sampadkiya
sampadkiya 
संपादकीय

पक्षी जाय दिगंतरा

विजय सुकळकर
अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यात करण्यात आलेल्या पक्षिगणनेत सव्वाशेहून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या आहेत. पक्ष्यांच्या या नोंदी अनेक अंगांनी महत्त्वपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण आणि उत्साहवर्धक असल्याचे या उपक्रमात सहभागी पक्षी अभ्यासक सांगतात. पक्षी म्हणजे पिकविलेल्या धान्यावर डल्ला मारणारे, एवढेच आपल्या डोळ्यासमोर येते, परंतु अनेक पक्षी नैसर्गिकरीत्या कीडनियंत्रण आणि पिकाला नुकसानकारक सरपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम करतात. काही पक्षी शेतातील धान्य खात नाहीत, तर पिकांची काढणी झाल्यावर जमिनीवर पडलेले धान्यच खातात. अशाप्रकारे पक्षी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत करून उत्पादनवाढीसाठी हातभारच लावतात. पक्ष्यांचे महत्त्व एवढ्यावरच सीमित नाही, तर ते एका निरोगी परिसंस्थेचे द्योतक आहे. काटेपूर्णा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात पक्षी प्रजाती आढळल्या, त्याचे कारण म्हणजे येथे वृक्षराजी मोठ्या प्रमाणात अाहे, परंतु राज्याचा विचार केल्यास अनेक पक्षी प्रजाती नामशेष झाल्या आहेत, तर संकटग्रस्त सुचित समाविष्ट केल्या गेलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींची संख्याही ५० हून अधिक आहे. पक्ष्यांशिवाय निसर्गचक्र चालू शकत नाही. त्यामुळे पक्षी जर त्यांच्या अधिवासातून नष्ट होत असतील, तर निसर्गचक्रात काहीतरी बिघाड झाला, असेच समजावे. पक्षी प्रजाती नष्ट होण्याची अनेक कारणे आहेत. जलाशये, पाणथळ जागा, झाडेझुडपे-गवताची वने यांत प्रामुख्याने पक्ष्यांचा अधिवास आढळतो, परंतु बदलत्या हवामान काळात वाढत्या नैसर्गिक आपत्ती आणि मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांचे स्थानिक, नैसर्गिक अधिवासच नष्ट होत आहेत. अधिवास नष्ट झाला म्हणजे तेथे खाद्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे तेथील स्थानिक पक्षी कमी होतात. शेतात कीडनाशकांच्या वाढत्या वापरानेसुद्धा पक्षीसंख्या घटत चालली आहे. राज्यात पक्ष्यांच्या शिकारीचे प्रमाणही अधिक आहे. शेती वाचवून निसर्गचक्राचे संतुलन राखण्यासाठी पक्ष्यांचे संवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, हे लक्षात घ्यायला हवे. पूर्वीची कृषिप्रणाली ही पूर्णतः निसर्गाशी जुळवून घेणारी होती. त्यात हळूहळू बदल होत ती निसर्गाशी तुटत गेली. त्याचे दुष्परिणाम आता आपल्याला जाणवत आहेत. चीनने लाखो चिमण्यांची कत्तल केल्यामुळे त्यांचे शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात घटून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. शेवटी त्यांना रशियातून चिमण्यांची आयात करावी लागली. आपल्याकडेही पक्षी वाचले तरच शेती आणि निसर्ग वाचेल, असा विचार रुजायला हवा. पक्ष्यांना वाचविण्यासाठी त्यांचे स्थानिक अधिवास वाचविले पाहिजेत. शेतीमध्ये कीडनाशकांचा वापर अत्यंत मर्यादेत व्हायला हवा. शेतीत मिश्रपीक पद्धती, सेंद्रिय-नैसर्गिक शेती अशा शाश्वत पद्धतीस प्रोत्साहन द्यायला हवे. दुर्मिळ, संकटग्रस्त पक्षी प्रजातींची शिकार पूर्णपणे थांबायला हवी. जेथे मुबलक जैवविविधता आहे, तेथेच जगण्यातील खरा आनंद आहे, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे पशुपक्षी, कीटक, झाडेझुडपे, गवत, वनस्पती यांचे संवर्धन करून आपल्या जगण्यात आनंदाची भर घालूया.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT