रमेश मातकर यांची दर्जेदार संत्रा बाग
रमेश मातकर यांची दर्जेदार संत्रा बाग  
यशोगाथा

संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा आदर्श 

Vinod Ingole

किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी कारणांमुळे नागपूर, अमरावती भागातील अनेक संत्रा बागा समस्याग्रस्त झाल्या आहेत. अशा स्थितीत जवळा खुर्द (जि. अमरावती) येथील रमेश मातकर यांनी आपल्या १६ एकर संत्रा बागेतील पाणी, लागवड अंतराचे नियोजन, कीड-रोग यांचे उत्कृष्ठ व्यवस्थापन साधत उत्पादकता व फळांचा दर्जाही उत्तम प्रकारे टिकवला आहे.    अमरावती जिल्ह्यातील जवळा खुर्द शिवारात (ता. अंजनगाव सुजी’) येथील रमेश मातकर यांची एकूण ४५ एकर शेती आहे. त्यांची १५ एकर शेती ही अन्यत्र आहे. त्यांचे वडील विठ्ठलराव यांची दहा एकर शेती होती. वडिलोपार्जीत शेतीत भर घालत मातकर यांनी शेतीचा विस्तार केला आहे.  संत्रा हेच ठरले मुख्य पीक  रमेश हे पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते. सुमारे ३३ वर्षे नोकरी केल्यानंतर ते २०१२ साली सेवानिवृत्त झाले. पूर्वीपासूनच शेतीची आवड त्यांनी टिकवली होती. निवृत्तीनंतर पूर्णवेळ शेतीला देणे त्यांना शक्य झाले. विदर्भात पाणी, कीड-रोग या संत्रा पिकातील मुख्य समस्या आहेत. त्यावरच लक्ष केंद्रित करण्याचे मातकर यांनी ठरवले.  व्यवस्थापनातील ठळक बाबी 

  • मातकर यांनी २१ बाय २१ फूट अंतरावर संत्रा लागवड केली आहे. बेडची उंची सुमारे एक ते पाऊणफूट आहे. दोन झाडांमध्ये सहा फुटांचा चर असल्याने पाण्याचा निचरा होतो. गादीवाफा पद्धतीही पोषक ठरली. त्यामुळे झाडांना रोगांपासून दूर ठेवणे शक्य होते. 
  • पाणी हा घटक संत्रा पिकात कीड-रोगांचे मुख्य कारण ठरते, त्यामुळे पाण्याचे नियोजन सुधारले. 
  • त्यासाठी रिंग पद्धतीचा अवलंब केला आहे. ठिबकच्या नळ्या झाडाभोवती गोलाकार लावल्या आहेत. या माध्यमातून झाडाच्या संपूर्ण घेराला पाणी मिळते. थेट मुळांजवळ पाणी न देता जसा झाडाचा परिघ असेल तसे पाणी दिले जाते. 
  • दोन झाडांच्या मध्यभागी इनलाईन ठिबक आहे. 
  • सन २००२ व २००४ अशा कालावधीत लागवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रातून ११ रुपये प्रतिनग या दराने रोप खरेदी केली आहे. 
  • सेंद्रिय पद्धतीवर विश्‍वास ठेवणाऱ्या मातकर यांच्याकडे गीर जातीची सुमारे १३ जनावरे आहेत. 
  • त्यांच्या माध्यमातून प्रत्येक झाडाला दरवर्षी तीन ते चार टोपली शेणखत. 
  • गोठ्यातील शेण व गोमूत्र ‘फिल्टर’ करून दिले जाते. त्यासाठी वाळू, दगड आदी घटक असलेल्या दोन ते तीन टाक्यांचा वापर. फिल्टर झालेले द्रावण १४ हजार लिटर क्षमतेच्या टाकीत साठवण्यात येते. ड्रीप व्हेंच्युरीच्या माध्यमातून ही स्लरी संपूर्ण बागेला दली जाते. 
  • जीवामृत, दशपर्णी, व्हर्मीव्हॉश आदी विविध सेंद्रिय घटक तयार करण्यासाठी सुमारे १५ टॅंक्सची उभारणी. प्रति टॅंकची क्षमता ५०० ते ७०० लिटर. 
  • शेतीच्या चौफेर जेसीबी यंत्राच्या मदतीने चर खोदले. त्यामध्ये पावसाचे पाणी साठत त्याचा जलपुर्नभरणाकरिता उपयोग. तीन बोअरवेल्स असून वीस एकर क्षेत्र ठिबकखाली. 
  • उत्पादन व विक्री  बागेत सुमारे १६०० झाडे आहेत. एकरी सुमारे १५ ते १७ टनांप्रमाणे उत्पादन मातकर घेतात. प्रतिझाड १०००, १२०० ते त्यापुढेही फळे लागतात. सेंद्रिय घटकांचा वापर करून दर्जेदार उत्पादन घेतले जाते. एकेवेळेस ३७ हजार रुपये प्रतिटन दर व्यापाऱ्यांकडून फळांना मिळाला. दरवर्षी साधारण किलोला १५, २० ते त्यापुढे दर मिळतो. व्यापारी जागेवर येऊन फळांची खरेदी करतात. बागेच्या व्यवस्थापनावर एकरी सरासरी ५० हजार ते त्याहूनही अधिक खर्च होतो.  संत्रा बागेचे आदर्श व्यवस्थापन 

  • दरवर्षी आंबिया बहार. कालावधी वाढल्यास वाढलेल्या फांद्याची संख्या म्हणजे सालीचे प्रमाण वाढते व त्यावर रोगांचा प्रादुर्भाव होतो. 
  • जमीन काळ्या पोताची असल्याने नोव्हेंबरपासून पाण्याचा ५० ते ६० दिवसांचा ताण. 
  • ताणाच्या कालावधीत झाडावरील साल काढणे, रोगग्रस्त झाडांवर उपचार. 
  • निंबोळी अर्क व गोमूत्राचा पीक संरक्षणासाठी वापर. 
  • शेतातील तणस गवत, पीक अवशेष यांचा खत म्हणून वापर. जागेवरच हे घटक कुजवले जातात. गवताचे खतात रूपांतर करण्याकरिता एकरी एक हजार लिटर जीवामृताची फवारणी. 
  • डिंक्‍या व मुळकूज रोग नियंत्रणासाठी गावरान गाईचे शेण, कडूलिंबाचा पाला, गोमूत्र, गेरू. 
  • यांच्या द्रावणाचा वर्षातून दोन ते तीन वेळा वापर. 
  • आंबिया बहरासाठी पहिले पाणी डिसेंबर अखेरीस तुषार पद्धतीने. 
  • बहराच्या नवती व फुलोऱ्यावर येणाऱ्या मावा, काळी माशी, पाने पोखरणारी अळी, थ्रीप्स, सायला आदी किडींच्या नियंत्रणासाठी पाच टक्‍के निंबोळी अर्क व जैविक कीटकनाशके व स्टीकर यांची फवारणी. 
  • आंबीया बहारातील फळांची गळ थांबविण्यासाठी बाग वाफशावर राहील यासाठी रिंग पद्धतीने ठिबकद्वारे सिंचन. ठिबक नळ्यांमध्ये क्षार साठू नयेत, यासाठी आम्लयुक्‍त पाण्याने स्वच्छता. 
  • फळे, झाड व पानांची संख्या संतुलित राखण्यासाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात सूक्ष्म अन्नद्रव्य खतांसोबत व्हर्मीवॉश १५० मिली. प्रत्येक झाडास ठिबकद्वारे. 
  • ट्रायकोडर्मा, पीएसबी, वेस्ट डी कंपोजर यांचाही वापर. 
  • सध्या शेळीपालनावरही भर. संकरिकरणाद्वारे आफ्रिकन बोअर शेळीचे संगोपन 
  • संपर्क- रमेश मातकर-९४२२१५६६१३ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

    Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

    Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

    Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

    Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

    SCROLL FOR NEXT