डॉ. अभिनंदन पाटील, प्रणाली ढेकाणे, डॉ. अशोक कडलगCrop Management: ऊस लागवडीतील तणांचे वेळेवर नियंत्रण न केल्यास ऊस उत्पादनात सुमारे ३० ते ७० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. आडसाली ऊस पिकामध्ये सुरुवातीच्या वाढीच्या काळात तणांचा प्रभावी व एकात्मिक व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे..महाराष्ट्रात उसाची लागवड प्रामुख्याने आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू या तीन हंगामांमध्ये केली जाते. यापैकी आडसाली ऊस हा सर्वाधिक कालावधीचा (सुमारे १६ ते १८ महिने) हंगाम असतो. या हंगामातील लागवड साधारणपणे जुलै-ऑगस्ट महिन्यात केली जाते. या पिकाचा वाढीचा कालावधी मोठा असल्यामुळे तणांचा प्रादुर्भावही अधिक प्रमाणात दिसून येतो. विशेषतः लागवडीनंतरच्या सुरुवातीच्या तीन ते चार महिन्यांत उसाची वाढ तुलनेने संथ असते, तर तणे ही अतिशय वेगाने वाढून पाणी, अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश आणि जागेसाठी पिकाशी तीव्र स्पर्धा करतात. त्यामुळे उसाची वाढ खुंटते, फुटव्यांची संख्या कमी होते, कांड्यांची जाडी घटते आणि उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. विविध संशोधनानुसार तणांचे वेळेवर नियंत्रण न केल्यास उस उत्पादनात ३० ते ७० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. त्यामुळे आडसाली ऊस पिकामध्ये सुरुवातीच्या वाढीच्या काळात तणांचा प्रभावी व एकात्मिक व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे..आडसाली उसामध्ये आढळणारी प्रमुख तणेआडसाली ऊस पिकामध्ये दीर्घ वाढीच्या कालावधीमुळे गवतवर्गीय, रुंद पानांची, लव्हाळा तसेच वेलवर्गीय तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. गवतवर्गीय तणांमध्ये हराळी, लव्हाळा, चिमणचारा, केना ही प्रमुख तणे आहेत. ती जमिनीतील पाणी व अन्नद्रव्यांसाठी मुख्य ऊस पिकासोबत तीव्र स्पर्धा करतात..Watershed Management: भूभाग आधारित मृदा, जलसंवर्धन उपाययोजना.रुंद पानांच्या तणांमध्ये माठ, तांदुळजा, गाजरगवत, काटेमाठ, छोटी व मोठी दुधी, टारफुला, ओसाडी, चांदवळ, धोत्रा, आघाडा, रेशीमकाटा, कपाळफोडी, घोळ आणि चिघळ यांचा समावेश होतो. याशिवाय चांदवेल तणही काही भागात आढळते. हे तण उसाच्या मुळांमधून अन्नद्रव्ये व पाणी शोषून घेत असल्याने पिकाची वाढ मंदावते..अलीकडील काळात खांडकुळी या वेलवर्गीय तणाचा प्रादुर्भाव अनेक भागांत वाढताना दिसून येत आहे. हे तण उसाच्या बांधणीनंतर कांड्यावर चढून पानांभोवती विळखा घालते. त्यामुळे पानांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही, प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. परिणामी, ऊस पिकाची वाढ खुंटते व उत्पादनावर परिणाम होतो. तसेच काढणीच्या वेळी हे तण उसामध्ये गुंतल्यामुळे तोडणीच्या कामातही अडथळा निर्माण होतो..उसामध्ये आढळणारी ही तणे पाणी, अन्नद्रव्ये, सूर्यप्रकाश आणि जागेसाठी पिकाशी स्पर्धा करून उत्पादनात लक्षणीय घट घडवून आणतात. तसेच काही तणे विविध किडी व रोगांसाठी यजमान बनतात. त्यामुळे तणांची योग्य ओळख करून त्यांच्या प्रकारानुसार योग्य वेळी प्रभावी तण व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे..तण व्यवस्थापनासाठीचा महत्त्वाचा कालावधीऊस पिकामध्ये लागवडीनंतरचे पहिले ९० ते १२० दिवस (३ ते ४ महिने) हा तण नियंत्रणाच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील कालावधी मानला जातो. या कालावधीत उसाची वाढ तुलनेने मंद असते, तर तणे जलद गतीने वाढून पिकाशी पाणी, अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश आणि जागेसाठी स्पर्धा करतात. त्यामुळे या काळात तणांचे प्रभावी व्यवस्थापन केल्यास उत्पादनात होणारी घट मोठ्या प्रमाणात टाळता येते. यासाठी योग्य तणनाशकाची निवड, शिफारशीनुसार मात्रा योग्य वेळी फवारणी तसेच वेळेवर खुरपणी, आंतरमशागत आणि योग्य सिंचन व्यवस्थापन यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे..तण व्यवस्थापनाचे प्रमुख प्रकारप्रतिबंधात्मक उपायया पद्धतीचा मुख्य उद्देश तणांचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच त्यांची वाढ व प्रसार रोखणे हा असतो. यामध्ये प्रमाणित व तणविरहित बियाण्याचा वापर करणे, लागवडीपूर्वी शेतातील तणांचा नायनाट करणे, पूर्णपणे कुजलेले शेणखत किंवा कंपोस्टचा वापर, योग्य पूर्वमशागत व तसेच शेताचा बांध, पाण्याच्या चाऱ्या, पाट तणविरहित ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय कृषी अवजारे व यंत्रे स्वच्छ ठेवणे, सिंचनाच्या पाण्याद्वारे किंवा शेणाद्वारे तणांच्या बियांचा प्रसार होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे..निवारणात्मक उपायतणांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याची तीव्रता कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपायांचा यात समावेश होतो. यामध्ये भौतिक, जैविक आणि रासायनिक या प्रमुख पद्धतींचा समावेश होतो..Adsali Sugarcane Cultivation: आडसाली ऊस लागवडीचे तंत्र.अ) भौतिक व यांत्रिक पद्धतीया पद्धतीमध्ये तण उपटणे, खुरपणी, कोळपणी, खांदणी, आंतरमशागत तसेच सेंद्रिय किंवा कृत्रिम आच्छादन करून तणांची वाढ नियंत्रित केली जाते. ऊस पिकामध्ये सुरुवातीच्या ९०-१२० दिवसांत वेळेवर केलेली आंतरमशागत तण नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी ठरते. या पद्धतीच्या योग्य वापरामुळे तणनाशकाचा वापर कमी करण्यास मदत होते..ब) पारंपरिक पद्धतीया पद्धतीमध्ये पीक फेरपालट, शिफारशीनुसार लागवडीचे अंतर, योग्य रोपसंख्या, संतुलित खत व्यवस्थापन, वेळेवर सिंचन, आंतरपीक पद्धतीचा अवलंब तसेच जलद वाढणारी हिरवळीची पिके (ताग, धैंचा) यांचा वापर केला जातो. ठिबक सिंचनासारख्या सुधारित सिंचन पद्धतीमुळे तणांची वाढ मर्यादित राहते आणि पाण्याचाही कार्यक्षम वापर होण्यास मदत होते..क) जैविक पद्धतीया पद्धतीमध्ये उपयुक्त कीटक, बुरशी किंवा इतर जैविक घटकांच्या साह्याने तणांचे नियंत्रण केले जाते. ही पर्यावरणपूरक पद्धत असून, रासायनिक तणनाशकावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करते. उदाहरणार्थ, गाजर गवत नियंत्रणासाठी मॅक्सिकन भुंगा या जैविक नियंत्रण घटकाचा यशस्वी वापर करण्यात आला आहे..ड) रासायनिक पद्धतीरासायनिक तण नियंत्रणामध्ये विविध प्रकारच्या तणनाशकांचा वापर करून तणांचे प्रभावी व्यवस्थापन केले जाते. तणांच्या प्रकारानुसार स्पर्शजन्य, आंतरप्रवाही, निवडक आणि अनिवडक तसेच उगवणपूर्व व उगवणपश्चात तणनाशकांचा वापर केला जातो. तसेच गवतवर्गीय, रुंद पानांच्या प्रकारातील तणांसाठी स्वतंत्र तणनाशके उपलब्ध आहेत. योग्य तणनाशकाची निवड करून शिफारशीनुसार त्याचा वापर केल्यास तणांचे प्रभावी नियंत्रण साध्य करता येत..तणनाशक वापरताना घ्यावयाची काळजीऊस पिकामध्ये तणनाशकाचा वापर शिफारशीनुसार आणि योग्य वेळी करणे अत्यंत आवश्यक आहे.तणनाशकाचा वापर नेहमी शिफारस केलेल्या मात्रेतच करावा.फवारणीच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा असावा.तणनाशक फवारणीकरिता फ्लॅटफॅन नोजलचा वापर करावा.शिफारशीनुसार पाण्याचे प्रमाण राखणे आणि तणनाशकाची अचूक मात्रा वापरणे आवश्यक आहे. यामुळे तण नियंत्रण प्रभावी होते आणि पिकावर विपरीत परिणाम होत नाही..तणनाशकाचा अतिवापरामुळे होणारे परिणाममातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे नुकसान होऊ शकते.तणनाशकाचे अवशेष जलप्रदूषणास कारणीभूत ठरू शकतात.अयोग्य वापरामुळे पिकामध्ये पाने जळणे, वाढ खुंटणे आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता असते.एकाच तणनाशकाचा वारंवार वापर केल्यास तणांमध्ये तणनाशक प्रतिकारशक्ती विकसित होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तणनाशकांची फेरपालट आणि योग्य मिश्रणाचा वापर करणे आवश्यक आहे.- डॉ. अभिनंदन पाटील, ९७३७२७५८२१(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.