पुणे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक मनुका निर्मितीवर भर देत आहेत
पुणे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक मनुका निर्मितीवर भर देत आहेत 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचा मनुका निर्मितीवर भर

टीम अॅग्रोवन

पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाउन केले असून यामुळे द्राक्ष उत्पादक अडचणीत आले आहेत. बाजारात द्राक्षांना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. अधिक नुकसान नको यासाठी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी द्राक्षांपासून बेदाणा, मनुका निर्मितीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी पुढाकार घेतला आहे.

पुणे जिल्ह्यात सुमारे पाच ते सहा हजार एकरांवर द्राक्षाचे क्षेत्र आहे. जुन्नर आणि आंबेगाव हे तालुके द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहे. याशिवाय जिल्ह्याच्या पूर्वेकडील इंदापूर, बारामती, दौंड आणि शिरूर तालुक्यातही अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. आंबेगाव तालुक्यातील कळंब, चांडोली बुद्रूक, लौकी भागात सुमारे शंभर एकरांहून अधिक क्षेत्रावर द्राक्ष पीक आहे. या भागातील द्राक्षांची बांगलादेश, श्रीलंका, रशिया, आॅस्ट्रेलिया, युरोप, इंग्लंड आदी देशात निर्यात होते.  

यंदा साधारणपणे १० आॅक्टोबर ते २० मार्चपर्यंत द्राक्ष हंगाम सुरळीत सुरू होता. परंतु, त्यानंतर ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाउन केल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या विक्रीक्षम द्राक्ष बागांवर परिणाम झाला आहे. निर्यात तसेच स्थानिक बाजारपेठेत लॉकडाउनमुळे द्राक्षांची विक्री होत नसल्याने अनेक द्राक्ष उत्पादकांनी मनुका बनविण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसून येते.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, इंदापूर, दौंड आणि बारामती या भागातील सुमारे दोन ते तीन हजार एकर क्षेत्रातील द्राक्षांची निर्यात केली जाते. एकरी सरासरी ८ ते १२ टन द्राक्ष उत्पादन मिळते. या द्राक्षांना प्रतवारीनुसार सरासरी १२० ते १३० रुपये दर मिळतो. मात्र, लॉकडाउन आणि अवकाळी पावसामुळे निर्यातक्षम द्राक्षांचा बाजार थंडावला आहे. त्याचा फटका निर्यातदारांना बसला आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा द्राक्षातून साधारणपणे तीन ते चार कोटींचे परकीय चलन अपेक्षित होते. परंतु, सद्यःस्थिती पाहता यावर पाणी फिरले आहे. ‘कोरोना’मुळे हा बाजार अडचणीत आल्याने मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.  

प्रतिक्रिया

मी दरवर्षी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतो. दरवर्षी दोन एकर बागेतून मला बारा ते पंधरा लाख रूपये मिळतात. यंदा ‘कोरोना’मुळे द्राक्ष निर्यात झाली नाही. त्यातच वाहतूक बंद असल्यामुळे स्थानिक मार्केटलाही द्राक्षे विकता आली नाही. त्यामुळे मनुका बनवणे हा एकमेव पर्याय माझ्यासमोर असून सुमारे आठ ते दहा लाख रूपयांचे नुकसान यावर्षी झाले आहे. - रमेश नामदेव मेहेर, द्राक्ष बागायतदार, गोळेगाव, ता. जुन्नर.  

दरवर्षी जुन्नर व आंबेगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होते. यंदाही ज्या द्राक्ष बागांचे उत्पादन लवकर सुरू झाले होते, त्यांनी आपल्या द्राक्षांची निर्यात केली आहे. मात्र, उशीराने ज्या द्राक्षांचे उत्पादन निघाले, त्यांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात सुमारे चार ते पाच कोटींपर्यंत फटका बसला असण्याची शक्यता आहे. - राहुले घाडगे, विषय तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव.

पुणे जिल्ह्यात जवळपास पाच ते सहा हजार एकरांवर द्राक्षांचे क्षेत्र आहे. जुन्नर, आंबेगावमध्ये तीन ते चार हजार एकर क्षेत्र आहे. या भागात निर्यातक्षम द्राक्ष क्षेत्र अधिक आहे. यंदा शेवटच्या टप्प्यात निर्यात करणाऱ्या द्राक्ष उत्पादकांना ‘कोरोना’चा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी उपलब्ध द्राक्षांचे मनुका तयार करण्याचे ठरविले आहे.   -जितेंद्र बिडवई, अध्यक्ष, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT