Vermicompost Agrowon
यशोगाथा

Vermicompost : अभियांत्रिकी प्राध्यापकाची दर्जेदार गांडूळ खत निर्मिती

Compost Production Project : कोरोना काळात गावी असताना अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक स्वानंद डोंगरे (नाशिक) यांच्या मनात गांडूळ खतनिर्मितीची कल्पना स्फुरली. शेती, ‘गार्डनिंग’, जमिनीची सुपीकता या विषयांचा चांगला अभ्यास असलेल्या डोंगरे यांनी त्यातूनच आधुनिक तंत्राद्वारे गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प (स्टार्ट अप) साकारला आहे.

मुकूंद पिंगळे

Compost Fertilizer Production : नगर जिल्ह्यातील निमज (ता. संगमनेर) हे मूळ गाव असलेले स्वानंद डोंगरे नाशिक येथील के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडील शांताराम डोंगरे मुख्याध्यापक होते. त्यांची शेतकरी कुटुंबातीलच पार्श्‍वभूमी आहे. स्वानंद यांनी लहानपणापासूनच शेतीची आवड जपली. तंत्रज्ञान समजून घेऊन शेतीत प्रयोग करण्याचा त्यांना छंद आहे. ‘इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन’ या शाखेतून त्यांचे शिक्षण झाले आहे.

जमिनीच्या सुपीकतेवर अभ्यास

कोरोनाच्या काळात स्वानंद यांना काही काळ गावी व्यतीत करावा लागला. तेथे स्वतःच्या शेतीत ते प्रयोग करू लागले. जमिनीची सुपीकता हा त्यांचा आवडता विषय आहे. त्याचा अभ्यास करताना मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सर्वत्र कमी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जमिनीची प्रत, आरोग्य सुधार या अनुषंगाने त्यांनी प्रयोगशील शेतकऱ्यांकडे भेटी दिल्या.

त्यातूनच कसदार गांडूळ खताचा वापर व निर्मितीची गरज त्यांना भासू लागली. काही गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्‍वर (नगर) व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्र (नाशिक) आदी ठिकाणी भेटी घेऊन शास्त्रीय पद्धती समजून घेतल्या. गावी दोन बेड्‍सच्या माध्यमातून गांडूळ खत निर्मिती सुरू केली.

व्यावसायिक गांडूळ खत निर्मिती

नाशिक जवळील आडगाव परिसरात करार पद्धतीने चार गुंठे जागा भाडेतत्त्वावर घेतली. छताविना खतनिर्मिती सुरू केल्याने सूर्यप्रकाश व उष्ण तापमानाचा परिणाम होऊ लागला. मग ७० बाय ४० फूट आकाराचे शेड २०२२ मध्ये उभारले. आज तेथे १२ बाय ४ बाय दोन फूट आकाराचे २५ बेड्‍स तयार केले आहेत. ते पॉलिथिनचे असल्याने ओलावा टिकवण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे वाफसा तयार केला आहे. आयसेंनिया फेटिडा व युड्रिलस युजेनीया या जातीच्या गांडुळांचा वापर केला आहे.

...अशी होते खतनिर्मिती

  • सुरुवातीला बेडखाली पालापाचोळा, सेंद्रिय आच्छादन केले जाते. त्यातून ओलावा जपणे, गांडुळांना अंडी देणे या बाबी शक्य होतात.

  • स्थानिक पशुपालकांकडून शेणखताची खरेदी केली जाते. त्यातील उष्णता कमी केली जाते.

  • स्युडोमोनास, बॅसिलस, ट्रायकोडर्मा मेटारायझियम आदी जैविक कीडनाशकांची प्रक्रिया केली जाते.

  • त्याद्वारे शेणखतामधील हुमणी, हानिकारक बुरशींचे नियंत्रण होते.

  • बेड भरताना सेंद्रिय आच्छादन व त्यानंतर पुन्हा एकदा सूक्ष्मजीवांवर आधारित कीडनाशकांची प्रक्रिया होते. प्रति बेडसाठी दोन किलो गांडुळे असा वापर होतो.

  • नियमितपणे ठिबक सिंचनाद्वारे ओलावा ठेवला जातो. उन्हाळ्यात फॉगर्सचा वापर होतो.

स्वानंद सांगतात की खत नियंत्रण कायद्यातील निकषांनुसार गांडूळ खतात २० टक्क्यांच्या आत ओलाव्याचे प्रमाण असणे गरजेचे असते. त्यानुसार पालन केले जाते. खतातील घटकांचा आकार देखील निकषांनुसार चार मिमीपर्यंतच ठेवावा लागतो. त्यासाठी स्वयंचलित चाळणी यंत्र (व्हयब्रेटिंग) घेतले आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा सूक्ष्मजीवयुक्त घटकांचा वापर करून खताचे पॅकिंग केले जाते.

त्याचा सामू, विद्युत वाहकता यांचीही तपासणी करून शास्त्रीय पद्धतीने गुणवत्ता कायम ठेवली जाते. आर्द्रता, तापमान तपासण्यासाठी उपकरणांचा वापर होतो. अशा प्रकारे उपलब्ध वेळेचा कार्यक्षम वापर करून गरजेनुसार मजुरांची मदत घेतली जाते. त्यामुळे श्रम, भांडवल, उत्पादन व विपणन या अनुषंगाने आदर्श कामकाज पाहण्यास मिळते.

ब्रॅण्ड केला लोकप्रिय

दर महिन्याला २५ बेड्‍समधून सुमारे १० ते १२ टन, तर वर्षाला १०० ते १२० टनांच्या आसपास गांडूळ खताचे उत्पादन घेण्यात येते. दहा रुपये प्रति किलो असा त्याचा दर आहे. जोडीला गांडूळ कल्चर ४०० रुपये प्रति किलो व व्हर्मिवॉशची ३५ रुपये प्रति लिटर दराने विक्री केली जाते. ‘भूमी बायो ऑरगॅनिक्स’ नावाचा उत्पादनांचा ब्रॅण्ड लोकप्रिय झाला आहे.

शेतकऱ्यांसाठी ४० व २० किलोची गोणी तर शहरी ग्राहकांसाठी ‘टेरेस गार्डनिंग’साठी ५ व एक किलो आकर्षक पॅकिंगमध्ये व लेबलिंग करून विक्री केली जाते. नाशिक, मुंबई येथे नर्सरीज, नगर जिल्ह्यात तसेच बाएफ व सहकारी संस्थांमार्फत दिंडोरी, पेठ, अकोले, निफाड, नाशिक, जव्हार, मोखाडा भागात पुरवठा होतो. यासह निंबोळी पावडर, कंपोस्ट खताचीही विक्री होते. दरवर्षी एकूण दहा ते बारा लाखांची उलाढाल होते.

‘पाँटिंग मिक्स’लाही मागणी : शहरी भागात ‘टेरेस फार्मिंग’ संकल्पनेवनर आधारित पॉटिंग मिक्स नावाचे सेंद्रिय खत स्वानंद यांनी तयार केले आहे. यात भाताचे तूस, गव्हाचे काड यांचे माध्यम व त्यात गांडूळ खत, निंबोळी पावडर, रॉक फॉस्फेट, व्हर्मिवॉश, उपयुक्त सूक्ष्मजीव यांचा समावेश आहे. किलोला २० रुपये त्याचा दर आहे. उत्पादने निर्मिती व्यतिरिक्त फेसबुक, व्हॉट्सअप तसेच चर्चासत्रांमधून माती सुपीकता, पीक संरक्षण, मधमाशीपालन आदी विषयांवर स्वानंद मार्गदर्शन करतात. त्यांच्या उत्पादनांचा प्रसार प्रामुख्याने मौखिक प्रसिद्धी व शेतकऱ्यांचे नेटवर्क यातून झाला आहे.

स्वानंद डोंगरे ९३५९७११४०८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: केळीला उठाव कायम; कापूस दर नरमले, गव्हाला उठाव, गवारचे दर तेजीतच तर मका कणसाचे भाव टिकून

Parliament Monsoon Session 2025: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अमित शाह यांनी मांडलेल्या विधेयकांवर; विरोधकांचा जोरदार निषेध

Sindhudurg Rain: सिंधुदुर्गात संततधार कायम; अनेक भागांत पूरस्थिती

Shirala Rain: शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला

Kolhapur Heavy Rainfall: कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद 

SCROLL FOR NEXT