गोड चवीच्या या देशी केळीला ग्राहकांकडून मागणी आहे.
गोड चवीच्या या देशी केळीला ग्राहकांकडून मागणी आहे. 
यशोगाथा

अनेक वर्षांपासून जोपासला देशी केळीचा गोडवा

Abhijeet Dake

सांगली जिल्ह्यातील कुंभारगाव येथील किरण बबन लाड यांनी आजोबांपासून चालत आलेली देशी केळी लागवडीची परंपरा कायम ठेवली आहे. दरवर्षी सुमारे तीस गुंठ्यांत ते ही केळी घेतात. चवीला गोड, वादळवाऱ्याला सहनशील व वर्षभर मागणी असलेले हे वाण आहे. आठवड्यातल्या सुमारे चार ते पाच स्थानिक बाजारांत थेट विक्री करून लाड यांनी आपली बाजारपेठ व ग्राहक तयार करण्यातही यश मिळविले आहे.   सांगली जिल्ह्यात कुंडल(ता. पलूस)पासून अवघ्या चार किलोमीटरवर कुंभारगाव (ता. कडेगाव) वसले आहे. पलूस आणि कडेगाव तालुका ऊस, द्राक्षपट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गावातील किरण बबन लाड तसे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांची सुमरे दोन ते सव्वादोन एकर शेती आहे. त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. ते ऊस आणि हळद ही पिके घ्यायचे. सुरवातीचा संघर्ष घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने शेतीची जबाबदारी आजोबांवर आली. वेगळ्या पिकाचा प्रयोग म्हणून त्यांनी देशी केळीची निवड १९९० च्या सुमारास केली. त्यावर उदरनिर्वाह व्हायचा. पण आर्थिक चणचण भासत होतीच. आजोबांच्या बरोबर किरणदेखील शेतात जायचे. आजोबांचे निधन झाल्यानंतर मात्र संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आई आणि आजीवर आली. साहजिकच किरण यांनाही दोन पैसे मिळवण्यासाठी बाहेर पडावे लागले. सन २००१ ते २०११ पर्यंत दुकानात काम करून ते घरी हातभार लावू लागले. खडतर कष्टाचे दिवस असे सुरू होतेच. दरम्यान आजीचंही निधन झालं. शेतीकामे विस्कळित होऊ लागली. मग २०११ च्या दरम्यान किरण यांनी पूर्णवेळ शेतीच करण्याचा निर्णय घेतला. तसं पाहिलं तर माझी शेती दोन एकर त्यापैकी ३० गुंठ्यात केळी. तर उर्वरित क्षेत्रात ८६०३२ या जातीचा ऊस आहे. द्राक्षातून पीकबदल शेजारी कुंडल गाव आहे. या परिसरात द्राक्षशेती होते. उत्पन्नही चांगले होते. थेट बांधावरून द्राक्षांची खरेदी होते. आपणही द्राक्षाची लागवड केली तर नक्कीच फायदा होईल असे किरण यांच्या मनात आले. मग आजोबांनी लावलेली केळीची शेती काढून द्राक्षबाग लागवण्याचा निर्णय घेतला. पण अभ्यास कमी पडला. लागवड केली खरी, पण मनुष्यबळ अधिक लागू लागले. खर्चही वाढू लागला. अखेर द्राक्ष शेती थांबवण्याशिवाय पर्याय उरला नाही. किरण खचले. पुढे काय करायचे असा प्रश्‍न निर्माण झाला. पुन्हा केळीच बरी आजोबांनी लावलेल्या झाडांची फळे गोड असतात असे म्हटले जाते. याचा प्रत्यय किरण यांना आला. ते म्हणाले की आजोबा आणि आजी यांच्यासोबत शेतात जाऊन केळीशेतीतील विविध गोष्टींचा अभ्यास झाला होता. काढणी, पिकवणी, विक्री ही कामेही केली होती. पुन्हा मग देशी केळीकडेच मन ओढा घेऊ लागले. रोपे कुठे मिळतात याचा शोध सुरू केला. त्यानुसार शिवणी (ता. कडेगाव) येथून ४० रुपयांना एक याप्रमाणे रोपे आणली. त्यानंतर जी लागवड केली ती आजगायत सुरू आहे. सध्या ३० गुंठेच क्षेत्र आहे. येत्या काळात ते वाढवण्याचा विचार आहे. आई श्रीमती मंगल, पत्नी स्वाती, मुगला विराज आणि श्रीराज असं किरण यांचं छोटं आणि समाधानी कुटुंब आहे. शेतीत सर्वांची साथ मिळते. उसापेक्षा किफायतशीर किरण यांनी अन्य क्षेत्रात ऊस घेतला आहे. या पिकात वर्षभर कष्ट करायचे. पैसे त्यानंतर मिळतात. केळीचं पीकही वर्षभराचं असलं तरी ते ग्राहकांकडून त्याला सतत मागणी असते. शिवाय हे देशी वाण असल्याने ते दोन ते तीन वर्षांनी काढून पुन्हा नवी लागवड करण्याचीही गरज नसते. शिवाय वादळवाऱ्यातही ती बऱ्यापैकी टिकून राहते. सध्या उत्पादन देणारी बाग चार वर्षांपूर्वीची असल्याचे किरण यांनी सांगितले. प्रति झाडाला २० ते २५ किलो वजनाचा घड मिळतो. हे पीक वर्षाकाठी खर्च वजा जाता एक लाख ते दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न देते. या केळीला लहान पिले आपोआपच येतात. आर्थिक उत्पन्नात भर पडण्यासाठी त्यांची विक्री ५० रुपयांना प्रति नग या दराने केली आहे. विक्री व्यवस्था परिसरातील पलूस, किर्लोस्करवाडी, कुंडल, ताकारी आणि देवराष्ट्रे या गावांत आठवडे बाजार भरतात. प्रत्येक दिवशीच्या बाजारात जाऊन तेथे थेट विक्री केली जाते. मोटरसायकलवरून क्रेटद्वारे केळी बाजाराच्या ठिकाणी आणली जातात. त्यास आकार व प्रतिनुसार प्रति डझन ४०, ५० ते ६० रुपये दर मिळतो. प्रत्येक बाजारात सरासरी ५० डझनांपर्यंत विक्री होते. ग्राहक टिकविले किरण सांगतात की, वर्षभर मी ग्राहक टिकवले आहेत. बाजारात मी केळी घेऊन येण्याची त्यांना प्रतीक्षा असते. परिपक्व झाल्यानंतरच घडांची काढणी होते. त्यामुळे त्यांच्यात नैसर्गिक गोडवा उतरतो. त्यामुळेच ग्राहकांकडून त्यास सतत मागणी असते. वर्षभरातील सण, समारंभ किंवा अन्य कोणत्याही दिवशी मी दर कधीही वाढवत नाही. वर्षभर साधारण दर एकच ठेवतो. त्यामुळे ग्राहकांची संख्या अधिक आहे. व्यवस्थापनातील ठळक बाबी

  • तीस गुंठ्यात सुमारे २०० झाडे आहेत.
  • पीक फेरपालट करण्यावर भर करतो. त्यामुळे जमिनीचा पोत समतोल राहण्यास मदत.
  • मातीपरीक्षण वर्षातून एकदा होते.
  • प्रति झाडास १० किलो शेणखत.
  • प्रत्येकी अर्ध्या क्षेत्रात पाटपाणी व ठिबक सिंचनचा वापर.
  • उसाचा पाला तसेच केळीचा वाळलेला पाला शेतातच मल्चिंग म्हणून वापरण्यात येतो. यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. वाफसा राहण्यास मदत होते.
  • ७० टक्के सेंद्रिय खतांचा वापर.
  • संपर्क- किरण बबन लाड- ९९६०४९४९३१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

    Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

    Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

    Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

    Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

    SCROLL FOR NEXT