Gambling Ban Impact : धूर तर अनेक वर्षे दिसतच होता. बंब पाठविण्यासाठी आग लागून पसरण्याची वाट कशाला बघितली? केंद्र सरकारने नुकतीच सर्व प्रकारच्या ऑनलाइन गेमिंग/ बेटिंग गेम्सवर बंदी घातली आहे. ही बंदी घालताना सरकारने जी कारणे दिली ती गंभीर आहेत यात वाद नाही. उदा. - हे गेम खेळणारा प्रामुख्याने तरुण वर्ग आहे. त्याच्या शारीरिक आणि मानसिक तब्येतीवर परिणाम होत आहेत, त्यांच्यात कर्जबाजारीपणा वाढत आहे, आत्महत्यांच्या घटनादेखील घडत आहेत इत्यादी..दुर्दैवाने बंदीचे नक्की काय परिणाम होणार हे काळच ठरवेल. कारण गोष्टी हाताबाहेर गेलेल्या असण्याची दाट शक्यता आहे. भारतात ५० कोटी नागरिक ऑनलाइन गेमिंग/ बेटिंग खेळतात. दर महिन्याला UPI मार्फत या खेळांवर ट्रान्स्फर होत असलेली रक्कम आहे तब्बल १० हजार कोटी रुपये. (संदर्भ ः दि हिंदू बिझनेस लाइन). हे खेळणारे बहुतांश तरुण असतील तर तरुणांमधील शेकडा प्रमाण किती असेल? आकडे बघा. छाती दडपते..उघड आहे, की याची फुटप्रिंट संपूर्ण भारतभर पसरली आहे. एखादी अॅक्टिव्हिटी ज्या वेळी एवढ्या विकेंद्रित पद्धतीने होत असते, त्या वेळी पोलिस यंत्रणेमार्फत त्यावर देखरेख ठेवून कारवाई करणे कोणत्याही प्रशासनाला कठीण जाणार हे उघड आहे. शासकीय आकडेवारी नेहमीच स्वतःची पाठ थोपटणारी असते. इतक्या वर्षांची लागलेली सवय- खरे तर व्यसन-असे कायदा करून एकाएकी सुटणे कठीण असते.\.Online Gambling Addiction: जीवघेणा विळखा.काही बातम्यांनुसार हे व्यसन लागलेले लोक, तरुण अशाच परकीय प्लॅटफॉर्म किंवा बेकायदेशीर ऑनलाइन जुगाराकडे वळण्याची भीती आहे. दारूचे उदाहरण तर अनेक दशके जुने आहे. दारूबंदी केली की शरीराला अधिक हानिकारक, बेकायदेशीरपणे बनविलेली दारू बाजारात येऊ लागते. सरकारचे उत्पन्न बुडते आणि मूळ हेतू साध्य न होता अधिक गंभीर प्रश्न तयार होतात..ऑनलाइन गेमिंग/ बेटिंगमुळे तरुणाई जुगारात अडकत आहे, अडकू शकते याचा इशारा गेली अनेक वर्षे दिला जात होता. पण त्यावर कृती न करता तरुणांना जुगारापासून दूर राहण्याचा सल्ला सरकारकडून दिला जात होता. हे काही एकमेव प्रकरण नाही आहे. धूर दिसत असूनही आग लागायची वाट पाहणे यात एक पॅटर्न आहे. दोन ठिकाणी आज देखील धूर दिसत आहे. .त्यातले एक म्हणजे भांडवली बाजारातील कॅश सेगमेंटमध्ये आणि विशेषतः डेरीवेटिव्ह सेगमेंटमध्ये वित्त निरक्षर रिटेल गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करत आहेत. हे सेबीची काही वर्षांपूर्वीची आकडेवारी सांगत आहे. पण सेबी काय करत आहे. तर सेबीच छोट्या गुंतवणूकदारांना जपून गुंतवणुकीचा सल्ला देत असते. इथे देखील या गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या संख्येने तरुण वर्गच आहे, हे विशेष..Online Gambling: ग्रामीण महाराष्ट्र जुगाराच्या विळख्यात.दुसरे उदाहरण म्हणजे गेली काही वर्षे दरवाजावर जाऊन गरिबांना मुबलक कर्जे पाजण्यात आल्यामुळे गरिबांमध्ये कर्जबाजारीपणा वाढत आहे. हे क्षेत्र भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) अखत्यारीत. पण रिझर्व्ह बँकच गरीब कर्जदारांना कर्जबाजारीपणाबद्दल सबुरीचा सल्ला देत असते. भविष्यात अति कर्जबाजारीपणामुळे, वसुलीच्या जाचामुळे गरिबांच्या आत्महत्या वाढू शकतात, एवढे गंभीर आहे हे सर्व..या सगळ्यात मूलभूत मुद्दा पूर्णपणे दुर्लक्षिला जात आहे. एवढ्या मोठ्या संख्येने तरुण सट्टेबाजसदृश अॅक्टिव्हिटीमध्ये दिवसाचे अनेक तास घालवत असतील तर उघड आहे, त्यांच्या हाताला आणि डोक्याला, पुरेशी मिळकत देणारे उत्पादक आणि सर्जनशील काम नाही. .कोट्यवधी गरीब लोक कर्ज काढत असतील, तर त्यांना स्वकष्टातून राहणीमान टिकविण्यासाठी पुरेसे पैसे मिळत नाहीत. हे प्रश्न संस्कार आणि लेक्चरबाजी करून सुटणारे नाहीत. त्याची मुळे स्थूल अर्थव्यवस्थेमध्ये आहेत. ही खरी ग्यानबाची मेख आहे. पण खोलात जाऊन आरसा दाखवला जात नाही. खरं बोलायची चोरी झाली आहे सध्या. सुटेड बुटेड लोकांच्या तर हे विषय अभ्यासक्रमातच नसतात. तर ते कशाला अशा प्रश्नांवर भूमिका घेतील?.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.