बॅंक शाखेत पीक कर्ज, बोंड अळी नुकसान भरपाई, पीक विमा परतावा व इतर बॅंकींगच्या कामासाठी झालेली गर्दी.
बॅंक शाखेत पीक कर्ज, बोंड अळी नुकसान भरपाई, पीक विमा परतावा व इतर बॅंकींगच्या कामासाठी झालेली गर्दी. 
मुख्य बातम्या

थकली नजर अन्‌ पाय...

Santosh Munde

औरंगाबाद : घोषणा झाली, पण काय व्हतंय कुणास ठाऊक, कर्जमाफीचं गणित काही कळेना. आताशा कुठं गावात, बॅंकांच्या काही शाखांत याद्या लागल्यात. त्यात नाव शोधण्यानं केवळ नजरच थकली नाही, तर बॅंकेच्या शाखेत चकरा मारून पायबी थकलेत. पेरणी तोंडावर हाय, सोय नाही. पेरणीसाठी वेळेत पैसे मिळाले नाही तर खासगी सावकाराचे उंबरठे झिजविण्याशिवाय वा जमेल त्या पद्धतीने पेरणीची सोय लावण्याशिवाय पर्याय नाय, अशी व्यथा शेतकरी मांडत होते.  औरंगाबाद जिल्ह्यातील आडूळच्या एसबीआयच्या शाखेत बाजाराचा दिवस असलेल्या मंगळवारी (ता.१९) कर्जाचं काय ? या चौकशीसाठी आलेले अनेक शेतकरी त्यांच्या कर्जमाफीच्या व्यथा सांगत होते. 

कर्जमाफीचं चित्र स्पष्ट नाही, मागच्या वर्षी कर्ज उचल केलेल्यांकडील आधीची कर्जवसुली बाकी असल्यास त्यांना कर्जवाटप होईल कस? या प्रश्नाचं कोडं काही सुटेना. कर्जमाफीत प्रत्येक वेळी सुधारणांचे निघत असलेल्या आदेशामुळे न संपलेला घोळ, बॅंकांची कर्ज पुरवठ्यासंबंधी कायम अनास्थेची भूमिका यामुळे परवड वाढल्याचे शेतकरी सांगतात. अडूळच्या एसबीआय शाखेत जवळपास वीस टक्‍केच कर्जमाफीच्या खात्याचा विषय स्पष्ट झाला असल्याचं सूत्रांचे म्हणने आहे. फेब्रुवारीत बॅंक शाखेशी निगडित जवळपास अठराशे खाते त्रुटीत निघाली त्यांचा विषय क्‍लीअर नाही त्यामुळे कर्जमाफीचं चित्र क्‍लीअर होण्यात विलंब होतो आहे. बोंड अळी, विमा परताव्याचे पैसे आले की नाही हे विचारल्यापेक्षा बॅंक पासबुकवर एंट्री मारून घेऊन तपासण्याचे काम करताना शेतकरी दिसले.  महिनाभरापासून नाही व्यवस्थापक औरंगाबाद तालुक्‍यातील मोठ्या गावांपैकी एक असलेल्या अडूळ येथील एसबीआयच्या बॅंक शाखेशी पंचक्रोशीतील जवळपास तीस गावांतील शेतकऱ्यांचं अर्थकारण जुळलेलं. ऐन कर्जमाफीचा विषय ऐरणीवर असतानाच या बॅंक शाखेत जवळपास महिनाभरापासून शाखा व्यवस्थापकच नाही. चार लोकांवर बॅंकेचा व्यवहाराचा डोलारा चालत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकरी मागणी करताहेत, बॅंक व्यवस्थापनाकडेही शाखेमार्फत मनुष्यबळाच्या गरजेचा पाठपुरावा होतोय, पण त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील कधी हा प्रश्‍न सर्वांनाच पडला आहे. बॅंक शाखेकडे बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचे ३२८५ खातेधारकांचे आलेले जवळपास १ कोटी ८४ लाख रुपये खात्यांवर टाकण्याचे काम सुरू आहे.

प्रतिक्रिया अंगावरील ९९ हजार दोन वर्षांपासून थकीत असलेलं कर्ज माफ व्हावं म्हणून ऑनलाईन अर्ज भरला. पणं ना मेसेज आलां ना आपणं माफीत बसतो की नाही ते कळलं. इचारलं तं ते सांगत बी नाय.  - कचरू सखाराम ढाकणे, ब्राह्मणगाव, जि. औरंगाबाद. 

२०१३ मधील ९५ हजार कर्ज. ऑनलाईन अर्ज केला तो त्रुटीत निघाला. मागीतले ते कागदपत्र दिले. यादी लागलं म्हणतात. सात ते आठ वेळाच चकरा मारल्यात पणं त्रुटी दूर करण्याची प्रोसेस सुरू आहे यापलीकडे उत्तर मिळालं नाही.  - संभाजी रामचंद्र लेंडे, हिरापूर, जि. औरंगाबाद. 

२०१३ मधील थकीत १ लाख ५२ हजार कर्ज आहे. बॅंक शाखेसमोर लागलेल्या यादीत नाव सापडत नाही. वरचे पैसे भरायला तयार पणं स्पष्ट सांगितलं जात नाही. त्यामुळं काय करावं हे सुचंना.  - प्रल्हाद कृष्णराव घुगे, आंतरवली, खांडी, जि. औरंगाबाद. 

दोन एकर शेती, आईच्या नावावर ७० हजार कर्ज. सालच अशी आली की २०१५ पासून कर्ज थकीत झालं. आजची दुसरी चक्‍कर पणं कर्जमाफीचं काय झालं, नवं कर्ज मिळेल का याचं उत्तर काही मिळालं नाही.  - भास्कर बोंद्रे, देवगाव, जि. औरंगाबाद.

याद्या, अन्‌ सारंच इंग्रजीत. काही कळंत नायं. २००९ पासून ९६ हजार कर्ज थकीत. चौकशी केली त समाधान करणारं उत्तर मिळतं नाही. कर्जमाफीचा संभ्रम काही दूर होईना.  - आप्पासाहेब कोठूळे, देवगाव, जि. औरंगाबाद.  

भावाच्या नावावरील कर्ज भरण्यासाठी आलो तेव्हा वेगळी रक्‍कम भरावी लागेल असं कळल. कर्जमाफीचं वर्ष लोटलं तरी काही कळेना काय व्हतंय. अनेक माफीत बसतात मग त्यांना नव्यानं कर्जवाटप का होतं नाही तेचं कळंना.  - गणेश गरड, एकतुनी, जि. औरंगाबाद.  वडिलांच्या नावावर २०१३ पासून ७४ हजार रुपये कर्ज थकीत आहे. तेव्हापासून नव-जूनही करता आलं नाही. मुख्यमंत्र्यांनी घोषणां करून वर्ष लोटलं. बॅंकेकडे आलं की ते म्हणतात आमच्याकडे काहीच आलं नाही. यादीत नाव पाहिलं तर माफ झाले म्हणते.   - दीपक ढाकणे, देवगाव, जि. औरंगाबाद.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

SCROLL FOR NEXT