Pune News : राज्य सरकारने विधानसभा निवडणूका जाहीर होण्याच्या आधीच मुद्रांक नियमात बदल केला होता. यावेळी सरकाने प्रतिज्ञापत्रासाठी शंभर रूपयांऐवजी पाचशे रूपयांचा मुद्रांक वापरण्याची सक्ती केली होती. यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत राज्य सरकारची सुद्धा दिवाळी झाली आहे. राज्याच्या महसुलात तब्बल ५५ लाखांहून अधिकची रक्कम जमा झाली आहे.
राज्यात आधी प्रतिज्ञापत्र, हक्कसोड, दस्ताची दुबार नोंदणी, खेरदी-विक्रीसह इतर व्यवहारांसाठी १०० रूपयांचा मुद्रांग चालत होता. मात्र आता राज्य सरकारने शासकीय कामे वगळता इतर कामांसाठी १०० मुद्रांक वापरता येणार नसल्याचे सांगितले आहे. याबाबत नियम करताना १०० रूपयांऐवजी ५०० रूपयांचा मुद्रांक घेणे अनिवार्य केले आहे. यामुळे सर्वसामान्यांना किरकोळ कामासाठी देखील ५०० रूपयांचा मुद्रांक घ्यावा लागत आहे.
यादरम्यान राज्यात विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या. आता निवडणुकीच्या रिंगणात तब्बत ७ हजार ९९५ उमेदवार उतरले असून उमेदवारांनी २९ आक्टोंबर पर्यंत १० हजार ९०५ अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केले. यावेळी उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत ५०० रूपयांचे प्रतिज्ञापत्र जोडले आहेत. यामुळे राज्यात निवडणुकीच्या फक्त आठ दिवसांच्या कालावधीत राज्यभरातून ५४ लाख ५२ हजार ५०० रूपयांचा महसूल तिजोरीत जमा झाला आहे.
२०१९ च्या निवडणुकीत ७ हजार उमेदवार
यंदा निवडणुकीत तब्बल ११ हजार अर्ज दाखल झाल्याने अनेकांचे डोळे विस्फारले. पण २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीतही ७ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. राज्यभरातून ७ हजार ५३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यावेळी १०० रूपयांचा मुद्रांक प्रतिज्ञापत्रासाठी चालत होता. तेंव्हा फक्त ७ लाख ५३ हजार १०० रूपयांचा महसूल जमा झाला होता. पण यंदा उमेदवारांना १०० रूपयांऐवजी ५०० रूपयांचा मुद्रांक वापरावा लागला आहे. यामुळे यंदा तिजोरीत जवळ जवळ ५५ लाखांचा महसूल जमा झाला आहे.