Maharashtra Agriculture: उन्हाळी भात रोपवाटिका तयारीसिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास, उन्हाळी भात पीक लागवडीसाठी रोपवाटिका तयार करावी. जमिनीची पूर्व मशागतीची कामे करण्यास सुरुवात करावी.भात पिकाची रोपवाटिका रहू पद्धतीने तयार करण्यासाठी रोपवाटिका क्षेत्रामध्ये चिखलणी करावी. चिखलणीच्या वेळेस प्रति गुंठा क्षेत्रास १०० किलो या प्रमाणे चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळावे. .गादीवाफे पद्धतीने रोपवाटिका तयार करण्यासाठी जमीन नांगरून समपातळीत आणावी. प्रति गुंठा क्षेत्रास १०० किलो या प्रमाणे चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळावे. जमिनीचा उतार लक्षात घेऊन तळाशी १२० सें.मी. व पृष्ठभागी ९० सें.मी. रुंदीचे, ८ ते १० सें. मी. उंचीचे योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करावेत. एक एकर क्षेत्रावरील पुनर्लागवडीसाठी चार गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी..Crop Advisory: कृषी सल्ला (कोकण विभाग).पेरणीच्या वेळेस युरिया १ किलो व सिंगल सुपर फॉस्फेट ३ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश ८०० ग्रॅम या प्रमाणे प्रति गुंठा खतमात्रा मिसळावीत. १५:१५:१५ द्वारे खते द्यावयाची असल्यास प्रति गुंठा ३ किलो मात्रा द्यावी.पेरणी १० सें.मी. अंतरावर ओळीमध्ये २.५ सें.मी. खोलीवर करून बियाणे मातीने झाकून घ्यावे..कोकण विभागात उन्हाळी भात लागवडीसाठी कर्जत-३ आणि कर्जत-४ हे वाण डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केले आहेत. मागील वर्षीचे राखून ठेवलेले भात बियाणे पेरणीसाठी वापरणार असल्यास बियाण्यास ३ टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. यासाठी १० लिटर पाण्यामध्ये ३०० ग्रॅम मीठ टाकून द्रावण तयार करावे. द्रावण तयार करताना उपलब्ध भात बियाणे बुडेल इतपत द्रावण तयार करावे. बियाणे द्रावणात टाकल्यावर चांगले ढवळावे. चाळणीच्या साहाय्याने तरंगणारे बियाणे वेगळे करावे. जड व तळाला बसलेले बियाणे वेगळे काढून स्वच्छ पाण्याने ३ ते ४ वेळा धुऊन ते ४८ तास सावलीत वाळवावे..सुपारीसुपारीची फळे तयार झाल्यावर त्यांचा रंग नारंगी होतो. फळे तयार झाल्यावर संपूर्ण घड काढून नंतर त्यावरील सालीचे पट्टे काढावेत. उन्हात ४० ते ४५ दिवस सुकवतात. वयोमानाप्रमाणे दरवर्षी एका झाडापासून तीन घड मिळतात व त्यापासून दीड ते अडीच किलो सुकी सुपारी मिळते..Crop Advisory: कृषी सल्ला (कोकण विभाग).सुपारी बागेस रासायनिक खतांचा दुसरा हप्ता डिसेंबर-जानेवारी महिन्यात द्यावा. दुसरा हप्ता १६० ग्रॅम युरिया, १२५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश असा द्यावा. एक वर्षावरील झाडास खतांची एक तृतीयांश, दोन वर्षांच्या झाडास दोन तृतीयांश तर तीन वर्षांच्या पुढे प्रति झाडास वरील खताची पूर्ण मात्रा द्यावी. खते झाडाच्या बुंध्यापासून १ मीटर अंतरावर १५ ते २० सें. मी. खोल आणि २० सें.मी. रुंदीच्या चरात बांगडी पद्धतीत द्यावीत.जमीन व हवामानानुसार हिवाळ्यात ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे..पालेभाजीमाठ, मुळा, पालक आणि मेथी या पिकांची पेरणीची कामे सुरू करावीत. पेरणी करताना रोगप्रतिरोधक वाणांचा वापर करावा. माठ पिकासाठी २०० ते २५० किलो शेणखत, मुळा पिकासाठी १०० किलोशेणखत, पालक व मेथी पिकांसाठी १५० ते २०० किलो शेणखत प्रति गुंठा क्षेत्रासाठी वापरावे. तसेच १५:१५:१५ हे खत ४ किलो प्रमाणे मिसळावे. शेणखत देण्यापूर्वी त्यामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून घ्यावे. यामुळे मातीतून पसरणाऱ्या रोगांचे प्रभावी नियंत्रण होण्यात मदत होते..माठ आणि मेथी पिकासाठी ओळींमधील अंतर २० ते २५ सें.मी., पालक पिकासाठी ओळींमधील अंतर १८ ते २० सें.मी., तर मुळा पिकासाठी ओळींमधील अंतर ४५ ते ६० सें.मी. ठेवून पेरणी करावी. पेरणी करण्यापूर्वी प्रतिकिलो बियाणास मेटॅलेक्सिल ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करतेवेळी किंचित पाणी लावून जैविक बुरशीनाशकाचे पातळ आवरण बियाण्याभोवती तयार होईल असे पाहावे.- डॉ. वैभव राजेमहाडीक ९४२०६७३२६७- डॉ. यशपाल चव्हाण ८१४९४६७४०१(कृषिविद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.