Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Rain : जुलैमध्ये महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत

Team Agrowon

Pune News : जून महिन्यात पावसाने मोठी दडी मारल्यानंतर जुलैमध्ये शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. जुलैमध्ये पाऊस सरासरी गाठण्याची शक्यता आहे. देशात जुलैमध्ये ९४ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या महिन्यात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत असून राज्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

जुलैमधील पावसाचा अंदाज शुक्रवारी (ता. ३०) हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला. डॉ. महापात्रा म्हणाले, ‘‘जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. जूनमध्ये देशात सरासरी १६५ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा जूनअखेर सरासरी १४८.६ मिलिमीटर म्हणजेच ९० टक्के पाऊस झाला आहे.

मध्य भारतासह लगतच्या दक्षिण द्वीपकल्प, पूर्व भारतात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर वायव्य भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. १९७१ ते २०२० या कालावधीतील नोंदीनुसार जूलै महिन्यात देशात २८०.४ मिलिमीटर पाऊस पडतो.

जुलै महिन्यात वायव्य भारताचा उत्तरेकडील भाग आणि दक्षिण द्वीपकल्पाचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तर वायव्य भारताच्या उत्तरेकडील भाग वगळता देशभरात किमान तापमान देखील सरासरीच्या वरच राहील.

‘एल-निनो’ होतोय विकसित

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात सध्या ‘एल-निनो’ स्थिती विकसित होत आहे. मॉन्सूनच्या हंगामाच्या मध्यावर ‘एल-निनो’ स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहे. ही स्थिती मार्चपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. हिंद महासागरात सर्वसाधारण इंडियन ओशन डायपोल (आयओडी) स्थिती आहे. उर्वरित मॉन्सून हंगामात धन (पॉझिटिव्ह) आयओडी स्थिती तयार होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

जुलै महिन्यात यंदा महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. जून महिन्यात मोठी दडी मारल्यानंतर जुलै महिन्यातील चांगल्या पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरेल.

‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनवर परिणाम झाला. यातच पावसासाठी आवश्यक असलेला पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा जूनच्या शेवटच्या आठवड्यात तयार झाला. जूनमध्ये २५ तारखेनंतर महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवर पाऊस झाला. त्यामुळे पावसाची तूट भरून निघण्यास मदत झाली. जुलैमध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
- डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, हवामान विभाग.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT