Ahilyanagar News : ‘‘बारा वाजल्यापासून रातभर पाऊस कोसळत होता. पहाटे चारच्या सुमाराला पाण्याचा लोंढा आला. नदीकाठच्या घरांत पाणी शिरायला लागलं. आरडाओरड, फोनाफोनी झाली. वीज गायब होती. पाणीच एवढ होतं की नदीनं प्रवाह बदलला. थेट शेतातून वाट काढली. दोन एकर शेतातील पीक, त्याबरोबरच दहा सात ते आठ फूट माती वाहून गेली आता ही जमीन उभे करणं शक्य नाही.’’ पावसाने प्रचंड नुकसान केलेल्या करंजी (ता. पाथर्डी) येथील कैलास थोरात यांची ही हतबलता नुकसानाची दाहकता सांगून गेली..अहिल्यानगर जिल्ह्याच्या पूर्व भागात सहा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने विदारक स्थिती करून ठेवली आहे. सहा दिवसांनंतरही अद्याप लोक सावरलेले नाहीत. पाथर्डी आणि आष्टी (जि. बीड) तालुक्यांच्या सीमेवरील गर्भगिरीच्या डोंगररांगेतील खंडोबाचीवाडी, गावांतील दहा किलोमीटर परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. करंजी, देवराई, सातवड, तिसगाव, कान्होबाचीवाडी, लक्ष्मीवाडी, लक्ष्मीवाडी, कासारवाडी, घाटसिरससह परिसरातील पंधरा गावांत शेतीपिके, घरे, जमिनींचे प्रचंड नुकसान झाले आहे. .Flood Crop Damage : पिकांसोबत मातीही गेली वाहून .या भागांत फळबागांसह, तूर, सोयाबीन, उडीद, पिकांचे नुकसान तर झालेच, पण नदीकाठच्या जमिनीही वाहून गेल्या. शेकडो हेक्टर जमिनीची हानी झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेवासा, राहुरीसह, पारनेर, तसेच जामखेड, अहिल्यानगर तालुक्यात सीना नदीकाठी, कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागपूर, सीतपूर, निंबोडी, तरडगाव, मलठण, दिघी, शेवगाव तालुक्यातील दहिगावने, भावीनिमगाव, शहरटाकळी, मठाचीवाडी, रांजणी, देवटाकळी, मजलेशहर, बक्तरपूर, ढोरसडे, अंत्रे, वरुर, भगुर, चापडगाव, बोधेगाव आदी भागांतील शेतजमिनी, शेतीमाल, फळबागां पुराने वाहून गेल्या आहेत. सरकारी यंत्रणेकडून पंचनामे सुरू असले तरी झालेल्या अवस्थेने शेतकरी, नागरिक मात्र हतबल आहेत..माणसं वाचवली कशीबशी...करंजीतील दानवे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले, की रात्रभर पाऊस होता, पण एवढे पाणी येईल असे वाटले नाही. नदीपासून आमचे घर दूरवर. कुटुंबातील सदस्य झोपेत असताना पहाटे पाण्याचा लोंढा आला. नदीत पाणी बसत नसल्याने पाण्याने प्रवाह बदलला. घराला पाण्याचा वेढा पडल्यावर सगळेच हतबल झालोत. वीज नसल्याने व पावसाचा जोर असल्याने काय करावे सूचेना. तोवर गावांतही अनेकांच्या घरात पाणी शिरलेले होते. फोनाफोनी झाल्यारवर लोक मदतीला धावले. संसाराचे काहीही होईल, पण माणसं, जनावरं वाचवण्यासाठी लोकांची धडपड होती. तासाभाराने आमच्या सर्वांची सुटका झाली. मात्र करंजीतील पंधरापेक्षा अधिक लोकांच्या घरातील साहित्य वाहून गेले. घरांचेही मोठे नुकसान झाले..Flood Crop Damage : सीनेच्या पुरात आपत्ती व्यवस्थापन कुचकामी.तलाव फुटला असता....करंजीतील गावकऱ्यांनी सांगितले, की गावाच्या वरच्या बाजूला असलेला ‘भोरदरा’ गावतलाव लवकर भरत नाही. यंदाही तो अर्धा होता. वरच्या पट्ट्यातील डोंगरात जोरदार पाऊस झाला. या पावसाने संपूर्ण तलाव भरून पाण्याचा लोंढा खाली गेला. काही काळ सांडव्याजवळ वाहून आलेली झाडे गुंतली. त्यामुळे पाणी विसर्गाला अडचण झाली. पाण्याची आवक अधिक असल्याने तलावाच्या मागच्या बाजूला पाणी भिंतीवरून बाहेर पडण्याच्या मार्गावर होते. तलाव फुटण्याची गावकऱ्यांत भीती तयार झाली होती. मात्र सांडव्यातून विसर्ग सुरळीत सुरू झाला आणि अनर्थ टळला. अन्यथा यापेक्षाही अधिक नुकसान झाले असते..अतिवृष्टी झालेली मंडलेअहिल्यानगर जिल्ह्यात आठ दिवसांपासून पाऊस पडत आहे. आठ दिवसांत पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी, माणिकदौंडी, अकोला, खरवंड, मिरी, कोरडगाव, टाकळी, तिसगाव, शेवगाव तालुक्यांतील मुंगी, दहिगाव ने, एरंडगाव, ढोर जळगाव, चापडगाव, बोधेगाव, शेवगाव, जामखेड तालुक्यातील अरणगाव, कर्जतमधील कोरेगाव, वालवड, माही, राशीन, कर्जत, भांबोरा, कोंभळी, मिरजगाव, खेड, अहिल्यानगर तालुक्यातील रुईछत्तीशी, पारनेर तालुक्यातील वाढेगव्हाण, निघोज, पळवेखुर्द, पळशी, श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा, काष्टी, बेलवंडी, चिंभळा, देवदैठण, कोळगाव, लोणी व्यंकनाथ, भानगाव, आढळगाव, श्रीरामपूर तालुक्यातील श्रीरामपूर, बेलापूर, टाकळीभान, कोरेगाव, नेवासा तालुक्यातील चांदा, घोडेगाव, वडाळा अशा ४७ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. त्यातील अनेक मंडलांत सलग दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झाली..आमची गरिबीची परिस्थिती. लोकांच्या इथे काम करून मी जमिनीचे सपाटीकरण केले. त्यात फळबाग लावली. पाइपलाइन केली. तलावाच्या खाली जमीन असल्याने स्थिती चांगली होती. मात्र अतिवृष्टी आणि आलेल्या पुराने उद्ध्वस्त केले. एवढा मोठा चर पडलाय. सारी जमीन वाहून गेलीय, की आता ही जमीन पुन्हा उभी करण्याएवढी ऐपत राहिली नाही.- कैलास थोरात, अपत्तीग्रस्त शेतकरी, करंजी, ता. पाथर्डी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.