Ethanol Production Agrowon
संपादकीय

Ethanol Production : फूड अन् फ्युएल समतोल हवा

विजय सुकळकर

Ethanol Year : यंदाच्या इथेनॉल वर्षासाठी तेल कंपन्यांनी इथेनॉल उत्पादकांकडून गरजेपेक्षा अधिक इथेनॉलची मागणी नोंदविली आहे. आपल्याला यंदाच्या हंगामासाठी ९१६ कोटी लिटर इथेनॉलची गरज असताना मागणी मात्र ९७० कोटी लिटरची नोंदविण्यात आली आहे. यावर्षीची अजून एक चांगली बाब म्हणजे तेल कंपन्यांनी ऊस व उपउत्पादनांपासून तयार होणाऱ्या इथेनॉलपेक्षा धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला अधिक पसंती दिली आहे.

एकूण ९७० कोटी लिटर इथेनॉलपैकी ३९१ कोटी लिटरची मागणी उसावर आधारीत इथेनॉलची तर ५७९ कोटी लिटर इथेनॉलची मागणी धान्यापासून बनविलेल्या इथेनॉलची आहे. यावर्षीचे चांगले पाऊसमान आणि इथेनॉल निर्मितीवर कोणतीही बंधने नसल्यामुळे इथेनॉल उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तविली जातेय. साखरेला योग्य दर मिळण्यासाठी अतिरिक्त साखरेपासून इथेनॉल निर्मिती झाली पाहिजेत, असे साखर उद्योगालाही वाटते.

२०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट १०१६ कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे. भारताची इथेनॉल उत्पादनक्षमता १६४८ कोटी लिटरची असली तरी प्रत्यक्ष मात्र त्यापेक्षा कमी (९०० ते १००० कोटी लिटर) उत्पादन होते. सध्या आपण पेट्रोलमध्ये १२ ते १३ टक्के इथेनॉल मिश्रणापर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्तीसाठी आपल्याला इथेनॉल उत्पादन वाढवावेच लागेल. पेट्रोल मिश्रणाशिवाय इतर औद्योगिक वापरासाठी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात इथेनॉल लागते.

इथेनॉल हे पर्यावरणपूरक असल्याने याकडे भविष्यातील इंधन म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळेच पाच टक्के इथेनॉल हे डिझेलमध्ये सुद्धा मिसळता येईल का, याचीही चाचपणी देशात सुरू आहे. डिझेलचा वार्षिक खप पेट्रोलच्या जवळपास तिप्पट आहे. पेट्रोलचा वार्षिक खप ३९०० कोटी लिटर आहे, तर डिझेलचा वार्षिक खप जवळपास ९००० कोटी लिटरचा आहे. डिझेलमध्ये पाच टक्के इथेनॉल जरी आपण मिसळू शकलो तर अतिरिक्त ५०० कोटी लिटर इथेनॉल आपल्याला लागेल.

शिवाय पेट्रोमध्ये देखील २० टक्क्यांऐवजी २५ टक्के इथेनॉल मिश्रण करता येईल का, याबाबतही देशात प्रयोग सुरू आहेत. त्याचेही निष्कर्ष चांगले येत आहेत. इथेनॉलबाबत अजूनही एक सकारात्मक बाब म्हणजे ‘जी-२०’ दरम्यान अमेरिका, भारत, ब्राझील मिळून ‘ग्लोबल बायोफ्युएल अलायंस’ स्थापन करण्यात असून त्याचे मुख्यालय भारतातच झाले आहे. जगभरातील अनेक छोटे छोटे देश या अलायंसचे सभासद होत आहेत.

अशावेळी या लहान लहान देशांना इथेनॉल पुरवठा करण्यासाठी संधी देखील भारताकडे आहे. हे सर्व पाहता भविष्यात देशविदेशांतून इथेनॉलची मागणी वाढणार आहे. आणि उसापासून इथेनॉल निर्मितीवर आपल्याला बऱ्याच मर्यादा आहेत. अशावेळी उसाशिवाय मका खराब धान्य तसेच शेतातील टाकाऊ पदार्थ यापासून इथेनॉल निर्मितीवर भर द्यावाच लागणार आहे.

इथेनॉल निर्मिती क्षमतावाढीसाठी केंद्र सरकार स्तरावर प्रयत्न चालू असताना प्रत्यक्षात त्याला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचे क्षेत्र वाढविणे, अनुदानित तांदळाचा वापर करण्यास परवानगी देणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु मागील दीड-दोन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध, वाढत्या नैसर्गिक आपत्ती यामुळे भारतासह जगभर अन्नसुरक्षेचा देखील विषय ऐरणीवर आला आहे.

‘फूड की फ्युएल’ कशाला अधिक महत्त्व द्यायचे, असा जागतिक पातळीवर चर्चेचा सुरू दिसून येतो. धान्याचा मानवाला खाण्यासाठी तर खराब धान्याचा पशु-पक्ष्यांच्या खाद्यात वापर होतो. अशावेळी ‘फूड अन् फ्युएल’ यातही समतोल साधावा लागेल. त्यामुळे पीक अवशेषांसह शेतीतील टाकाऊ पदार्थ, तसेच इतरही इथेनॉलचे स्रोत शोधून त्यापासून आपल्याला इथेनॉल उत्पादन करावे लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paus Andaj : राज्यात ३ दिवस पावसाचे वातावरण; अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Rabi Season 2024 : यंदा साडेतीन लाख हेक्टरवर रब्बीचे बुलडाण्यात नियोजन

Land Dispute : गावकऱ्यांचा डाव

Cattle Census App : तांत्रिक अडचणीत अडकलेल्या पशुगणनेची अखेर तारीख ठरली

Labor Shortage : पावसामुळे शेतकऱ्यांची घालमेल वाढली

SCROLL FOR NEXT