Agriculture Technology Agrowon
यशोगाथा

Indian Agriculture : शेती फायदेशीर करणारी स्लरी!

Agriculture Research : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद कर्वे यांनी यांच्या संशोधनातून जमिनीतील जिवाणूंनाच जर खाद्य पुरविले तर तेच जिवाणू पिकांसाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची अन्नद्रव्ये तयार करत असल्याचे सिद्ध केले.

Team Agrowon

यशवंत अमृतकर

Agriculture : मानवाचा प्रवास अचंबित करणारा आहे. त्याने आदिमानवापासून ते आधुनिक माणसापर्यंत, साध्या चाकापासून ते चंद्रावर चरणस्पर्श करण्यापर्यंत विकासाचे एकेक टप्पे सर्वांगाने विकास केला. या प्रत्येक विकासाच्या टप्प्यावर काही फायदे आणि काही तोटे नक्कीच झाले आहेत.

विकासाची फळे भोगत असतानाच काही दुष्परिणामांना सामोरे जावे लागले आहे. विकासाच्या प्रक्रियेमध्ये काही लोकांनी आघाडी घेतली तर काहीजण पिछाडीवर राहिले. आपण कृषी क्षेत्रातील विकासाचा विचार करतानाही असेच वेगवेगळे टप्पे आढळून येतात. माणसांची वस्ती प्रामुख्याने नदी किंवा पाण्याच्या स्रोताशेजारी होऊन संस्कृती विकसित झाली.

पाण्याची कमतरता भासल्यानंतर नदीमध्येच छोटे छोटे खड्डे खोदत पिण्यापुरते पाणी मिळवणाऱ्या माणसाने आणखी खोल विहिरी तयार केल्या. विहिरीतून पाणी काढण्यासाठी बैलचलित मोटेपासून पुढे ऑइल इंजिन, इलेक्ट्रिक मोटर इ. टप्पे ओलांडले.

पण प्रक्रियेत जमिनीतील पाणीही संपून आपल्याला दुष्काळाला सामोरे जावे लक्षात आल्यानंतर पाणी बचतीचे उपाय शोधण्यास प्राधान्य दिले. त्यातून वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी पाइपलाइन, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर येत गेले.

बियाण्यामध्येही घरगुती पारंपरिक बियांपासून सुधारित, संकरित, बी.टी. अशी प्रगती केली. रोपवाटिका आणि त्यातही आमूलाग्र बदल होऊन विविध प्रकारे ग्राफ्टिंग केलेली रोपे उपलब्ध होऊ लागली.

पिकांच्या चांगल्या वाढीचा विचार शेतकरी करायला लागले. आपल्याकडे प्राचीन काळापासून वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय किंवा प्राणीज खतांचा वापर सुरू झाला. त्यात प्रामुख्याने शेणखतावर भर होता. मात्र पुढील टप्प्यात रासायनिक खते आली. विद्राव्य खते, सुक्ष्म अन्नद्रव्ये आणि उत्प्रेरके आली. आपण वाढविलेले पीक इतर किडीच खाताहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांच्यापासून पीक वाचविण्याची गरज भासली.

अन्य वनस्पतींच्या पाल्याचे रस, अर्क अशा नैसर्गिक कीटकनाशकांचा सुरुवातीला वापर होत होता. त्यात रासायनिक कीडनाशके येत गेली. अवजारांमध्येही हाताने बनविलेल्या अवजारांपासून अत्याधुनिक व स्वयंचलित उपकरणांपर्यंत प्रवास झाला आहे. पुढील नजरेच्या टप्प्यात शेतात काम करणारे यंत्रमानव दिसू लागले आहेत.

निसर्गातील निरिक्षण आणि आकाशातील नक्षत्रावरील गणितांतून हवामानाचे अंदाज लावण्यापासून शेतातच उभारलेल्या अत्याधुनिक हवामान केंद्रापर्यंत मजल मारली आहे. या साऱ्या प्रवासामध्ये माणसाचे शोधक स्वभाव, त्याची अधिक मिळवत राहण्याची वृत्ती याचा चांगल्या अर्थाने फायदा झाला. मात्र याचाच पुढील टप्पा वाढता हव्यास, हाव, ओरबाडून घेण्याची वृत्ती यातून गाठला गेला.

विकासाच्या साखळीतील अनेक गोष्टींचा अनावश्यक व अतिरेकी वापर होऊ लागला. त्याचे दुष्परिणाम निसर्गातील प्रत्येक घटकाला भोगावे लागू लागले. मातीच्या पोतापासून हवेच्या प्रदूषणापर्यंत सर्व गोष्टी आपण खराब करत आहोत, याचीही भान काही शहाण्यासुरत्यांना होत गेले. ते निसर्गाचा समतोल टिकविण्यासाठी स्वतः धडपडण्यासोबतच सर्वांना आवाहन करू लागले.

शेती विकासाच्या टप्प्यावर आलेल्या कीटकनाशक, बुरशीनाशक व तणनाशकाच्या वापरातून जमिनीत (मातीत) असलेल्या उपयुक्त जिवाणूंचीही कत्तल करत गेलो. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद कर्वे यांनी यांच्या संशोधनातून जमिनीतील जिवाणूंनाच जर खाद्य पुरविले तर तेच जिवाणू पिकांसाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची अन्नद्रव्ये तयार करत असल्याचे सिद्ध केले.

त्यांच्या प्रमाणेच मातीमध्ये काम आणि प्रयोग करणारे प्रतापराव चिपळूणकर यांनीही सिद्ध केले की, आधीच्या पिकाच्या मुळे ही (रूट झोन) ही पुढील पिकासाठी अन्न असते. त्याचप्रमाणे अशा मुळांपासून जमिनीत ऑरगॅनिक कार्बनचे प्रमाण वाढते. आंतरराष्ट्रीय सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ कार्ल वोझ यांनी सूक्ष्म जीवशास्त्र हे मानवाच्या पुढील वाटचालीत प्रमुख आणि मध्यवर्ती भूमिकेत असेल, असे भाकीत केले आहे.

आता सूक्ष्म जीव शेतीमध्ये आणायचे कोठून असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. त्यासाठीच शेणखतांचा वापर करून तयार केलेली स्लरी अत्यंत उपयोगी ठरू शकते. या स्लरीमध्ये निर्माण झालेले सूक्ष्मजीव जमिनीतील सोडले असता पिकास सर्व प्रकारचे अन्नघटक व मूलद्रव्ये मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात.

स्लरीचा वापर हा शेतीत आपल्या पीक पद्धतीनुसार करता येतो.
१) फळबाग- ठराविक अंतरावर ठिबक सिंचनावर घेतलेली पिके.
२) कमी अंतरावरची ठिबक सिंचनावर घेतलेली पिके.
३) कमी अंतरावर पावसाच्या पाण्यावर किंवा प्रवाही पाण्यावर घेतली जाणारी पिके.


पहिल्या प्रकारामध्ये फळबागेत ठराविक दोन ओळीतील अंतर व दोन झाडांमधील अंतर ठेवून ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. दोन ओळींमध्ये फवारणीसाठी व आंतरमशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर होतो.

अशा शेतात स्लरी देण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी स्लरीचे गाडे बनविले आहे. ते प्रत्येक झाडाचे बुडाजवळ जाऊन स्लरी सोडतात अथवा वस्त्रगाळ करून किंवा वेगळे फिल्टर वापरून ही ठिबक सिंचनाद्वारे स्लरी सोडतात. या वर्गातील शेतकरी स्लरीबाबत अधिक जागरूक दिसतात.

दुसऱ्या पीक प्रकारात कमी अंतरावरील अथवा सरी पद्धतीने ठिबक सिंचनावर घेतलेली पिके यात मुख्यत्वे करून वस्त्रगाळ करून ड्रिपने स्लरी सोडली जाते अथवा पंपाने फिल्टरच्या पुढील पाइपलाइनमध्ये सर्व्हिस स्लॅडर जोडून पंपाच्या दबावाने पाइपलाइनमध्ये अथवा प्रवाही पाण्यामध्ये स्लरी सोडली जाते. अर्थात, या प्रकारातील शेती व शेतकरी स्लरीच्या फायद्याबाबत फारसा जागरूक वाटत नाही.

तिसऱ्या पीक प्रकारात म्हणजेच पावसाच्या पाण्यावर घेतलेली पिके. या पारंपारिक शेतीमध्ये पूर्वी उन्हाळ्यात शेतकरी शेणखत घालून व इंग्रजी व्ही आकाराची सरी घालून ठेवत असे. पहिल्या पावसात सरींमध्ये पाणी साचून जिवाणूंची वाढ उत्तम प्रकारे होत असे. परिणामी पिकेही उत्तम येत होती. मात्र आता शेतीच्या प्रमाणात शेणखताची उपलब्धताच होत नाही.

सेंद्रिय खतांऐवजी रासायनिक खते विकत आणून देणे तुलनेने सोपे वाटत असल्याने रासायनिक खतांचा भडिमार केला जातो. ही शेती मोडकळीस आली आहे. शेतात सूक्ष्म जीवाणू नाहीत, पिकांची वाढ नाही. परिणामी या शेतकऱ्यास शेती आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे जाणवते.

योग्य प्रकारे स्लरींचा वापर केल्यास अशी कोणत्याही प्रकारची शेती फायदेशीर होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. मात्र शेतकऱ्यांनी जागरूकपणे आपल्या सर्व पिकांमध्ये स्लरीचा वापर वाढवला पाहिजे. विशेषतः दोन आणि तीन प्रकारातील शेती ही पहिल्या प्रकारातील शेतीइतकीच नफ्याची व समाधानकारक ठरेल, असा मला विश्वास वाटतो.

शेतकऱ्याचा स्लरीसंबंधी प्रत्यक्ष अनुभव :

पहिल्या प्रकारातील नाशिक जिल्ह्यातील भूयाणे (ता. ) येथील कृषिभूषण शेतकरी खंडेराव दौलत शेवाळे यांच्याशी स्लरीबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितलेले अनुभव पुढील प्रमाणे -
स्लरीच्या वापरामुळे माझ्या ८० एकरमधील द्राक्षबागेस रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अत्यल्प खर्च येतो. संपूर्ण ८० एकर बागेत जास्तीत जास्त ८ ते १० बॅगा रासायनिक खते लागतात.

मी दोन प्रकारचे स्लरीचे टँक वापरतो. एका पाच हजार लिटरच्या टाकीत माझ्या गोठ्यातील गुरांचे शेण व गोमूत्र एकत्र केले जाते. ओझर येथील द्राक्ष बागायतदार संघ पान, देठ तपासणी प्रयोगशाळेमध्ये त्याची तपासणी केल्यानंतर आलेल्या अहवालानुसार जी अन्नद्रव्ये कमी आहेत.

तेवढेच घटक या टाकीमध्ये टाकले जातात. ज्या वेळी या पाण्याला उकळ येते, त्या वेळेस ते स्लरीचे पाणी स्लरीच्या गाड्यांमधून प्रत्येक झाडास साधारणपणे प्रत्येकी एक लिटर याप्रमाणे दिले जाते.

दुसऱ्या स्लरी टाकीचा वापर आम्ही फक्त आणि फक्त जिवाणूंची स्लरी देण्यासाठी करतो. या टाकीमध्ये पाणी साधारणत: पाच हजार लिटर पाणी, गूळ, घरातील चहा करून उरलेली चहाची पावडर, ताक व वेगवेगळ्या प्रकारचे जिवाणू टाकले जातात.

या टाकीमध्ये ऑक्सिजनचा पंप लावला जातो. यात भरपूर ऑक्सिजन मिसळला गेल्याने त्यात ॲरोबिक जिवाणूंची वाढ चांगल्या प्रकारे होते. टाकीत उकळ फुटल्यानंतर हे स्लरीचे पाणी ड्रिपने अथवा स्लरीच्या गाड्याने प्रत्येक प्लॉटला क्रमाक्रमाने दिले जाते.


या दोन्ही प्रकारे स्लरीचा वापर अत्यंत प्रभावीपणे करत असल्यामुळे द्राक्षाच्या पान, देठ तपासणीमध्ये शक्यतोवर कोणत्याही अन्नघटकाची कमतरता दिसत नाही. यदाकदाचित दिसून आल्यास फक्त तेवढ्याच रासायनिक खतांचा वापर, तोही स्लरीच्या माध्यमातून केला जातो. परिणामी पिकास संतुलित अन्नद्रव्ये मिळतात. पिकाची चांगली वाढ होऊन, प्रतिकारशक्ती वाढल्याने रोगांचे प्रमाण कमी राहते. परिणामी माझा कीटकनाशक व रासायनिक खतांवरील खर्चही अत्यल्प होतो.


खंडेराव दौलत शेवाळे, ९४२२७५५४३८

- यशवंत अमृतकर, ९४२२७५४५२०
(लेखक सटाणा येथील प्रगतिशील शेतकरी असून, कांदा, डाळिंब, मका इ. पिकांमध्ये स्वतः अनेक वर्षापासून स्लरीचा वापर करतात.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT