे ४५ टक्के स्टॉल हे अजगर उत्पादकांचे होते. होय उत्पादकच... हे सर्व जण अजगराचे प्रजनन करणारे व्यावसायिक होते. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या रंगात, आकारांत अजगरांच्या जोड्या सांभाळून त्यांच्यापासून विविध रंगाच्या आकाराचे अजगर उत्पादित करून त्यांचे हे पैदासकार त्यांचे संगोपन करतात आणि देशभर चालणाऱ्या ‘ऑल अमेरिकन रेप्टाइल अँड प्लांट एक्स्पो’ प्रदर्शनातून त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये विक्री करतात..Snake Bite : पिकांचे पंचनामे करताना तलाठ्याला चावला साप; शेतकऱ्यांनी थेट नदीच्या बंधाऱ्यातून खांद्यावर नेलं रुग्णालयात.पांढऱ्या, मिश्र रंगाचे अजगरअमेरिकेत अजगर हा पाळीव प्राणी आहे. साधारण १९८० च्या दशकात अमेरिकेत अजगर बाजार सुरू झाला. त्यामध्ये प्रामुख्याने ‘बॉल पायथॉन’ या जातीचे अजगर मोठ्या प्रमाणामध्ये पाळले जातात. स्वभावाने शांत, साधारण एक ते दीड मीटरपर्यंत वाढ होणारी ही प्रजाती आहे. फारच भीती वाटली किंवा डिवचले तर तत्काळ गुंडाळून चेंडूसारखी बसणारी ही प्रजाती आहे. म्हणून त्याला ‘बॉल पायथॉन’ असे म्हणतात..महिन्यातून एखाद-दुसरा छोटा उंदीर एवढेच त्याचे खाद्य आहे. या अजगराबाबत आंतरजाल धुंडाळले असता खूप मनोरंजक बाबी वाचायला मिळतात. या अजगर बाजाराची वार्षिक उलाढाल ही अमेरिकन ८०० दशलक्ष डॉलरची आहे. २०३५ पर्यंत ही उलाढाल १२०० दशलक्ष डॉलर पर्यंत पोहोचेल असे व्यावसायिक सांगतात. ही वाढ साधारण ४.४ टक्के आहे. इतके वेड हे अजगर संगोपन करणाऱ्या अमेरिकेतील लोकांचे आहे..अमेरिकेतील अजगराचा बाजार हा उद्योग खासगी लोकांच्या ताब्यात आहे. प्रदर्शना व्यतिरिक्त थेट किंवा पाळीव प्राण्यांच्या दुकानातून तसेच त्यांची ऑनलाइन विक्री देखील केली जाते. अल्बिनो अजगर म्हणजे पांढरा शुभ्र अजगर आपल्या भारतात कुठे आढळला तर त्याची राष्ट्रीय बातमी होते. पण अमेरिकेमध्ये वैविध्यपूर्ण अशा पांढऱ्या आणि मिश्र रंगाचे अजगर प्रजनन करून उत्पादित केले जातात. त्यांना प्रचंड मागणी असल्याचे बाजारातील विक्रेत्यांनी सांगितले. अजगर संगोपनासह त्याच्या चामड्याला देखील जागतिक बाजारपेठेमध्ये खूप मोठी मागणी आहे..Snake Awareness: जनजागृतीमुळे सापांना जीवदान.नैसर्गिक साखळीवर होतोय परिणामफ्लोरिडा राज्यांमध्ये १९७० च्या दशकात, अमेरिकेतील लोकांनी बर्मीज अजगर हे पाळीव प्राणी म्हणून पाळायला सुरुवात केली. पण हे अजगर जेव्हा २० फुटांपर्यंत वाढू लागले आणि त्यांना सांभाळणे अशक्य झाले, तेव्हा अनेक लोकांनी त्यांना दलदलीच्या प्रदेशात सोडून दिले. दलदलीच्या प्रदेशात बर्मिज अजगरांचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रजनन झाल्याने त्यांची संख्या प्रचंड वाढली..या आक्रमक अजगर प्रजातींनी फ्लोरिडा राज्यातील हरणे, ससे आणि पक्षी यांसारख्या स्थानिक प्राण्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने त्यांची संख्या ९० टक्क्यांपर्यंत कमी झाली. हा अजगर तेथील नैसर्गिक साखळीसाठी सर्वात मोठा धोका बनला. नैसर्गिक परिसंस्थेचे संतुलन बिघडल्याने लागल्याने बर्मीज अजगर पकडण्याची त्यांची शिकार करण्याची मोहीम देखील आखली गेली..आकार वजनानुसार शिकाऱ्यांना योग्य किंमत देण्यात आली होती. त्यासाठी भारतातून गारुडी समाजाच्या लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. पकडलेल्या अजगरांच्या कातडीतून फार मोठा उद्योग या ठिकाणी उभा राहिला. कातडीचा उपयोग हँडबॅग्ज, बूट, बेल्ट्स आणि इतर फॅशन अॅक्सेसरीज बनविण्यासाठी केला जातो. तर अशा एकूणच समस्या आणि उपाय या परिस्थितीतून हा बाजार, प्रजनन संस्था, पाळीव प्राण्यांची दुकाने, पशुवैद्यकांचे दवाखाने यांची साखळी निर्माण झाली. यातूनही अजगर पालन हा मोठ्या उलाढालीचा व्यवसाय अमेरिकेत झाला आहे, हे विशेष..जागतिक प्राणी दिवसाचे महत्त्व...दरवर्षी ४ ऑक्टोबर हा दिवस जागतिक प्राणी दिवस साजरा केला जातो. काल विविध देशांत जागतिक प्राणी दिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले. प्राणी कल्याण आणि त्याचे हक्क याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आज मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. त्यांचे संबंध हे अधिक गुंतागुंतीचे होत आहेत. त्यातून मानव वन्यजीव संघर्ष ही एक जागतिक समस्या बनत चालली आहे. या वर्षी साजरा झालेल्या जागतिक प्राणी दिवसाचे ‘प्राणी वाचवा, पृथ्वी वाचवा’ हे घोष वाक्य आहे..प्राण्यांची एकूणच परिसंस्था टिकविण्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. परागीभवन, बीज प्रसार, जमिनीचे आरोग्य टिकविण्यामध्ये देखील खूप मोठे योगदान आहे. सोबत जैवविविधता ही एकमेकांना पूरक असून मांसभक्षक प्राणी हे तृणभक्षी प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे जंगलाची वाढ होते. नैसर्गिक संतुलन राखले जाते. त्यामुळे जर प्राणी वाचले नाहीत तर पर्यावरण समतोल बिघडून नैसर्गिक आपत्ती, अन्नसुरक्षा याचे गंभीर प्रश्न निर्माण होतील. त्यासाठी ‘प्राणी वाचवा, पृथ्वी वाचवा’ हे घोषवाक्य भावनिक आव्हान न ठरता वैज्ञानिक सत्य ठरते. प्राणी संरक्षण आणि पर्यावरण आरोग्य याचा विचार या निमित्ताने होणे अपेक्षित आहे.- डॉ. व्यंकटराव घोरपडे, ९४२२०४२१९५ (सेवानिवृत्त सहायक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.