रवींद्र पालकर, डॉ. साताप्पा खरबडे, डॉ. उत्तम कदमMango Crop Protection: तुडतुडे ही आंबा पिकावरील एक अत्यंत महत्त्वाची व आर्थिक नुकसानकारक कीड आहे. या किडीच्या अनेक प्रजाती आंबा पिकावर प्रादुर्भाव करताना दिसतात. ही कीड जरी वर्षभर झाडावर कमी-अधिक प्रमाणात उपस्थित असली, तरी फुलोरा (मोहर) अवस्थेत तिचा प्रादुर्भाव तीव्र स्वरूपात वाढतो. सध्याच्या परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा भागातील आंबा बागांमध्ये मोहर बाहेर पडण्यास सुरुवात झाली असून काही बागांमध्ये अद्याप मोहर येणे बाकी आहे. .ज्या बागांमध्ये मोहर आलेला आहे, त्या ठिकाणी अॅम्रिटोडस अॅटकिन्सोनी या तुडतुडे प्रजातीचा प्रादुर्भाव प्रकर्षाने दिसून येत आहे. ही कीड पाने, मोहर आणि लहान फळांवर रसशोषण करते. परिणामी कळ्या व फुले चिमटून सुकतात व गळून पडतात. नुकतीच लागलेली लहान फळे मोठ्या प्रमाणावर गळून जातात. वेळीच नियंत्रण न केल्यास या किडीमुळे २० ते १०० टक्क्यांपर्यंत उत्पादन नुकसान होऊ शकते. या लेखामध्ये आपण किडीची ओळख, नुकसानीचे स्वरूप आणि एकात्मिक व्यवस्थापन यांची छायाचित्रांद्वारे माहिती घेऊ..मराठी नाव : तुडतुडेशास्त्रीय नाव : अॅम्रिटोडस अॅटकिन्सोनी (Amirtodus atkinsoni)किडीची ओळखपिलावस्था : किडीची पिले फिकट पिवळ्या रंगाची, लांबट आणि जास्त चपळ असतात. पिलांना पंख नसतात..Mango Crop Disease: आंबा पिकावरील ‘लीफ वेबर’ .प्रौढ (नर) : ही कीड त्रिकोणी अथवा पाचरीसारख्या आकाराची असून शरीर गडद करड्या रंगाचे असते. चेहरा पिवळसर असून, डोक्याच्या पुढील भागावर दोन ठळक, गोल व काळे ठिपके स्पष्टपणे दिसून येतात. या दोन ठिपक्यांच्या मधोमध तपकिरी रंगाचा पट्टा असून, त्याच्या मध्यभागी एक अरुंद पिवळी रेघ आढळते. मुख्य डोळ्यांच्या जवळच ओसेली हा डोळ्यांचाच एक लहान भाग तपकिरी रंगाचा दिसतो. छातीच्या वरच्या भागाच्या (प्रोनोटम) पुढील टोकावर दोन काळ्या, त्रिकोणी ठिपक्यांची जोडी दिसून येते. .या ठिपक्यांच्या भोवती तपकिरी छटा असून बाजूचा भाग पिवळसर व त्यावर सूक्ष्म तपकिरी ठिपके असतात. प्रोनोटमच्या मध्यभागातून अगदी स्पष्ट अशी लांबट तपकिरी रेघ पुढे - पाठीमागे पसरलेली असते. छातीचा मधला त्रिकोणी भाग (स्क्यूटेलम) मुळाशी दोन काळ्या त्रिकोणांनी चिन्हांकित असून मध्यभागी दोन काळे ठिपके आणि त्यांच्या मध्ये उलट ‘V’ आकाराची वैशिष्ट्यपूर्ण खूण आढळते. पंखांच्या शिरा गडद तपकिरी रंगाच्या असून त्या स्पष्टपणे उठून दिसतात. या किडीची एकूण लांबी सुमारे ४.५ ते ५.० मि.मी. इतकी असते..जीवनक्रम : मादी कीड आपल्या अंडीदंडकाच्या (ovipositor) साहाय्याने फुलोऱ्याच्या कोंबांवर, फुलकळ्यांवर किंवा कोवळ्या पानांवर सूक्ष्म चिरा पाडून एकेक करून अंडी घालते. एक मादी कीड साधारणतः १०० ते २०० अंडी देऊ शकते. ही अंडी ४ ते ७ दिवसांत उबतात. पिलावस्थेदरम्यान कीड ४ ते ५ वेळा कात टाकते व ती कात स्पष्टपणे पानाच्या खालच्या बाजूस चिकटलेली दिसते. एकूण पिलावस्थेचा कालावधी १० ते २० दिवसांचा असतो. तर अंड्यापासून प्रौढ किडीपर्यंतचा संपूर्ण जीवनक्रम साधारणतः २५ ते २८ दिवसांचा असतो..Mango Pest Disease : आंब्यावर तुडतुडा, बुरशी.नुकसानीचे स्वरूप : पिले तसेच प्रौढ कीड कोवळ्या पानांमधून व फुलोऱ्यातून रस शोषून नुकसान करतात. परिणामी, फुले कोमेजतात, वाळतात व गळून पडतात. ही कीड चिकट गोड द्रव (हनीड्यू) स्रवते. या स्रावावर सुटी मोल्ड बुरशी वाढून पाने, फांद्या तसेच फळांच्या पृष्ठभागावर काळे आवरण तयार होते. या काळ्या बुरशीमुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो, परिणामी फुलधारणा होत नाही आणि लहान फळे गळून पडतात. याचा थेट परिणाम उत्पादनावर होत असून परिस्थितीनुसार उत्पादनात २० ते १०० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.आर्थिक नुकसान पातळी : १० तुडतुडे प्रति पालवी किंवा मोहर..एकात्मिक व्यवस्थापनझाडांची छाटणी करताना सूर्यप्रकाश आतमध्ये पोहोचेल व बागेत हवा खेळती राहील, अशा पद्धतीने नियोजन करावे.बाग नेहमी स्वच्छ, तणमुक्त ठेवावी.नत्रयुक्त खतांचा अतिरेक टाळून संतुलित व शिफारशीनुसार वापर करावा..जैविक नियंत्रण : प्रादुर्भावाच्या सुरुवातीला ॲझाडिरॅक्टीन (१० हजार पी.पी.एम.) या निमयुक्त कीटकनाशकाची १ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. आंब्याच्या झाडाला मोहर येत असताना लेकॅनिसिलिअम लेकॅनी किंवा मेटाराझिम अॅनिसोप्लिया या जैविक नियंत्रक बुरशीची ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात ७ दिवसांच्या अंतराने दोन वेळेस फवारणी करावी.रासायनिक नियंत्रण : किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (ETL) ओलांडल्यास, मित्र कीटकांचे संवर्धन लक्षात घेऊन पुढीलपैकी कोणतेही एक कीटकनाशकाची फवारणी करावी. पुढील फवारणी प्रादुर्भावानुसार कीटकनाशक बदलून करावी..फवारणी प्रमाण : प्रति लिटर पाणीबुप्रोफेझिन (२५ टक्के एस.सी.) १ ते २ मि.लि. किंवाफ्लोनिकॅमिड (५० टक्के डब्ल्यू.जी.) ०.४ ग्रॅम, किंवापायमेट्रोझाईन (५० टक्के डब्ल्यू.जी.) ०.३ ग्रॅम, किंवाटोलफेनपायरॅड (१५ टक्के ई.सी.) २ मि.लि. किंवाइमिडाक्लोप्रिड (१७.८० टक्के एस.एल.) ०.४ मि.लि. किंवाथायामेथॉक्झाम (२५ टक्के डब्ल्यू.जी.) ०.१ ग्रॅम.(सर्व कीटकनाशके लेबलक्लेमप्राप्त आहेत.)- रवींद्र पालकर ८८८८४०६५२२(पीएच. डी. स्कॉलर, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.