Kolhapur Drought : कोल्हापूरच्या अनेक तालुक्यात दुष्काळाच्या झळा गडध, शेकडो हेक्टर ऊस पीक धोक्यात

sandeep Shirguppe

Kolhapur Drought Condition : कोल्हापूर जिल्ह्यात अनेक तालुक्यात दुष्काळाच्या झळा फेब्रुवारी महिन्यापासून जाणवत आहे. कोल्हापूर जिल्हा पाटबंधारे विभागाकडून जानेवारीपासून जिल्ह्यातील अनेक नद्यांवर उपसाबंदी लागू करण्यात येत आहे.

दरम्यान धरणांतील पाणीसाठ्याच्या नियोजनाबरोबर अनेक तलाव कोरडे पडत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्य सरकारने दुष्काळ तालुका जाहिर केलेल्या गडहिग्लज तालुक्यात शेकडो हेक्टर जमीन दुष्काळामुळे धोकात आली आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील सहा तलावांवर अवलंबून असलेला दोनशेहून अधिक हेक्टरवरील ऊस उन्हाळ्यात धोक्यात येणार आहे. पाणीसाठा आटत असल्याने लघुपाटबंधारे खात्याकडून उपसाबंदी वाढविली जात आहे. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवल्यानंतर ऊस पिकाला अपुरे पडण्याची भीती आहे.

तालुक्यात तेरणी, येणेचवंडी, नरेवाडी, करंबळी, वैरागवाडी व शेंद्री असे सहा लघुपाटबंधारे तलाव आहेत. गतवर्षी पाऊस कमी झाला. त्यानंतर अवकाळी पाऊस झाला तरी तलाव शंभर टक्के भरण्यापर्यंतचा नव्हता. पूर्व भागात तर पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने तलाव कसेबसे ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले.

बहुतांश तलावावर पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. त्यामुळे पिण्यासाठी प्राधान्य देत सुरवातीपासूनच तलावातील पाण्याच्या उपसाबंदीची कार्यवाही करून 'पाटबंधारे'ने पाणी वितरित केले आहे. दरम्यान, तलावांमध्ये साठा कमी झाल्याने या वर्षी उसाची लागण करू नये, असे आवाहन पाटबंधारे खात्याने केले होते.

परंतु, काही शेतकऱ्यांनी धाडसाने ऊस पीक केले. तेच पीक आता अडचणीत आले आहे. मुळात तलाव पूर्ण क्षमतेने भरला तरच उन्हाळ्यात पाणी उपलब्ध होते. मात्र गतवर्षीच्या पावसात नरेवाडी वगळता एकही तलाव पूर्ण क्षमतेने न भरल्याने आतापासूनच पाण्याची कमतरता आहे.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा व शाळू पिकासाठी आवश्यक तेव्हा पाणी दिले. आता मात्र उसाला पाणी देणे अडचणीचे जाणार आहे. आतापासूनच कडक ऊन आहे. त्यात वेळेत पाणी नसल्याने ऊस पिकाच्या वाढीवर परिणाम जाणवत आहे. त्यामुळे मार्च ते मेपर्यंतच्या कालावधीत उसाला पाणी मिळण्याची शाश्वती अंधुक असून पीक धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.

पाणी टंचाईची भीती

उपसाबंदी लावून पिण्यासाठीचे पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन 'पाटबंधारे'कडून सुरू आहे; परंतु कडक उपसाबंदी नसल्याने पिण्यासाठी पाणी शिल्लक न राहिल्यास नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची भीती आतापासूनच लागली आहे.

  • येणेचवंडी गावसभेत तलावातून पाणी GG उपसाबंदीचा ठराव करून लघुपाटबंधारेला दिला, तरीबी उपसाबंदीची अंमलबजावणी झालेली नाही. उपसा सुरूच असल्याने काही दिवसांत नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे कडक उपसाबंदी करा. - शंकर नंदनवाडे, येणेचवंडी

  • ८८ लघुपाटबंधारे तलावातील पाणीसाठा कमी होत आहे. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवून शेतीला देण्याचे नियोजन असले तरी सध्याचा साठा पाहता शेती पिकांना फारसे पाणी मिळेल, याची शाश्वती कमी दिसत आहे. शेतकऱ्यांनी स्थिती पाहून पीक नियोजन करावे. श्रीकांत पाटील, शाखा अभियंता

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.