Dairy Agrowon
यशोगाथा

Dairy : कुटुंबाच्या एकीतून विनामजूर यशस्वी दुग्धव्यवसाय

रामनाथ आणि दत्तात्रेय या बांगर बंधूंनी घरच्या पारंपरिक दुग्धव्यवसायाचा विस्तार करून गायींची संख्या सहा-सातवरून १४ पर्यंत नेली. आज सर्वांचे श्रम, नेटके व्यवस्थापन व जबाबदाऱ्या अशा योगदानातून कोणत्याही मजुराच्या मदतीविना दररोज १२० लिटर दूध संकलनासह व्यवसाय व त्याचे अर्थकारण कुटुंबाने यशस्वी केले आहे.

गणेश कोरे

पुणे जिल्ह्यात पिंपळगाव (खडकी) (ता. आंबेगाव) हे गाव आहे. दुधाचे गाव (Milk Village) अशी त्याची ओळख आहे. गावात घरटी किमान पाच गायी नक्कीच आढळतील. परिसरात सिंचनाच्या सुविधा (Irrigation Facility) असल्याने हिरवा चारा (Green Fodder) मुबलक असतो. त्यामुळे हा व्यवसाय विस्तारला. गावात रामनाथ विठ्ठल बांगर व त्यांचे बंधू दत्तात्रेय यांची साडेचार एकर शेती आहे. वडिलांच्या काळापासून ऊस पिकासह गोपालन (Cow Rearing) आणि दुधाचा व्यवसाय (Dairy Business) सुरू होता.

दुग्धव्यवसायाचा विस्तार

वडिलांच्या काळात पाच ते सहा गायीच होत्या. कुटुंबाची गुजराण तेवढ्या व्यवसायावर व्हायची. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर रामनाथ यांनी भावाच्या मदतीने घरचा व्यवसाय वाढवण्याचे ठरवले. सुरवातीला पारंपरिक साधा गोठा होता. पुरेसे पैसे नसल्याने नवीन गोठा बांधणे शक्य नव्हते. मग टप्प्याटप्प्याने गायींची संख्या १० आणि आज ती १४ पर्यंत (सर्व एचएफ) वाढविली आहे. अलीकडेच ६० बाय ३० फूट आकाराच्या पक्क्या गोठ्याचे बांधकाम केले आहे. त्यासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च केला आहे. गायींना बसण्यासाठी मॅटसह, शास्त्रोक्त पद्धतीने गव्हाणीची बांधणी केली आहे. गोठ्याला लागूनच पुढील सहा महिन्यात त्याच आकाराचा मुक्त गोठा बांधण्याचे नियोजन आहे. त्यानंतर अजून १० गाई वाढविण्याचे नियोजन आहे.

पोषक आहार, पशुवैद्यकीय सेवा

पशुधनाला पोषक आहार आणि वेळेवर पशुवैद्यकीय सेवा दिल्यास दूध संकलन कमी न होता त्यात सातत्य राहते. त्यामुळे साडेचार एकरां पैकी तीन एकरांत मका, ज्वारी, नेपिअर, लसूण घास आदींची लागवड केली आहे. शाश्‍वत उत्पादनासाठी दीड एकरांत ऊस आहे. यामुळे बाराही महिने चक्राकार पद्धतीने हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत राहतो. गाईसाठी ‘फॅमिली डॉक्टर’ची व्यवस्था केली आहे. गावात सरकारी जनावरांचा दवाखाना आहे. तेथील सल्ल्याद्वारे व प्रसंगी खासगी पशुवैद्यकांमार्फंत विविध रोगांसाठीचे लसीकरण, कृत्रीम रेतन व खाद्य व्यवस्थापन या बाबी सांभाळल्या जातात.

सारे कुटुंब राबते व्यवसायात

रामनाथ, त्यांची पत्नी प्रमिला, दत्तात्रेय, त्यांची पत्नी रूपाली असे चौघे दररोज गोठा व्यवस्थापन सांभाळतात. एकही मजूर तैनात केलेला नाही. एकमेकांच्या समन्वयातून कष्टाचा भार उचलला जात असल्याने श्रमांची विभागणी होते. कामे वेळेवर देखील होतात. मजुरांवरील खर्चात बचत होत असून ती कुटुंबाच्या उत्कर्षासाठी उपयोगास येत आहे. सकाळी गोठा स्वच्छता, यंत्राद्वारे दूधकाढणी, दूध संकलन व गावातील संस्थेला पुरवठा तसेच सकाळी व संध्याकाळीही याच प्रकारे कामांची नियमितता असते.

अर्थकारण

दररोज सुमारे १२० ते १२५ लिटरपर्यंत दूध संकलन होते. गावातील श्रीराम दूध उत्पादक संघाला दुधाचा पुरवठा होतो. प्रति लिटर ३० ते ३३ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. रोजचा पशुखाद्यासह एकूण खर्च दीड हजार रुपये होतो. शेणखताचा शेतातील वापर वगळता साधारण ६० हजार रुपयांच्या शेणखताची वर्षाला विक्री होते. महिन्याला साधारण ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.

दुग्ध व्यवसायातून बंगला

बांगर कुटुंबाने टुमदार बंगला साकारण्याचे काम हाती घेतले आहे. आई- वडिलांनी त्यांचे आयुष्य लहान साध्या घरात काढले. आता मोठ्या वास्तूत राहायला जाण्याचा आनंद त्यांना मिळतो आहे हे केवळ दुग्धव्यवसायातून घडले असे रामनाथ यांनी सांगितले. गावातील दूध संस्थेचे दोन ते तीन वर्षे अध्यक्ष व सध्या संचालक ही जबाबदारी रामनाथ पार पाडत आहेत. संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रास्त दरात पशुखाद्य आणि उत्तम पशुवैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न आहे.

खिलार बैलांचे संगोपन

बांगर कुटुंब दरवर्षी बैलगाडा शर्यतीत भाग घेते. ही परंपरा त्यांनी वडिलोपार्जित जोपासली आहे. चार जातिवंत खिलार बैलांसह एक घोडी दावणीला असल्याचा त्यांना अभिमान आहे. मध्यंतरी बैलगाडा शर्यतीला बंदी असतानाही बैलांच्या संगोपनात कुठे बाधा आली नाही. घाटांचा राजा व अन्य पारितोषिके त्यांनी पटकाविली आहेत.

संपर्क- रामनाथ बांगर- ९५९५९५२२३५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT