Turmeric Agrowon
संपादकीय

Turmeric Production : हळद रुसली...

Turmeric Farming : हळदीचे क्षेत्र आणि उत्पादन घटीचे कारण केवळ कमी पाऊसमान हे एकमेव नाही, तर इतरही अनेक कारणे त्यास जबाबदार आहेत.

विजय सुकळकर

Turmeric Farming : देशात हळदीचा हंगाम सुरू झाला आहे. सध्या महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून स्थानिक हळद बाजारात विक्रीस येत आहे. हळदीसाठी प्रसिद्ध असलेल्या सांगलीच्या बाजारपेठेत आठवडाभरापूर्वी नव्या हळदीला सरासरी १५ हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. हळदीला हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला दर मिळतो.

त्यानंतर मात्र दरात घसरण सुरू होते. विदर्भ, मराठवाड्यातील हळद बाजारात थोडी उशिरा (मार्च-एप्रिलमध्ये) येते. त्या वेळी दर मात्र पडलेले असतात. हळदीला फार तर पावसाळ्यापर्यंत शेतकरी साठवून ठेवतात. त्यानंतर मात्र साठवणुकीसाठी जागेची अडचणी, पैशाची नड आणि हळदीला कीडही लागत असल्याने शेतकरी हळद विकणे पसंत करतात.

मराठवाडा, विदर्भातील बहुतांश हळद उत्पादकांना चार ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल असा कमीच दर मिळतो. मागील हंगामात पावसाला झालेला विलंब, पीक ऐन वाढीच्या अवस्थेत पडलेला पावसाचा खंड याचा फटका देशभर हळदीला बसला आहे. या वर्षी हळदीचे लागवड क्षेत्र घटून उत्पादनही कमी येण्याची शक्यता भारताच्या मसाला मंडळाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

देशात साडेसात हजार हेक्टरने क्षेत्र तर जवळपास ५२ हजार टनांनी हळदीचे उत्पादन घटीचा अंदाज आहे. महाराष्ट्र, तेलंगणा या दोन राज्यांत सर्वाधिक लागवड क्षेत्र घट दाखविते. हळदीचे क्षेत्र आणि उत्पादन घटीचे कारण केवळ कमी पाऊसमान हे एकमेव नाही, तर इतरही अनेक कारणे त्यास जबाबदार आहेत.

इतर हंगामी पिकांच्या तुलनेत हळदीचे नैसर्गिक आपत्तीत नुकसान कमी होते. यावर कीड-रोगांचा प्रादुर्भावही कमीच आढळून येतो. हळदीची लागवड आणि काढणी या दोन्हीसाठी शेतकऱ्यांना खूप वेळ मिळतो. हळदीला कोणताही जंगली प्राणी नुकसान करीत नाही. बऱ्यापैकी उत्पादन आणि चांगला दर अशा काही कारणांमुळे मागील दशकभरात मराठवाडा, विदर्भात हळदीची लागवड वाढली आहे.

या भागात मुळात पर्यायी पिके कमी उपलब्ध आहेत. त्यात शेतकऱ्यांच्या पुढाकाराने हळदीसारखे एक चांगले पीक त्यांना मिळाले असताना सातत्याने मिळणाऱ्या कमी दरामुळे देखील शेतकरी हळदीचा पेरा कमी करीत असतील, तर ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजेत. महाराष्ट्रात सेलम अथवा वायगांव अशा दोन जातींचीच प्रामुख्याने लागवड होते.

सेलम आणि वायगाव पेक्षा कमी कालावधीच्या, अधिक उत्पादनक्षम आणि कुरकुमीनचे प्रमाणही जास्तीचे असलेल्या जाती देशात आहेत. अशावेळी या परिसरात उत्तम येणाऱ्या इतर जातींवर संशोधन व्हायला पाहिजेत. भेसळयुक्त बेणे ही पण हळद लागवडीतील समस्या असताना दर्जेदार बेणे सर्व शेतकऱ्यांना मिळायला हवे.

हळदीमध्ये प्रगत लागवड तंत्राचा अवलंब सर्व शेतकऱ्यांनी करायला हवा. यातून खर्चात बचत होऊन उत्पादन वाढीस हातभार लागेल. हळद काढणी, गोळा करणे यासाठी उत्पादकांना यंत्रे-अवजारे उपलब्ध झाले पाहिजेत. हळद शिजविण्यासाठी कुकर आले, वाफेवरही हळद शिजविल्या जाते. आता यापुढे जाऊन कच्च्या हळदीवरच प्रक्रियेचे तंत्र आपल्या देशांतील शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजे.

कच्ची हळद न शिजविता ड्रायरमध्ये वाळविल्यानंतर त्याचे तुकडे करून अथवा तशाच हळदीवर प्रक्रिया करता येते. यामध्ये कुरकुमीनचे प्रमाण पण अधिक राखले जाते. आजही हळदीच्या जगभराच्या व्यापारात भारत आपलं अव्वल स्थान टिकवून आहे. आपला बहुतांश व्यापार हा कच्च्या हळकुंडाचा आहे.

हळदीचा पक्का माल तयार करणे, क्रीम, खाद्यान्ने व औषधी उत्पादने तयार करणे यात उत्पन्नवाढीची मोठी संधी आहे. त्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी पुढे यावे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी हळदीच्या मूल्यवर्धनाकडे लक्ष केंद्रित करायला हवे. असे झाल्यास उत्पादकांना हळद किफायतशीर ठरेल. हळदीच्या प्रक्रिया उद्योगातून ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT