इफ्फको करणार ड्रोनची खरेदी
ड्रोन तंत्रज्ञानाच्या मार्फत नॅनो खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन फार्मस फर्टीलायझर को-ऑपरेटीव्ह लिमिटेड म्हणजेच इफ्फको २ हजार ५०० ड्रोन खरेदी करणार आहे.
या ड्रोनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ५ हजार उद्योजकांना ड्रोनचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ड्रोन खरेदीसाठी इफ्फकोनं करार केला. इफ्फको निर्मित नॅनो युरिया आणि नॅनो डाय-अमोनियम फॉस्फेट म्हणजेच डीएपी खतांच्या फवारणीसाठी या ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. तसेच इफ्फकोकडून ड्रोन वाहतुकीसाठी २ हजार ५०० तीन चाकी वाहन खरेदी करण्यात येणार आहेत.
पंजाब राज्य सरकारकडून कृषी यांत्रिकीकरण धोरण निश्चित
पंजाबमध्ये कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर गव्हाचे उत्पादन घेण्यात येते. त्यासाठी काढणी पूर्व आणि काढणी पश्चात यंत्र खरेदीसाठी पंजाब राज्य सरकारनं शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली आहे. कृषी यांत्रिकीकरण धोरण निर्मिती करून त्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजनेवर केंद्र सरकारच्या धर्तीवर सब-मिशन अंतर्गत कृषी यंत्रांवर अनुदान मिळविण्यासाठी कृषी विभागानं अर्ज मागवले आहेत, अशी माहिती पंजाबचे कृषी मंत्री गुरमीत खुडियान यांनी दिली आहे. महाराष्ट्रातही कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने धोरण निश्चित करावे, अशी मागणी शेतकरी नेते आणि शेतकरी करत आहेत.
महिंद्रा करणार वर्षाअखेर 'ओजा' बाजारात दाखल
ट्रॅक्टर निर्मितीत आघाडीवर असलेल्या महिंद्रा या कंपनीने ओजा श्रेणीतील ट्रॅक्टर निर्मिती करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. चालू वर्षाच्या अखेरीस ट्रॅक्टर बाजारात दाखल होतील.
ओजा श्रेणीतील ट्रॅक्टर वजनाने हलकी असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यासाठी महिंद्रा कंपनीने १ हजार ८७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पातून १ हजार ५०० लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याचे कंपनीनं सांगितले आहे.
पेरणी यंत्रामुळे वेळेची होतेय बचत
अलीकडे पेरणीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रांचा वापर वाढतो आहे. वेळ आणि पैशाची बचत करण्यासाठी शेतकरीही ट्रॅक्टर पेरणी यंत्राला पसंती देत आहेत. शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक पेरणी यंत्र बाजारात दाखल होऊ लागली आहेत.
एकाच वेळी चार पिकांची पेरणी करणारं यंत्र भूमी ॲग्रो या कंपनीने तयार केलं आहे. या यंत्राच्या मदतीनं पेरणी केल्यास बियाणे बचत होते. या पेरणी यंत्रातून सोयाबीन, हरभरा, मूग इत्यादि पिकांची पेरणी करता येते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
ट्रॅक्टर विक्री का वाढतेय?
यंदा मॉन्सूनचं आगमन उशिरा झाल्यानं शेतीच्या मशागतीची कामंही लांबणीवर पडली होती. शेतकरी संभ्रमात आहेत. परंतु तरीही यंदा जून महिन्यात ट्रॅक्टर विक्रीनं मागील ८ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. तसेच ट्रॅक्टरचं उत्पादनही ९ महिन्याच्या उच्चांकावर पोहचलंय.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशांतर्गत विक्री किरकोळ घसरली होती. तर उत्पादन आणि निर्यातीत मागील वर्षीच्या तुलनेत मोठी घट नोंदवली गेली होती. जूनमध्ये मात्र ट्रॅक्टर विक्री वाढली आहे. देशात २०२३ च्या मे महिन्यात ८३ हजार २६७ ट्रॅक्टरची विक्री झाली होती.
जूनमध्ये मात्र ट्रॅक्टर विक्रीत १८ टक्के वाढ होऊन विक्री ९८ हजार ४२२ युनिटसवर पोहचली आहे. यंदा मॉन्सूनचं आगमन लांबल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिति होती. ट्रॅक्टर बाजारात मे महिन्यात मागणी घटल्याचे पाहायला मिळाले.
परंतु जूनमधील मागणी पाहता पुढील काही महिन्यात ट्रॅक्टरच्या मागणीत वाढ होईल, असा ट्रॅक्टर निर्मिती उद्योगांचा अंदाज आहे.