Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूने महाराष्ट्रातील जनतेची अपरिमित हानी झाली आहे. त्यांनी १९८१-८२ या वर्षांत छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. ते चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ राजकारण, सहकार, अर्थकारण, कृषी, जलसंधारण, क्रीडा अशा विविध क्षेत्रांवर आपला अमीट ठसा सोडून गेले आहेत. राजकारणाच्या पलीकडे त्यांनी सर्वपक्षीय मैत्र जोपासले, आपल्या कृतिशीलतेने ‘कामाचा माणूस’ अशी बिरुदावली आणि पुरोगामी विचारसरणी त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत मिरविली. .कुटुंबातून एकानेच राजकारणात यायचे, या सूत्रानुसार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेती व गुरे सांभाळणाऱ्या अजित पवार यांचे गुण हेरले आणि त्यांना सन १९८१-८२मध्ये छत्रपती साखर कारखान्याचे संचालक म्हणून पहिली संधी दिली. त्यांनी सन १९९१मध्ये पुणे जिल्हा बँकेच्या राजकारणात लक्ष घालून सत्तांतर घडवून आणले. सन १९९१-९२मध्ये सोमेश्वर कारखान्यात विरोधी गटाची ३५ वर्षांची सत्ता अजित पवारांनी उलथवून टाकली. या यशामुळे शरद पवार यांनी त्यांना सन १९९१मध्ये खासदारकीची संधी दिली. शरद पवार यांच्यासाठी खासदारकीचा राजीनामा देऊन त्याच वर्षी आमदारकी लढविली. तेव्हापासून कामाच्या आणि लोकसंपर्काच्या जोरावर बारामती तालुक्याचे ते सलग आठ वेळा विक्रमी मतांनी आमदार म्हणून निवडून येत आहेत..मंत्रिपदांवर ठसाविधानसभेच्या एन्ट्रीमध्येच अजित पवार यांनी सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून कृषी, फलोत्पादन व ऊर्जामंत्री म्हणून वर्षभर काम पाहिले. त्यांच्या महत्त्वाकांक्षेला सन १९९९ नंतर पंख फुटले. तेव्हापासून २००४पर्यंत पाटबंधारे खात्याचे मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये प्रवेश केला. त्यांनी २००४ नंतर ग्रामविकास, पाणीपुरवठा, स्वच्छता ही मंत्रिपदे सांभाळली. सोबतीने जलसंपदा खातेही २०१०पर्यंत स्वतःकडे ठेवले. त्या कालावधीत राज्याच्या सिंचनक्षेत्रात सहा लाख हेक्टरने वाढ झाली होती. टेंभू, म्हैसाळ, ताकारी, सीना, माढा, पुरंदर उपसा, जानाई शिरसाई, विष्णुपुरी, धापेवाडा यांसारख्या उपसा सिंचन योजना राबवून दुष्काळी भागाचा कायापालट केला. २०१०मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून अनेक दिग्गजांच्या स्पर्धेतून पुढे जात २०१४च्या सत्तांतरापर्यंत उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद पटकावले. २०१४च्या सत्तांतरानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते म्हणून तत्कालीन सरकारशी जवळीक राखून हल्लाबोलही केला..Ajit Pawar Last Rites: 'दादा परत या...' अजितदादांच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर .राष्ट्रवादीची स्थापनाज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १९९९मध्ये काँग्रेसशी फारकत घेत स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा अजित पवार चाळीस वर्षांचे तरुण नेतृत्व होते. अडचणीच्या काळात शरद पवार यांना पक्षबांधणीत, तरुण नेते राष्ट्रवादीत आणण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर, अरुण गुजराथी अशा ज्येष्ठ नेत्यांबरोबरच अजित पवारांसह आर. आर. पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे अशी तरुण तडफदार फळी त्या वेळी होती. त्यातून पुढे जात अजित पवार यांनी २०१०मध्ये उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद पटकावले. त्यानंतर त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छांनाही धुमारे फुटले होते..सहकाराचा महामेरूअर्थ, जलसंपदा अशा मंत्रिपदांचा उपयोग त्यांनी ग्रामीण नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मनापासून केला. पुण्यासह राज्यातील सहकारी बाजार समित्यांचे बळकटीकरण, कात्रज, बारामती यांसारख्या सहकारी दूध संस्थांचे पुनरुज्जीवीकरण त्यांनी केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे जिल्हा सहकारी बँक, सोमेश्वर-माळेगाव-छत्रपती साखर कारखाने आदी सहकारी संस्था अजित पवार यांनी ताब्यात घेऊन राज्यात आदर्श पद्धतीने चालविल्या. जिल्हा बँक आशिया खंडातली मोठी बँक झाली आहे, तर सोमेश्वर-माळेगाव राज्यात सर्वोच्च दर देत आहेत. यासोबत स्वतःचे खासगी कारखाने चालविताना पवार यांनी कधीही डाग पडू दिला नाही..शेतकऱ्यांचा आधारवडराज्याचा आर्थिक कणा असलेल्या साखर कारखानदारीवर प्राप्तिकराचे भूत लटकले होते. अजित पवार यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी जवळीक झाल्यावर हा प्रश्न मांडून दहा हजार कोटींची माफी पदरात पाडून घेतली. ‘एनसीडीसी’सारख्या संस्थेची दीर्घ मुदतीची व अल्पव्याजाची कर्जे गोत्यात गेलेल्या कारखान्यांना मिळवून दिली. साखर कारखान्यांचे ऊर्जा कंपनीशी करार घडवून आणले. उसावरचा ‘पर्चेस टॅक्स’ रद्द केला. ठाकरे सरकारमध्ये असताना ३४ हजार कोटींची कर्जमाफी असो किंवा फडणवीस सरकारमध्ये असताना शेती पंपाच्या वीजबिलाची माफी असो, हे अजितदादांच्याच पुढाकारने झाले आहे. दुष्काळी स्थिती मागेल तिथे छावण्या, शेतकऱ्याला मागेल तिथे वीजजोड या योजना पवार यांच्याच..क्रीडा व शिक्षण क्षेत्रांत छापराजकारणासोबत २००५पासून कबड्डी असोसिएशन, २००६पासून खो-खो आणि २०१३पासून राज्य ऑलिम्पिक संघटना यामध्येही अजित पवार यांनी आपली छाप पाडली. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून उत्कर्षापर्यंत त्यांनी सहभाग घेतला. यासोबत शारदानगर, माळेगावचे शिवनगर, सोमेश्वरचे सोमेश्वर शिक्षण मंडळ यांच्या विकासात पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विकासपुरुष तेच आहेत..Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनानं रोहित पवारांना अश्रू अनावर, कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला.पहाटेचा शपथविधीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत अस्वस्थता, सरकारी तपास यंत्रणांकडून केली जाणारी घुसमट अशा विविध कारणांनी अजित पवार यांनी २०१९च्या निवडणुकीनंतर फडणवीस यांच्यासोबत पहाटेलाच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपसोबत जाण्याच्या त्यांच्या निर्णयाने राज्यभर काहूर उठले. शरद पवार यांनी काँग्रेस, शिवसेना यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळ्यांची अटकळ खोटी ठरवत अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. मात्र अडीच वर्षांनी त्यांनी थेट शरद पवार यांच्याशी बंड पुकारले आणि २०२३मध्ये राष्ट्रवादीची बहुसंख्य फळी घेत भाजपला साथ दिली. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षही झाले. यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांना प्रचंड फटका बसला. विधानसभेला मात्र अपयशाची भरपाई करत चाळीसपेक्षा अधिक आमदार निवडून आणले. आता महानगरपालिका निवडणुकीनंतर पुन्हा राष्ट्रवादी पक्ष अडचणीत सापडला असताना आणि ‘तुतारी’चा आवाज क्षीण झालेला असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या हालचाली झाल्या. जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढूही लागले होते आणि लवकरच पक्षाला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी पवार कुटुंब एक होत होते. असे असतानाच नियतीने आपला डाव साधला....पुरोगामी विचारसरणीभाजपसोबत गेल्यानंतर अजित पवार यांच्या विचारधारेवर टीका होऊ लागली होती. मात्र त्यांनी, ‘भाजपासोबत विकासासाठी गेलो, मात्र शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा मरेपर्यंत सोडणार नाही,’ असा विश्वास जनतेला दिला. महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी तो अखेरपर्यंत पाळलादेखील. महिलांना पन्नास टक्के आरक्षणात त्यांचेही योगदान होते. लाडकी बहीण योजना राबविण्यात त्यांचीच अर्थमंत्री म्हणून सही होती. संजय गांधी निराधार योजनेचा निधी त्यांनी कधी कमी पडू दिला नाही. मागास, दलित, वंचित घटकांचा ते आधार होते. कुणीही महिला, कुणीही दिव्यांग, कुठल्याही मतदारसंघाचा माणूस त्यांना बारामतीला येऊन कधीही भेटू शकत होता. त्यांनी पक्षीय, जातीय, धार्मिक भेद कधीही केले नाहीत. उलट पक्षातल्या लोकांपेक्षा विरोधी नेत्याला त्यांच्याकडे लवकर ‘एन्ट्री’ मिळायची..रोखठोकराजकारणात असले तरी अजित पवार हे वेगळ्याच मुशीत घडलेले रसायन होते. टापटीप, नीटनेटकेपणा, स्वच्छता हा त्यांचा स्थायीभाव होता. स्पष्टवक्ते असलेले दादा, आवडले तर लगेच दाद देणार आणि नाही तर जागेवरच समोरच्याची ‘शाळा’ घेणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील उड्डाण पूल चुकला आहे, असे जाहीरपणे सांगून तो धारिष्ट्याने पाडून नवा पूल उभारायचीही त्यांची धमक होती. दादांची स्मरणशक्तीही वादातीत होती. त्याच्या जोरावर अनेक जुने संदर्भ ते त्यांच्या भाषणांत सहज देत. कितीही गर्दी असली, तरी त्या गर्दीतील चेहऱ्यांवर त्यांची नजर असे अन् अनुपस्थितांचीही ते त्यांच्या ‘स्टाइल’मध्ये नोंद घेत. प्रत्येक वस्तू जागच्या जागी आणि स्वच्छ असेल, याकडे त्यांचा कटाक्ष होता. बोलण्याच्या ओघात चूक झाली तर प्रांजळपणे कबूल करणार आणि पुढे जाणार, असा त्यांचा स्वभाव कायमच महाराष्ट्राच्या लक्षात राहणारा....शब्द पाळणारा नेतापहाटेपासून कामाला लागणारा आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख होती. बारामती तालुका त्यांनी अंतर्बाह्य बदलून दाखविला. लोकांचे प्रपंच मोठे केले. राष्ट्रपती, पंतप्रधानांनी मॉडेल म्हणावे इतकी झेप शरद पवार यांच्या छत्रछायेखाली घेतली. त्यांचा प्रशासनावर आपल्या नेतेमंडळींवर कमालीचा वचक होता. इतर नेते झोपेतून उठण्याआधी अजित पवारांनी निम्मी कामे संपवलेली असत. कामाचा उरक प्रचंड होता. प्रत्येक निवेदनावरून घारीसारखी नजर फिरवत. त्यांच्या हातात सतत लोकांची कामांची निवेदने असत. मृत्यूच्या अखेरच्या क्षणीसुद्धा ते जनतेच्या कामाचे कागद हातात घेऊनच गेले... असा कार्यक्षम, रोखठोक, दिलदार आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत अखंड महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता पुन्हा होणे नाही!.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.