Ajit Pawar Death Reactions: बारामती येथील विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याचे वृत्त अत्यंत क्लेशदायक आहे. त्यांचे अकाली जाणे हे राज्याच्या विकासासाठी नुकसानकारक आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत, विशेषतः सहकारी क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक आहे. - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना.- पंतप्रधान नरेंद्र मोदी.Ajit Pawar Last Rites: 'दादा परत या...' अजितदादांच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर .आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे एनडीएचे ज्येष्ठ सहकारी अजित पवार यांना अपघातात गमावल्याची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे. त्यांनी गेली साडेतीन दशके ज्या प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित केले, ते शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. जेव्हा जेव्हा त्यांची भेट व्हायची, तेव्हा ते महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करायचे. त्यांचे निधन ही एनडीए कुटुंबासह माझी देखील वैयक्तिक हानी आहे.- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहप्रवाशांचे विमान दुर्घटनेत निधन झाले हे अत्यंत वेदनादायी आहे. या शोकाकूल परिस्थितीत मी महाराष्ट्राच्या जनतेसमवेत आहे. या दु:खद प्रसंगी पवार परिवार आणि आप्तेष्टांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो.- राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा.Ajit Pawar Passes Away: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन .मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली.- उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री.माझे मित्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाइलचा गुंता सोडविताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचे अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हते. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचे धारिष्ट्य दाखविणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.- राज ठाकरे, मनसे अध्यक्ष.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक व सुन्न करणारी आहे. स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर मजबूत पकड, जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण आणि ते सोडविण्याची क्षमता असलेल्या अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे. शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष.अजित पवार यांचे अशा प्रकारे जाणे त्यांच्या चाहत्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला अत्यंत वेदना देणारे आहे. वेळेबद्दल अत्यंत काटेकोर आणि प्रचंड कष्ट घेण्याची कार्यपद्धती यामुळे ते कार्यक्षमपणे राज्याचा कारभार करत असत. श्रमिक चळवळीमध्ये योग्य ते सहकार्य ते नेहमी करत असत. महाविकास आघाडीच्या काळात श्रमिकांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्यांच्या सर्व कुटुंबीयांचे मनःपूर्वक सांत्वन करत आहोत.- डॉ. अजित नवले, राज्य सचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.