Monsoon News  Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सूनच्या परतीचा मुहूर्त यंदाही लांबणार

Monsoon Return Journey : मॉन्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्‍चित करण्यात आली आहे.

Team Agrowon

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाचा मुहूर्त यंदा देखील लांबणार आहे. राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तराखंड राज्यांत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच असून, वायव्य भारतातून मॉन्सूनच्या परतीसाठी अद्यापही पोषक स्थिती नाही. वायव्य भारतात पावसाने उघडीप दिल्यानंतर मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. गतवर्षी २० सप्टेंबर रोजी मॉन्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते.

वायव्य भारतात पावसाने सलग पाच दिवस उघडीप देणे. आर्द्रतेची टक्केवारी कमी होऊन कोरडे हवामान होणे, वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच परिसरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केंद्रभागातून बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी क्षेत्रे (ॲण्टी सायक्लोन) तयार होणे आवश्यक असते. त्यानंतरच या भागातून मॉन्सून परतल्याचे जाहीर करण्यात येते.

मॉन्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्‍चित करण्यात आली आहे.

मात्र सध्या राजस्थानसह वायव्य भारतातील राज्यांत हलक्या स्वरूपात पाऊस सुरू आहे. तसेच या भागात पाऊस सुरू राहण्यासाठी पोषक प्रणाली तयार होत असल्याने मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यास आणखी उशीर होण्याची शक्यता आहे.

गतवर्षी २० सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. माघारी फिरल्यानंतर मॉन्सूनच्या परतीची वाटचाल अडखळली. महाराष्ट्रातून मॉन्सूनची परतीची वाटचाल सुरू होण्यास १४ ऑक्टोबरचा दिवस उजाडावा लागला. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी मॉन्सून वारे संपूर्ण देशातून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते.

दरम्यान, यंदाच्या हंगामात मॉन्सूनचे केरळमधील आगमन ८ जूनपर्यंत लांबले. तळ कोकणात ११ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने राज्यातील प्रगतीसाठी वाट पाहावी लागली. २३ जून रोजी राज्यातील पुढील वाटचाल सुरू केलेल्या वाऱ्यांनी दोनच दिवसांत (२५ जून) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर नियमित सर्वसाधारण वेळेच्या ६ दिवस आधीच म्हणजेच २ जुलै रोजी मॉन्सून संपूर्ण देशभरात पोहोचला होता.

वायव्य भारतातून मॉन्सूनच्या परतीची वाटचाल

वर्ष---तारीख

२०१८---२९ सप्टेंबर

२०१९---९ ऑक्टोबर

२०२०---२८ सप्टेंबर

२०२१---६ ऑक्टोबर

२०२२---२० सप्टेंबर

राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हरियाना राज्यांत अद्यापही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. वायव्य भारतात पावसाने पूर्णपणे उघडीप दिलेली नसून, आर्द्रता कमी झालेली नाही. पावसाला पोषक हवामान असल्याने वायव्य भारतातून मॉन्सूनच्या परतीचे कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
- माणिकराव खुळे, निवृत्त हवामान तज्ज्ञ, हवामान विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT