‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्ण
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्ण 
मुख्य बातम्या

‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्ण

टीम अॅग्रोवन

मुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यभरात आज (ता. २१) मतदान होणार आहे. राज्यातील सर्व २८८ विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदानाची ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, अधिकाधिक मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच मतदानावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, मतदान सुरळीतरीत्या पार पडावे यासाठी संपूर्ण राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.  राज्यातील यंदाची निवडणूक अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे चर्चेत राहिली. सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांना भाजपने आपल्या पक्षात घेऊन एका नव्या पॅटर्नची सुरवात केली. यामुळे सुरवातीला विरोधी पक्ष काहीसे बॅकफूटवर गेल्याचे दिसत होते. भाजपने आपल्या दिग्गज नेत्यांची फौज प्रचारात उतरवली. त्यामुळे सुरवातीच्या टप्प्यात भाजपने प्रचारात आघाडी घेतली होती. त्यानंतर शिवसेनेशी युती करून भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.  दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचीदेखील आघाडी झाली. तरीही काँग्रेस निवडणुकीच्या प्रचारात फारसा चमक दाखवू शकली नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत राज्यभरात झंजावाती प्रचार केला. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीने प्रचाराच्या बाबतीत भाजपला चांगलीच टक्कर दिली. राज ठाकरे यांनीही राज्यात अनेक ठिकाणी सभा घेऊन आपल्याला मजबूत विरोध पक्ष म्हणून संधी द्यावी, असे आवाहन मतदारांना केले. विविध राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे झंझावाती दौरे, प्रचारसभांमध्ये रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी आणि कोपरा बैठकांमुळे गेले चार आठवडे राज्यभरात प्रचाराचे रण अक्षरशः पेटले होते.  आचारसंहितेमुळे शनिवारी जाहीर प्रचाराची मुदत संपली, तरी त्यानंतरही सर्वत्र छुपा प्रचार सुरुच होता. रविवारची रात्र त्यादृष्टीने निर्णायक ठरली. साम-दाम-दंड-भेद अशा सर्व राजकीय आयुधांचा वापर करुन मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न होत होते. त्यामुळे आज, मतदार नेमके कुणाच्या पारड्यात आपले मत देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मतदानासाठी जास्तीत जास्त मतदारांना घराबाहेर काढण्याचे मोठे आव्हान राजकीय कार्यकर्त्यांवर आहे.  राज्यातील सर्व २८८ विधानसभा जागांसाठी आज मतदान होणार आहे. सुमारे नऊ कोटी नागरिक मतदानासाठी पात्र आहेत. सुमारे ९६ हजार केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, अधिकाधिक मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच मतदानावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, मतदान सुरळीतरीत्या पार पडावे यासाठी संपूर्ण राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीत २८८ मतदारसंघांतील ९६ हजार ६६१ मतदान केंद्रांवर १ लाख ८० हजार मतदान यंत्रे, १ लाख २७ हजार नियंत्रण यंत्रे (कंट्रोल युनिट) आणि १ लाख ३५ हजार व्हीव्हीपॅट पाठविण्यात आली आहेत. निवडणुकांमध्ये मतदानासाठी बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट महत्त्वाचे असतात. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर होणार असून, सर्वप्रथम २०१९च्या लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला होता. निवडणूक कामासाठी सुमारे साडेसहा लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

एकूण मतदार-

  • महाराष्ट्रात एकूण ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६००
  • पुरुष मतदार - ४ कोटी  ६८ लाख ७५ हजार ७५०
  • महिला मतदार- ४ कोटी २८ लाख ४३ हजार ६३५
  • तृतीयपंथी मतदार- २ हजार ६३४ 
  • दिव्यांग मतदार - ३ लाख ९६ हजार
  • सर्व्हिस मतदार- १ लाख १७ हजार ५८१
  • मतदान केंद्रे

  • एकूण ९६ हजार ६६१ 
  • मुख्य मतदान केंद्रे – ९५,४७३
  • सहायक मतदान केंद्रे – १,१८८
  • ३५२ ‘सखी मतदार केंद्रे’
  • मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा-

  • मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध
  • या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.
  • मतदार ओळखपत्र नसल्यास यापैकी एक पुरावा ग्राह्य- मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र नसल्यास खालीलपैकी कोणताही एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

  • पासपोर्ट
  • वाहन चालक परवाना
  • राज्य-केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र 
  • छायाचित्र असलेले बँकांचे-टपाल कार्यालयाचे पासबुक
  • पॅन कार्ड
  • राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांकद्वारे दिलेले स्मार्ट कार्ड
  • मनरेगा जॉब कार्ड
  • कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
  • छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन दस्तावेज (पीपीओ)
  • खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

    POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    SCROLL FOR NEXT