वाफे करून विविध पालेभाज्यांची लागवड.
वाफे करून विविध पालेभाज्यांची लागवड.  
यशोगाथा

जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेती

Amol kutte

मांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले यांनी नोकरी सांभाळत वडिलोपार्जित शेतीमध्ये सुधारणा केली. दर शनिवार, रविवार बोरीऐंदी (ता. दौंड) येथील शेतीमध्ये घुले बंधू रमतात. नैसर्गिक शेती पद्धतीवर त्यांचा भर आहे. शेतकरी गट तयार करून थेट ग्राहकांना घरपोच भाजीपाला पुरविण्यात घुले बंधू यशस्वी झाले आहेत.  

पुणे शहरात माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये माधव आणि सचिन घुले नोकरी करतात. घुले बंधूंची मांजरी (ता. हवेली) येथे वडिलोपार्जित अर्धा एकर शेती आहे. सुरवातीच्या काळात शिक्षणामुळे त्यांना प्रत्यक्ष शेतीमध्ये काम करता आले नाही. मात्र पुढे जसा वेळ मिळेल त्यानुसार त्यांनी शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. १९८५ मध्ये त्यांच्या वडिलांनी बोरीऐंदी (ता. दौंड) येथे दहा एकर शेती खरेदी केली. सुटीच्या दिवशी घुले बंधू शेतीवर वडिलांना मदतीसाठी जायचे. त्या वेळी भाजीपाला, ऊस लागवडीवर भर होता. स्वत:च्या शिक्षणाचा खर्च, तसेच आई-वडिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी माधव आणि सचिन यांनी मांजरी येथील अर्धा एकर शेतीमध्ये अडीचशे कोंबड्या आणि दहा शेळ्यांचे संगोपन सुरू केले. १९९८ मध्ये नोकरी सुरू झाल्यानंतर घुले बंधूंनी बोरीऐंदी येथील शेती वाट्याने करायला दिली. त्यामुळे सुमारे सहा वर्षे शेतीशी संपर्क कमी झाला होता. गेल्या वर्षी नातेवाइकांच्या ओळखीतून घुले बंधूंनी नोकरीचे उत्पन्न आणि बॅंकेतून कर्ज घेऊन कवठे (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथे दहा एकर शेती विकत घेतली. तेथे सहा एकर ऊस, एक एकर कांदा, तीन एकर गहू लागवड केली आहे. शेतीच्या दैनंदिन नियोजनासाठी कायमस्वरूपी मजूर ठेवले आहेत. जमीन सुपीकतेवर दिला भर   शेती व्यवस्थापनाबाबत माधव घुले म्हणाले की, पूर्वी पारंपरिक पद्धतीने पीक लागवड आणि रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर होता. २०१४ मध्ये डॉ. प्रकाश जाधव यांच्याकडून नैसर्गिक शेतीची माहिती मिळाली. या पद्धतीने आम्ही बोरीऐंदी येथील शेतीमध्ये खपली गहू, भुईमूग, तूर, मूग, चवळी, शेवगा, कांदा आदी पिकांच्या देशी जातींची लागवड सुरू केली. पूर्वी रासायनिक खते, कीडनाशकांसाठी खर्च भरपूर व्हायचा, त्यामानाने उत्पन्न कमी यायचे. पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांशी चर्चा करताना नैसर्गिक शेतीतंत्राची माहिती मिळाली. या शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देऊन तंत्र समजावून घेत पीक लागवडीस सुरवात केली. सध्या विहीर, कूपनलिकेतून पिकाच्या गरजेनुसार ठिबक, तुषार सिंचन आणि पाटपाणी दिले जाते. सध्या पाच एकर क्षेत्र बागायती असून, उर्वरित क्षेत्रामध्ये पावसाच्या पाण्यावर चारा, भुईमूग आणि कडधान्य पिकांची लागवड असते. दैनंदिन शेती व्यवस्थापनासाठी एक मजूर जोडपे ठेवले आहे. दर शनिवार, रविवार आम्ही दोघे बंधू बोरीऐंदी आणि कवठे येथे जाऊन मजुरांच्या समवेत चर्चा करून पुढील आठवड्याचे नियोजन करतो. घुले यांनी जमिनीची सुपीकता जपण्यावर भर दिला आहे. देशी गाईचे शेण, गोमूत्र, गूळ, बेसनपीठ यांचा वापर करून द्रव जीवामृत आणि घनजीवामृत तयार करून पिकांसाठी वापरले जाते. कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते. पूर्वी दरवर्षी एकरी रासायनिक खते, कीडनाशकांसाठी पंधरा हजारांचा खर्च व्हायचा, तो आता थांबला आहे. अत्यंत कमी खर्चात जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क घरीच तयार केला जातो. जमीन सुपीक झाल्याने पीक उत्पादन आणि गुणवत्तादेखील सुधारली. व्यवसायाप्रमाणे शेतीचे नियोजन त्यांनी ठेवले आहे.  

पीक नियोजन

ऊस 

  •  एक एकर क्षेत्र. पट्टा पद्धतीने को-८६०३२ जातीची लागवड.
  •  घन जीवामृताचा वापर, पाचट आच्छादन. दर १५ दिवसांनी ठिबक सिंचनातून जीवामृताचा वापर.
  •  एकरी ६० टन उत्पादन. दोन टन रसायनविरहित गूळ आणि ४०० लिटर काकवीनिर्मिती. गूळ ८० रुपये किलो, काकवी १०० रुपये प्रतिलिटर दराने थेट ग्राहकांना विक्री. खर्च वजा जाता सरासरी एक लाखांचे उत्पन्न.
  • भाजीपाला   कांदा 

  •  दीड एकर क्षेत्र. घनजीवामृताचा जास्तीत जास्त वापर. पाटपाण्यातून जीवामृताची मात्रा.
  •  गरजेनुसार दशपर्णी अर्काची फवारणी.
  • पालेभाज्या, फळभाज्या 

  •  दीड एकर क्षेत्र. वर्षभर पालेभाज्या, फळभाज्यांचे नियोजन. मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर, वांगी, मिरची, करडई, चवळी, बीट, मुळा, भोपळा, दोडका, घोसाळे, टोमॅटो, शेवगा, काकडी, कलिंगड, स्वीट कॉर्न, तूर, कोबी, फ्लाॅवर लागवड. सापळा पीक म्हणून झेंडू लागवड.
  •  दीड एकराचे टप्पे करून, पाच आठवड्यांचे नियोजन. दर आठवड्याला भाजीपाला उत्पादन.  एका टप्प्यातील पालेभाजी संपली की पुढचा टप्प्यातील भाजी काढणीस सुरवात. जो टप्पा काढून होईल, तेथे नवीन भाजीपाला लागवड. 
  •  लागवडीच्यावेळी घनजीवामृत, पाटपाण्याबरोबरीने जीवामृताचा वापर. गरजेनुसार दशपर्णी अर्काची फवारणी.
  •  दर आठवड्याला पालेभाज्यांच्या सहाशे गड्ड्या उत्पादन. फळभाज्यांच्या उत्पादनानुसार विक्रीचे नियोजन. पालेभाज्यांची जागेवर १० रुपये गड्डी आणि फळभाज्यांची ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री. भाजीपाला विक्रीतून खर्च वजा जाता वर्षभरात दीड लाखाचे उत्पन्न.
  • बांधावर फळझाडे 

  •  शेतीबांधावर नारळ, चिकू, आंबा, सीताफळ झाडांची लागवड. 
  •  उत्पादित फळे घरी खाण्यासाठी ठेवली जातात.
  • पोल्ट्री व्यवसाय

    बोरीऐंदी येथील शेतीमध्ये घुले बंधूंनी २००५ मध्ये पोल्ट्री उभारून करार पद्धतीने नियोजन केले. शेतीमध्ये पीकनियोजन सुरू केल्यानंतर घुले यांनी पोल्ट्री भाडेतत्त्वावर दिली. यातून दरवर्षी दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.

    देशी गाईंचे संगोपन  घुले बंधूंनी बोरी ऐंदी येथे खिलार गाय, एक बैल, कालवड, कवठे येथे खिलार आणि कालवड आणि मांजरी येथे लाल कंधारी गाय, एक गोऱ्हा आणि कालवड अशा एकूण आठ देशी जनावरांचे संगोपन केले आहे. शेण आणि गोमूत्रापासून जीवामृत तयार केले जाते. गाईंपासून मिळणारे दूध कुटुंबासाठी ठेवले जाते. जास्तीच्या दुधाची ८० रुपये लिटर दराने मांजरीमधील दोन कुटुंबांना विक्री होते.

    थेट ग्राहकांना विक्री  नैसर्गिक पद्धतीने उत्पादित शेतमालास योग्य दर मिळण्यासाठी घुले बंधूंनी पुणे शहरातील सोसायटीमध्ये जाऊन जनजागृती केली. २०० ग्राहकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून मागणीनुसार आठवड्यातून एकदा थेट घरपोच भाजीपाला पुरविला जातो. गटात नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला उत्पादन करणारे दहा शेतकरी सामील झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना वर्षभर विविध प्रकारचा भाजीपाला पुरविला जातो. काही प्रमाणात भाजी विक्रते थेट शेतावरून भाजीपाला घेऊन जातात. 

    - माधव घुले, ९९७५४४४२२२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

    Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

    Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

    Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

    Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

    SCROLL FOR NEXT